नवीन लेखन...

ऐकावेसे वाटले म्हणून

‘तुम जो होते तो बात और थी
अब की बारीश तो सिर्फ़ पानी है

मध्यंतरी मी सहज वेळ जात नव्हता म्हणून टीव्हीवर ‘जेष्ठांची क्रिकेट स्पर्धा’ बघत होतो.
तसाही तुमचा वेळ जात नसेल तर साळगावकरांच्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेची मागची पाने वाचणे किंवा कुठल्यातरी चॅनलवर हमखास चालू असलेला नाना पाटेकरचा “वेलकम” सिनेमा पहाणे (भगवानने दिया हुआ सबकुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है) हे अजून दोन उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहेत.

तर तो सामना पहात असताना “LEGEND” समालोचक सुशील दोशीचा (त्यांच्या वयाचा मान राखूनही मी त्यांचा एकेरीच उल्लेख करणार आहे. आपल्याला “आनंद” सिनेमा दाखविणाऱ्या सख्ख्या मामाला आपण ‘अहो मामा’ म्हणतो का ?)
तलम वस्त्रगाळ आवाज कितीतरी वर्षांनी कानी पडला. एकेकाळी त्याच्या मार्दवभऱ्या इंदोरी लहेजाच्या शुद्ध हिंदीत, स्पष्ट शब्दोच्चारात व अभ्यासपूर्ण ओघवत्या शैलीत क्रिकेट समालोचन ऐकणे ही कानांना खास मेजवानी असे.

तुम्हाला १९७७-७८ साली बिशनसिंग बेदीच्या नेतृत्वाखाली भारताने केलेला ऑस्ट्रेलियन दौरा आठवतो का ? त्याकाळी पाच सामन्यांच्या मालिकेत एखादा सामना जरी निकाली झाला तरी गावजेवण घालावे अशी परिस्थिती असताना, त्या मालिकेतील चक्क पाचही सामने निकाली झाले होते. अत्यंत चुरशीची झालेली ती मालिका भलेही ऑस्ट्रेलियाने अँडलेडवरील पाचवा सामना ४७ धावांनी जिंकून ३-२ अशी (कशीबशी) जिंकली असेल, पण भारताने ऑस्ट्रेलियाला दिलेली कडवी झुंज पुढील काही पिढ्यांना स्फूर्तीदायी ठरावी अशीच होती.

थोडे विषयांतर होते आहे पण माझा नाईलाज आहे. क्रिकेटचा विषय निघाला की माझा असाच बघताबघता धुंडिराज होतो. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाहून परतला त्या दिवशी आम्ही काही मित्रांनी पाच-पाच रुपयांची वर्गणी काढून (आणि मामलेदार मिसळीचे बलिदान देऊन) ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्यात,दत्तमंदिर चौकात अभिमानाने बॅनर झळकावला होता..

“तुम्ही कांगारुंची मने जिंकली आहेत”

या दौऱ्यावर भारतातर्फे फक्त दोनच समालोचक गेले होते.
सुशील दोशी व डिकी रत्नाकर.

एकजण तीन ओव्हर्स समालोचन करी. मग दुसरा. एक्स्पर्ट समालोचक वगैरे भानगड नाही. जो समालोचन करत नसेल तोच एक्स्पर्ट असा सरळसाधा मामला होता. जोडीला एक स्कोअरर बस.

आमचे ते दहावी मॅट्रीकचे वर्ष होते. भल्या पहाटे ‘नवनीत’ची नमुना प्रश्नपत्रिका सोडविण्याचा निमित्ताने उठल्यावर (ह्या ‘नवनीत’ सद्गृहस्थाला जर मी त्याच्या घराखाली उभे राहून निर्मळ मनाने शिवाजीपार्कीय मराठीत शिवीगाळ केली तर मला किती वर्षांचा ‘सश्रम कारावास’ भोगावा लागेल ?), सारे जग साखरझोपेत असताना, हाताच्या पंज्यात मावणाऱ्या ८८ रुपयांच्या शुभदा ट्रान्झिस्टरवर सुशील दोशीचे समालोचन ऐकणे ही आमच्यासाठी श्रवणसुखाची परिसीमा होती.
ही मालिका उत्कंठावर्धक करण्यामागे भारतीय खेळाडूंइतकाच सुशील दोशीचाही अदृश्य हात होता हे मी सिडनी कोर्टात जेफ थॉमसनची शपथ घेऊन सांगेन.

त्याचे काही आवडते वाकप्रयोग होते.
कपिलदेवचा सीमारेषेवर झेल सुटल्यावर त्याच्या कौतुकभऱ्या आनंदी आवाजात “किस्मत बहादुरोंका साथ देती है” हे ऐकताना अंगावर जसे रोमांच उभे राहिले तसे नंतरच्या काळात अजय जडेजाचा झेल सुटल्यावर (की ‘ठरवून’ सोडल्यावर ?) इंग्लिश समालोचकाच्या तोंडून “Fortune favours the brave” हे ऐकल्यावर नाही उभे राहिले.
तुम्हाला आठवत असेल, दिलिप दोशी सीमारेषेवररुन थ्रो करताना हात मनगटात न मोडता गोलंदाजीच्या शैलीतच यष्टीरक्षकाकडे चेंडू फेकत असे. साहजिकच चेंडू जास्त उंचावरुन येत असे. तेव्हा दिलिप दोशीकडे चेंडू गेल्यावर जावेद मियाँदाद व डीन जोन्ससारखे चपळ फलंदाज एकाऐवजी दोन धावा पळत असत. पुढे पुढे या गोष्टीची समालोचकांइतकीच श्रोत्यांनाही सवय झाली.

त्यामुळे दिलिप दोशीकडे चेंडू गेला की संपूर्ण प्रसंगाचे वर्णन न करता “और ये दोशी का फायदा” इतकीच उपहासात्मक टिपण्णी सुशील करत असे व सुजाण श्रोते काय ते समजून जात इतकी त्याची व श्रोत्यांची तार जुळलेली होती.

१९८७ च्या वर्ल्डकपचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडचा साखळी सामना सुशीलच्या माहेरच्या अंगणात म्हणजे इंदोरलाच होता.

आदल्या दिवशी पाऊस झाल्याने सामना ५० षटकांऐवजी प्रत्येकी ३० षटकांचाच झाला आणि त्यामुळेच कदाचित कमालीचा रंगतदारदेखिल झाला.

ऑस्ट्रेलियन धावसंख्येचा पाठलाग करताना एकवेळ न्यूझीलंड संघ विजयाच्या अगदी समीप होता. त्यावेळेस सुशीलने “अब मै कुछ कुछ सुगंध ले रहा हूँ न्यूझीलंड के जीत की” हे वाक्य इतक्या नजाकतीने उच्चारले की न्यूझीलंडच्या विजयाचा वास २१” ईसी टीव्हीवरुन थेट आमच्या नाकापर्यंत पोहोचला. (नंतर ‘गोल्डनआर्म’ स्टीव्ह वॉने शेवटच्या षटकात मार्टिन क्रो व इयन स्मिथला बाद केल्यामुळे न्यूझीलंड हा सामना तीन धावांनी हरले ही बाब अलाहिदा.)

पण नंतर हळूहळू त्याचे दूरदर्शनवरील ‘दर्शन’ दुर्मिळ होत गेले. त्याच्याच तालमीत तयार झालेल्या जाणकार क्रिकेटप्रेमींना ‘Underestimate’ करुन, नजरेसमोर सहजसोपा दिसणारा खेळ मुद्दाम ‘दुर्बोध’ करुन सांगण्यात त्याला रस नसावा. तसेही विवेक राझदान,अतुल वासन, आकाश चोप्रा आणि चेतन शर्मासारख्या ‘महान’ आणि ‘ज्ञानी’ खेळाडूंसोबत समालोचन करताना त्याची बहुदा गोचीच झाली असती.

शायर म्हणतो,

‘हुक़्मरानी हर तरफ बौनों की, उनका ही हुजूम
हम ये अपनी जिस्म की ऊंचाईयों का क्या करे ?’
(सगळीकडे बुटक्यांचं राज्य आहे, त्यांचीच गर्दी झालीये;
माझ्या या उंचीचं मी काय करु ?)

ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा विजय मर्चंटजींनी रविवारी दुपारी आपल्या ‘Cricket with Vijay Merchant’ या आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रमात आम्हाला
‘…And believe me my listeners’
असे एकदा आपल्या करारी आवाजात अधिकारवाणीने आश्वस्त केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर आणि त्या कालखंडात समालोचन करणाऱ्या सुशील दोशी, सुरेश सरय्या, डिकी रत्नाकर ,वि.वि. करमरकर या समालोचकांवर डोळे झाकून विश्वास टाकला. त्यांची सत्यता पडताळण्यासाठी आम्हाला कधी थर्ड अंपायरची अथवा DRS ची, स्टंप व्हिजनची,बॉल ट्रॅकिंगची किंवा स्निकोमिटरसारख्या तांत्रिक उपकरणाची गरज भासली नाही. आणि या जेष्ठ मंडळींनीही कधी आमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही.

काही वर्षांपूर्वी एका कसोटी सामन्यात, पकडापकडी खेळात एखाद्यावर राज्य यावे तसा फॉरवर्ड शॉर्टलेगला नाईलाजाने विक्रम राठोरे, शिवसुंदर दास, देवांग गांधी किंवा तत्सम कोणी हॅरीस शिल्ड खेळलेला तरुण खेळाडू उभा होता.
फलंदाजाचा बॅट-पॅड कॅच उडाल्यावर,जणूकाही रुढार्थाने तो कॅच नव्हताच परंतु तरीही (शर्टला माती लागू न देता) आपण तो झेलण्याचा कसा आटोकाट प्रयत्न केला याचा त्याने (कॅमेराकडे बघत) सुरेख डेमो दिला. यावर भाष्य करताना खेदाने स्वगत बोलावे तसे सुशील मायक्रोफोनमधे चुटपुटला …”यह उस किसम का कॅच था जिस किसम के कॅचेस सोलकर लिया करते थे !” कॅच सुटल्याच्या दुःखापेक्षा त्याच्या आवाजातील खिन्नता व नैराश्य आमच्या कानाला तापलेल्या सळीसारखे डागण्या देऊन गेले.

आत्ता काही दिवसांपूर्वी गाडीत FM रेडिओ सर्फिंग करताना माझ्याकडून कुठल्यातरी टी ट्वेन्टी सामन्याची हिंदी कॉमेंट्री लागली गेली. आता लागलीच आहे तर ऐकावी थोडावेळ या विचाराने मी ती चालूच ठेवली. पण पाचच मिनिटांत त्या समालोचकाची (त्याला समालोचक म्हणणं म्हणजे बथ्थड अरुण गोविलला साक्षात मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणण्यासारखं आहे) हिंग्लाळलेली भाषा ऐकून मी नखशिखांत हादरलो आणि घाईघाईत चॅनल बदलून “कांटा लगा.. हाय लगा”वर आलो.

‘यह उस किसम की कॉमेंट्री नही थी जिस किसम की कॉमेंट्री सुशील दोशी किया करते थे !’

त्याने दिवसाच्या शेवटाला “और यह लंबी होती जा रही खिलाडीयोंकी परछाईयाँ” अशी भैरवी उच्चारली की आता खेळ आटपत आला आणि सांजपर्वाची वेळ झाली हे त्याचे श्रोते बरोबर ओळखत. आर.के. फिल्म्सच्या ‘हिना’ चित्रपटाची पाकिस्तानी नायिका आणि कवयित्री झेबा बख्तियारचा एक शेर मला सहज आठवला,

अंधेरा है इतना घना, साया तो हो नही सकता
फिर कौन है जो मेरे
साथ साथ चले जा रहा है !

संदीप सामंत
९८२०५२४५१०
३/०५/२०२१.

Avatar
About संदीप सामंत 15 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..