नवीन लेखन...

एअरपोर्ट

माझी मुलगी परदेशी जाण्यासाठी निघाली होती तेव्हाची गोष्ट. तिची पहाटेची सव्वाचारची फ्लाईट होती. सव्वाचारची फ्लाईट म्हणजे रिपोर्टिंग पहाटे एक वाजताचं. रात्रौ बाराला आम्ही घरुन निघालो. साधारणतः पाऊणच्या सुमारास आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो. एअरपोर्टवर तेव्हा खऱ्या अर्थाने दिवस उजाडला होता. विमान पकडण्यासाठी आलेल्या पॅसेंजर्सची आणि विमानातून उतरलेल्या पॅसेंजर्सची तिथे झुंबड उडाली होती. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था वेगवेगळ्या मजल्यांवर करण्यात आली असल्याने उपलब्ध सुविधांचा अगदीच बोजवारा उडालेला नव्हता. जाणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळ्या मार्गाची सोय होती. त्या मार्गाने आम्ही निर्धारित टर्मिनसला पोहोचलो. सर्वप्रथम सामानासाठी ट्रॉली शोधावी लागली. ती घेतली. ट्रॉलीवर सामान टाकून आम्ही निघालो.

मुलीला “पासपोर्ट सांभाळून ठेव, विमानातून उतरल्याबरोबर फोन कर, मध्ये हॉल्ट आहे तिथे एअरपोर्टवर झोपू नकोस, पुढची फ्लाईट चुकली तर घोटाळे होतील’ अशा सूचना देणं सुरुच होतं. घरच्या वजनाच्या काटयावर बॅगेज थोडं जास्तीच भरलं होतं. थोडं जास्त बॅगेज अलाऊड असतं की एक्सेस बॅगेज काढावंच लागणार यावर चर्चा सुरुच होती. लवकर गेलं की थोडं जास्त बॅगेज असलं तरी दुर्लक्ष करतात अशी माहिती जाणकारांकडून मिळाली होती. म्हणूनच तर आम्ही फ्लाईटच्या बरोबर तीन तास आधी एअरपोर्टवर पोहोचलो होतो. चेकइनसाठी अजून दहापंधरा मिनिटांचा अवधी होता. तेवढ्या वेळात फोटो काढून घेतले, मुलीजवळ सूचनांचा पुन्हा एकदा पाढा वाचला आणि आम्ही प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. शेवटचं बायबाय करुन मुलगी आत गेली. प्रवेद्वारावर तिचा पासपोर्ट, फ्लाईट डिटेल चेक करण्यात आले. सर्व काही व्यवस्थित होतं. तिला आत सोडण्यात आलं.

प्रवेशद्वाराजवळ परदेशी जायला निघालेल्या प्रवाशांची आप्तेष्ट मंडळी ताटकळत उभी होती. आपला जीवलग परदेशी निघाला, आता त्याचं सहा महिने, वर्षभर किंवा कदाचित त्याहूनही अधिक काळ दर्शनही होणार नाही या विचारांनी उमललेली व्याकुळता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रवेशद्वारातून आत जाणारे प्रवासीही माना वळवून मागे बघत खोळंबलेल्या गर्दीतून आपल्या नातेवाईकांचे चेहरे शोधत होते व हात हलवून त्यांचा निरोप घेत होते. तुम्हाला सोडून जाणं जीवावर येतंय परंतु नाईलाज म्हणून जावंच लागतंय असे भाव त्यांच्याही चेहऱ्यावर उमटत होते. परदेशी जाण्यानं भलंच होणार आहे, ते एक अपरिहार्य कर्तव्य आहे हा विचार दोघांनीही स्वीकारला होता व प्राप्त परिस्थितीला सर्वच तडजोडीने सामोरे जात होते.

भारतातून मायदेशी परतणारे अनेक फॉरेनर्सही प्रवेशद्वारातून शिस्तीने आत जाण्यासाठी रांगेने उभे होते. यात गोरे होते, काळे होते, उंच धिप्पाड होते, बुटके होते, सर्व काही होते. वेगवेगळ्या देशांत राहणारे वेगवेगळ्या वंशाचे, धर्मांचे लोक. सर्वांचीच विमान पकडण्यासाठी लगबग सुरु होती. विमानसेवेमुळे जग जवळ आलं. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशातून कुठल्याही देशात फारतर दिवसभराच्या प्रवासानं जाता येतं.

परदेशी प्रवाशांत कामानिमित्त भारतात आलेले सूटाबूटात वावरणारे एक्झिक्युटिव्हज होते, तसेच भारत भ्रमणासाठी आलेले टूरिस्टही होते.काही टूरिस्ट मंडळी साडी, पंजाबी ड्रेस, झब्बालेंगा असा अस्सल भारतीय पेहराव परिधान करुन मायदेशी परतत होती. काही फॉरेनर्स चक्क धोतर नेसून कपाळाला गंध लावून प्रवासाला निघाले होते. या मंडळीं पैकी गोटा करुन शेंडीही ठेवली होती. ही मंडळी हरेराम हरेकृष्ण सारख्या समुदायांशी निगडीत असावी असा मी तर्क बांधला.

तेवढयात मुलीने लांबून हाताने खुणवत सर्व काही ठीक झाल्याचा पुन्हा इशारा दिला. थोडक्यात एक्सेस बॅगेजची समस्या मार्गी लागली होती.दुरुनच खाणाखुणा सुरु झाल्या. चेकइनचा सोपस्कार पूर्ण झाला होता. अजून सिक्युरिटी चेक बाकी होतं. मुलीनं ती कुठल्या दिशेने विमानाकडे जाणार ते खुणेनेच कळवलं. आम्ही त्या दिशेने सरकू लागलो. काचेतून फक्त ती पुढेपुढे जाताना दिसत होती. आम्ही बाहेरुन तिचा मागोवा घेत पुढे सरकत होतो. पुन्हा एकदा शेवटचं बायबाय झालं. मुलगी पार आत निघून गेली. सिक्युरिटी चेक झाल्यावर विमानात बसण्याआधी ती पुन्हा एकदा मोबाईलवर फोन करेल असं ठरलं होतं. फोनसाठी रुपयांची नाणी तिच्या हातात देवून ठेवली होती. तिचा फोन येईस्तोवर बाहेरच थांबण्याचं आम्ही ठरवलं. पूर्वी शंभर रुपयांचं कूपन काढून लॉजमध्ये बसण्याची सोय उपलब्ध होती. या लॉजमध्ये खाण्यापिण्याचे स्टॉल्सही असत. आता सिक्युरिटी म्हणून ही व्यवस्था काढून टाकण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर डिपार्चरच्या प्रवेशद्वारासमोर साधे बाकडेही टाकलेले नाहीत. तरीही नातेवाईक मंडळी समोरच्या फुटपाथवर पथारी टाकून बसलेली असतात. आम्हीही बसण्यासाठी सोबत रद्दी पेपर आणले होते. ते आम्ही फूटपाथवर पसरले आणि फतकल मांडून आम्ही तिथेच स्थिरावलो.

समोर कुठल्यातरी एअरलाईनची एक चकचकीत पॉश बस येऊन उभी राहिली. टापटीप युनिफॉर्म घातलेल्या आणि खाडखाड बूट वाजवत तोऱ्यात निघालेल्या एअर हॉस्टेसेस आणि तसाच पोषाख घातलेले रुबाबदार पायलट व पर्सर्स बसमधून उतरले. भोवतालच्या गर्दीशी देणंघेणं नसल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. आपापसात हास्यविनोद करीत मंडळी कामावर हजर होण्यासाठी निघाली होती. बसल्याबसल्या या मंडळींच्या वेगळ्या आयुष्याबद्दल मी विचार करु लागलो. रोज विमानातून प्रवास. आज या देशात तर उद्या दुसऱ्या. विश्रांती घ्यायची ती कुठल्यातरी हॉटेलमध्ये. एरव्ही पूर्णतः कामात गर्क. कामाचा ताण चेहऱ्यावर दाखवण्याचीही चोरी. सदैव प्रफुल्लीत चेहऱ्याने जगाला सामोरं जायचं. युवा पिढीच्या या वेगळ्या दीनचर्येबाबत आणि खाजगी आयुष्याबाबत मनात काहुर उमटलं. ही स्वतःच्या घरी कधी जात असतील? घरच्यांशी यांचा कितपत संवाद राहत असेल? चौकटीचं आयुष्य जगलेल्या मला या प्रश्नांची उत्तरं गवसणं शक्यच नव्हतं. बसूनबसून पायाला रग लागली होती. मुलीचा फोन आला नव्हता. मी उठून उभा राहिलो. आम्ही उभे होतो तिथून खाली अरायव्हलच्या टर्मिनसला उडालेला गोंधळ दिसत होता. मी खाली वाकून तिथली मजा पाहू लागलो.

डिपार्चरच्या पूर्णतः वेगळा सीन अरायव्हलवर उमटला होता. येणाऱ्या प्रवाशांचे आप्तेष्ट आतुरतेने आपल्या जीवलगाची वाट पाहत उभे होते. जीवलग जवळ येताच आनंदाला उधाण येत होतं. परस्परांना मिठ्या मारत दुरावा संपल्याचा जल्लोष साजरा होत होता. सामानाची ट्रॉली ढकलण्यासाठी नातेवाईक मंडळी लगबगीने पुढे येत होती. फॉरेन रिटर्न जीवलगाला आता पूर्ण आराम द्यायचा हा त्यांचा हेतू सहज स्पष्ट होत होता. गाडीच्या नाहीतर टॅक्सीच्या ड्रायव्हरला शोधण्याची शिकस्त सुरु होती. लवकरात लवकर घर गाठण्यासाठी सगळेच अधीर झाले होते.

तेवढयात मोबाईल वाजला. फोन मुलीचाच होता. विमानतळावरचे सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण झाले होते. ती आता विमानाकडे निघाली होती. काही मिनिटातच तिचं विमान टेकऑफ घेणार होतं. काही तासातच ती दुसऱ्या देशात पोहचणार होती. तिथं तिचं वेगळं आयुष्य सुरु होणार होतं. त्यानंतर मोबाईल अथवा ऑनलाईन बोलणं एवढेच पर्याय आमच्या हाती उरणार होते. कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणारा तिचा चेहराच आता आमच्याशी संवाद साधणार होता. आम्ही तिला फोनवरच विमानप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. फोन बंद झाला. माझ्या पत्नीच्या डोळ्यात इतका वेळ दाबून ठेवलेले अश्रू उमटले. मलाही गलबलल्यासारखं झालं. घरी परतणं भाग होतं, मी मोबाईलवरुन गाडीच्या ड्रायव्हरला बोलावून घेतलं. “जिधर छोडा था उधरही आ जाना हम उधरही खडे है.” मी ड्रायव्हरला सूचना दिल्या.

पाचच मिनिटांत गाडी समोर येऊन उभी राहिली. आम्ही गाडीत बसलो. गाडी घराच्या दिशेने निघाली. एअरपोर्ट मागे राहिला. पत्नी हातातला रुमाल ओठांवर दाबून स्तब्ध बसून होती. गाडीत चकार शब्द न बोलता आम्ही घरी परतलो.

सुनील रेगे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..