एअर कंडिशनर म्हणजे वातानुकूलन यंत्र हे रेफ्रिजरेटरसारखेच काम करते. एका ठिकाणची उष्णता शोषून ती दुसरीकडे नेऊन सोडते.
यात पाईप आणि ट्यूब यांचा वापर करून फ्रेऑनसारखे प्रशीतक रसायन फिरवलेले असते. त्यानंतर त्याचे बाष्पीभवन व संघनन या दोन्ही क्रिया घडवल्या जातात त्यामुळे उष्णता खेचली जाणे व नंतर ती बाहेर टाकणे हे उद्देश साध्य होतात.
घराच्या खोलीत खिडकी करून तिथे लावलेला एअर कंडिशनर जो असतो त्यात थंड करणारा भाग हा खोलीच्या आत व उष्णता फेकणारा बाहेर असतो. बाष्पकाच्या व कॉईलमधील प्रशीतक, द्रव अवस्थेतून वायू रूपात जातो त्यावेळी तो बाहेरच्या हवेतील उष्णता शोषून घेत असतो, त्यानंतर बाष्पकाचा पंखा हा उष्ण हवा खोलीबाहेर टाकण्याचे काम करतो व थंड हवा खोलीत सोडतो. एअर कंडिशनरमध्ये जो डिव्हायडर असतो तो उष्ण हवा आत येऊ देत नाही. नंतर वायू रूपातील प्रशीतक कॉम्प्रेसरकडे जातो. त्यामुळे त्यावरील दाब वाढतो, त्याचे तापमान वाढून तो बारीक नलिका कॅपिलरीज मधून कंडेन्सर (संघनन करणारे यंत्र)कडे पाठवला जातो. त्यामुळे त्याचे द्रवात रूपांतर होते. कंडेन्सरचे तोंड नेहमी बाहेरच्या दिशेला असते, त्यामुळे त्यातील फॅन उष्ण हवा खोलीबाहेर सोडतो.
बाष्पीभवनाचा वापर प्रशीतना साठी करण्याचा पहिला प्रयोग बेंजामिन फ्रँकलिन व जॉन हॅडले यांनी १७५८ मध्ये केला होता. १८२० मध्ये मायकेल फॅरेडे याने शीतकरणासाठी द्रव अमोनियाचा वापर केला.
अमेरिकेच्या जॉन गोरी यांनी कॉम्प्रेसर तंत्र वापरून बर्फ तयार केला होता.
१९०६ मध्ये स्टुअर्ट क्रमप या नॉर्थ कॅरोलिनातील वैज्ञानिकाने एअर कंडिशनिंग हा शब्द पहिल्यांदा वापरला. १९२८ मध्ये थॉमस मिडग्ले यांनी फ्रेऑनचा शोध लावल्यानंतर शीतकरण तंत्र फारच सुधारले.
आता क्लोरोफ्लुरोकार्बन्सच्या जागी एचसीएफसीचा वापर केला जात आहे, पण त्याहीपेक्षा कार्बन डायॉक्साईडचा वापर करण्यावर यापुढे भर राहील.
आता मोठ्या कार्यालयात सेंट्रल एअर कंडिशनिंग केले जाते. पोर्टेबल एअर कंडिशनरही मिळतात. स्प्लिट एसी हा प्रकार अलीकडे वापरला जातो. त्यात हवा एकाच युनिटमध्ये न फिरवता ती उष्ण व थंड अशा दोन वेगवेगळ्या विभागात फिरवली जाते. त्यांची किंमत जास्त असली तरी दुरूस्ती खर्च तुलनेने कमी असतो.
मोठ्या घरांना स्प्लिट एसी वापरतात. इमारतींना वापरत नाहीत. छोट्या घरांसाठी डक्टलेस मिनी स्प्लिट एसी हा चांगला पर्याय मानला जातो.
Leave a Reply