कुठलाही मोठा आघात हानिकारक असतो. मोटारींना जेव्हा अपघात होतात तेव्हा बऱ्याचदा अफाट वेग हेच त्याचे कारण असते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाढलेले अपघातांचे प्रमाण आपण पाहतोच आहोत. झोपेच्या वेळी गाडी चालवणे (पहाटे १२ ते ५) हेही त्याचे एक मोठे कारण आहे. जेव्हा मोटार अपघात होतो तेव्हा मोठ्या आघातानेच कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होतो. काही प्रगत अशा गाड्यांना एअरबॅग्ज असतात.
त्यामुळे आघातामुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो. अमेरिकेचे जॉन हेट्रिक यांनी एअरबॅगचा शोध लावला. त्यात अॅलन ब्रीड यांनी सुधारणा केल्या. एअरबॅगचे तंत्र फार अवघड नसते. अपघाताच्या वेळी मोटार ज्या वेगात असते त्यापेक्षाही अधिक वेगाने ती उघडली जाते व तुम्ही त्यात सुरक्षित राहता. जेव्हा मोटार कशावरही आदळते तेव्हा तिचा वेग नंतर कमी होतो. गाडीतील ॲक्सीलरोमीटर (त्वरण किंवा बल मोजणारी इलेक्ट्रॉनिक चिप) वेगातील हा बदल टिपतो.
त्यावेळी जर वेगातील घट म्हणजे डिअॅक्सीलरेशन जर पुरेसे जास्त असेल तर अॅक्सीलरोमीटर हा एअरबॅगच्या सर्किटला संदेश पाठवतो व त्यामुळे विद्युतप्रवाह टोस्टरमधील वायरसारख्या हिटिंग एलिमेंटमधून जातो. त्यानंतर रासायनिक स्फोटक पेट घेते. जुन्या एअरबॅगमध्ये त्यासाठी सोडियम अझाइड वापरले जात असे. आता दुसरी रसायने वापरतात. स्फोटक जळते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू (हानिकारक नसलेला) तयार होतो. त्यात विशेषकरून नायट्रोजन किंवा अरगॉन यांचा समावेश असतो. तो नायलॉनच्या पिशवीत भरला जातो. ही पिशवी स्टिअरिंग व्हीलच्या मागे असते. ती फुगते. ती विस्तारत जाते व चालकासमोर येते.
तिच्यावर टाल्कम पावडरसारखी पावडर टाकलेली असते. त्यामुळे ती सहज उलगडते. जेव्हा अपघात होतो तेव्हा चालकाचे डोके समोर आदळून त्याचा मृत्यू ओढवत असतो. त्यामुळे एअरबॅग असलेल्या वाहनात तो एअरबॅगवर आदळतो. त्यामुळे एअरबॅगमधील वायू बारीक छिद्रातून हळूहळू बाहेर पडतो व ती पिशवी पुन्हा पूर्ववत होऊ लागते. तोपर्यंत मोटार थांबलेली असते. अशा प्रकारे एअरबॅग प्राण वाचवू शकते. ज्या कुठल्याही गोष्टीला वस्तुमान आणि वेग असतो तिला गतीज ऊर्जा असते. जड मोटार तुम्ही जास्त वेगाने चालवाल तर गतीज ऊर्जा आणखी जास्त असते.
शिवाय मोटारीत बसलेल्या व्यक्तींनाही वेग व वस्तुमान असते. त्यामुळे त्यांनाही गतीज ऊर्जा मिळत असते. सीटबेल्टमुळे फार संरक्षण मिळत नाही. कारण आपले शरीर पुढे आपटण्यापासून रोखले गेले तरी आपल्या डोक्याचे वजन ३ ते ६ किलो असू शकते. त्यामुळे अपघातात ते स्टिअरिंग व्हीलवर आदळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सीट बेल्टची पुढची पायरी म्हणून एअरबॅग महत्त्वाची ठरते. सप्लीमेंटरी रिस्ट्रेंट सिस्टिम असे या एअरबॅग प्रणालीला नाव आहे. कारण एअरबॅग असली तरी सीट बेल्ट बांधणे अनिवार्य असते. एअरबॅगवर डोके आदळल्यानंतर तिच्यातील हवा कमी होत जाते. कारण तसे झाले नाही तर डोके बॅगवर आपटून पुन्हा मागे आपटण्याचा धोका होऊ शकतो. जनरल मोटर्स, फोर्ड, पोर्शे, मर्सिडिझ बेन्झ यांच्या गाड्यांना अशा एअरबॅगची व्यवस्था चालक व प्रवासी यांच्यासाठी आहे.
Leave a Reply