नवीन लेखन...

एअर मार्शल पी. एन. प्रधान

भारतीय हवाई दलातला नवा मराठी शिरपेच

भारतीय सैन्यदलात महाराष्ट्राच्या सुपुत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारपदांवर मराठी अधिकाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून योगदान दिले आहे. एअर मार्शल पी. एन. प्रधान यांच्या नव्या नेमणुकीमुळे महाराष्ट्राचे हे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एअर मार्शल प्रधान यांचे आजवरचे योगदान आणि नव्या अधिकारपदावरील त्यांच्यापुढची आव्हाने याविषयी..


एअर मार्शल पी. एन. प्रधान हे भारतीय हवाई दलाच्या विविध कमांडसपैकी थिरुअनंतपुरम येथे मुख्यालय असलेल्या सदर्न एअर कमांड मुख्यालयात सिनिअर एअर स्टाफ ऑफिसर म्हणून रुजू झाले. एअर मार्शल प्रधान हे मूळचे मुंबईचे आहेत. १९८१ साली हवाई दलामध्ये ट्रान्स्पोर्ट ब्रॅंचमध्ये अधिकारी म्हणून त्यांना कमिशन मिळाले. एअरफोर्सची विमाने ही मुख्यत: दोन प्रकारची असतात. एक फायटर एअर क्राफ्ट आणि दुसरे ट्रान्स्पोर्ट म्हणजे युद्धसामग्रीवाहक एअर क्राफ्ट. एअर मार्शल प्रधान ट्रान्स्पोर्ट एअर क्राफ्ट गटामध्ये सामील झाले होते. त्यांनी मागच्या अनेक वर्षांत देशाच्या उत्तरसीमा, ईशान्यसीमा अशा वेगवेगळ्या रणभूमींवर कामगिरी बजावली आहे. ट्रान्स्पोर्ट विमानाचे मुख्य काम असते आपल्या सैनिकांची अचानक हालचाल एका युद्धभूमीवरून दुसऱ्या युद्धभूमीवर करणे किंवा त्यांना गरज पडल्यास इमर्जन्सीमध्ये दारूगोळा व इतर सामग्री पोचवणे. एअर मार्शल प्रधान हे सदर्न एअऱ कमांडमध्ये नंबर दोनचे मुख्य अधिकारी असतील.

भारतीय हवाई दलाचे लढाईच्या दृष्टीने सात वेगवेगळे कमांड्स आहेत. यामधील पाच कमांड्स हे ऑपरेशनल म्हणजे लढाईकरता, एक ट्रेनिंग (प्रशिक्षण) करता आणि एक अडमिनिस्ट्रेटिव्ह (म्हणजे प्रशासकीय कामासाठी) कमांड आहे. यामधील ट्रेनिंग कमांड महाराष्ट्रातील नागपूर येथे स्थित आहे. सदर्न एअऱ कमांड याच फायटिंग कमांडपैकी आहे. हा कमांड २० जुलै १९८४ रोजी तिरुअनंतपुरम् येथे प्रस्थापित करण्यात आला होता. सदर्न एअर कमांडचे मुख्य काम आहे भारताच्या सागरी सीमेचे रक्षण आणि आपल्या द्वीपसमूहाचे संरक्षण.

आपल्या देशाला ७६०० किलोमीटर लांबीची सागरी सीमा लाभलेली आहे. याशिवाय आपली दोन द्वीपसमूहे आहेत. (बेटांचा समुदाय) लक्षद्वीप आयलंड्स हे अरबी सागरात स्थित आहे आणि अंदमान-निकोबार आयलंड्स बंगालच्या उपसागरात आहेत. सगळी मिळून देशाकडे १२५० हून अधिक बेटे या समुद्रात आहेत. याशिवाय आपल्या देशाला २०० नॉटिकल मैलांची ‘एक्सक्लूसिव्ह इकॉनॉमिक झोन’ मिळाली आहे. म्हणजेच समुद्रकिनाऱ्यापासून २०० नॉटिकल मैलांचा समुद्र हा आपल्या देशाचा आहे. या समुद्रामधून मिळणारे तेल, गॅस व इतर धातू हे आपले आहेत. या सगळ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय सैन्य आणि नौदला बरोबर सदर्न एअर कमांडची आहे.

एअर मार्शल प्रधान यांनी आपल्या १९८१ सालापासून आजपर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या सीमांवर महत्त्वाचा पदभार सांभाळला आहे. ज्यामध्ये ग्राऊंड एअर डिफेन्स, बेस ट्रान्स्पोर्ट टीमचे नेतृत्व आणि वेगवेगळ्या एअर हेडक्वार्टर्समधील पदभार, यांचा समावेश आहे. आपल्या देशाकडे एएन ३२, आयएल ७६, सि १३२-हर्क्यूलस अशी वेगवेगळी ट्रान्स्पोर्ट विमाने आहेत. एअर मार्शल प्रधान यांनी या सगळ्या विमानांत उड्डाण करण्याची जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय भारताच्या व्हीआयपीं करता म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विविध राज्यांचे राज्यप्रमुख यांच्यासाठी एअरफोर्स वन ही व्हीआयपी स्वॉड्रन वापरली जाते. या अतिमहत्त्वाच्या व्हीआयपी स्वॉड्रनचे नेतृत्वही एअर मार्शल प्रधान यांनी केलेले आहे. यासाठी त्यांना २०१४ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अतिविशिष्ट सेवापदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. सदर्न एअर कमांडचे एक महत्त्वाचे काम असते आपत्कालीन परिस्थितीत देशाच्या अंतर्गत भागात तसेच मित्रराष्ट्रांना मदत करणे. यामध्ये गेल्या वर्षभरात उद्भवलेल्या दोन महत्त्वाच्या आपात परिस्थितीत त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे काम केले आहे.

नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये सुमारे दहा हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामध्ये शेकडो इमारती, रस्ते असा महत्त्वपूर्ण सार्वजनिक सुविधा उध्वस्त झाल्या होत्या. या भूकंपकाळात नेपाळमध्ये सर्वात पहिली मदत पोचवली ती भारतीय सैन्याने. यामध्ये भारतीय हवाई दलाची आय ७६ विमाने, एएन ३२ विमाने आणि सी १३२ सुपर हर्क्यूलस विमाने वापरण्यात आली. सुपर हर्क्यूलस विमान हे प्रचंड मोठे असल्याने त्यातून मोठे ट्रक्स आणि वजनदार अभियांत्रिकी साहित्य पाठवण्यात येते. या हवाई दलाच्या तुकड्यांचे नेतृत्व एअर मार्शल प्रधान यांनी केले होते. परिणामी भारतीय सैन्यदलाने केलेल्या मदतीमुळे भारत-नेपाळ संबंध अतिउत्तम बनण्याकरता मदत झाली आहे. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन मिशन मैत्री’ असे म्हटले जाते. या महत्त्वाच्या ऑपरेशनचे नियोजन करण्यात आणि त्याची कार्यक्षम, शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यात एअर मार्शल प्रधान यांचा मोठा वाटा होता.

मागच्या वर्षी येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले होते आणि या युद्धात हजारो भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याची जबाबदारी भारतीय सैन्यदलाकडे होती. भारतीय नौदल, हवाईदल यांनी दहा दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये घनघोर लढाई चाललेल्या भागातून ४६४० भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणले. याशिवाय तेथेच अडकलेल्या इतर ४१ देशांच्या ९६० नागरिकांनाही आपणच परत आणले. या ऑपरेशनमध्ये भाग घेतलेल्या हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्वही एअर मार्शल प्रधान यांनीच केले होते. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन राहत’ असे नाव दिले होते आणि ४१ देशांच्या प्रसिद्धीमाध्यमांनी ‘ऑपरेशन राहत’ अतिशय यशस्वीपणे पार पाडल्यामुळे भारताची स्तुती केली होती. यामुळे साऱ्या जगाला हे कळून चुकले, की जे इतर राष्ट्रांना करता आले नाही ते ऑपरेशन किती यशस्वी रीतीने भारतीय नौदल आणि हवाई दलांकडून केले गेले. या यशामध्ये परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग, नौदलप्रमुख आणि एअर मार्शल प्रधान यांचा महत्त्वाचा वाटा होता.

एअर मार्शल प्रधान आता नव्या नेमणुकीनुसार देशाच्या सागरी सुरक्षेवर लक्ष ठेवून असतील. आपल्या सागरी सीमांना अनेक धोके आहेत. २६-११ सारखा मुंबईवर झालेला हल्ला किंवा १९९३ मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉंबस्फोट हे सागरी सीमेकडून करण्यात आले होते. अशा प्रकारच्या हल्ल्यांवर आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. याशिवाय सध्या श्रीलंकेच्या बाजूने अनेक दहशतवादी सागरी मार्गाने दक्षिण भारतात प्रवेश करतात. आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावरून माओवाद्यांना शस्त्रे आणि दारूगोळा पुरवला जातो. याशिवाय पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या किनारपट्टीवरती समुद्रमार्गे बांग्लादेशींची घूसखोरी होते. या सगळ्यावरही एअर मार्शल प्रधान लक्ष ठेवून असतील. आपल्या द्वीपसमूहांना असलेला धोकाही वाढत चालला आहे. याकरता त्यांच्या सुरक्षेवरही बारीक नजर ठेवावी लागेल. एअर मार्शल प्रधान यांची याआधीची सेवा लक्षात घेता अशी खात्री वाटते, की ते ही सगळी आव्हाने यशस्वी रीतीने स्वीकारतील.

महाराष्ट्राचा तर भारतीय सैन्यदलात आणि खास करून भारतीय हवाई दलाच्या यशात फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्राने हवाई दलाला दोन हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर आणि एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक – दिले आहेत. याशिवाय एअर मार्शल भूषण गोखले, एअर मार्शल सदानंद कुलकर्णी, एअर मार्शल लिमये, एअर मार्शल सोमण अशी महाराष्ट्राच्या सुपुत्रांची नावे सहज डोळ्यांसमोर येतात. एअर मार्शल भोसले हे मागच्या वर्षी एनडीएचे डेप्युटी कमांडंट होते. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक परंपरेत एअर मार्शल प्रधान यांनी सदर्न एअर कमांड सिनिअर एअर स्टाफ ऑफिसरचे पद सांभाळून शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. एअर मार्शल प्रधान यांना त्यांच्या भावी काळातील यशासाठी शुभेच्छा.

 

शब्दांकन – जयश्री बोकील, पुणे

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..