हिंदी चित्रपटसृष्टीत असंख्य अभिनेत्री आल्या नि गेल्या. प्रत्येकीची कारकिर्द ही दहा वर्षांपासून, तीस चाळीस वर्षांपर्यंत अस्तित्वात राहिली. मात्र एकच अभिनेत्री अशी होऊन गेली, की जिने तीन वर्षांच्या कालावधीत २१ चित्रपट करुन अचानक ‘एक्झिट’ घेतली.
२५ फेब्रुवारी १९७४ रोजी तिचा मुंबईत जन्म झाला. आई-वडिलांच्या ह्या लाडक्या लेकीला, एक धाकटा भाऊ व मोठी सावत्र बहीण होती. इयत्ता नववी मध्ये शिकत असतानाच तिने चित्रपटात जायचं ठरविलं. सुरुवातीच्या पदार्पणातील काही तेलगु चित्रपटांसाठी तिची निवड झाल्यानंतर, आयत्यावेळी तिच्याऐवजी निर्मात्याने दुसऱ्या नायिकेला घेतलं.
१९९० सालातील व्यंकटेश सोबतचा तिचा ‘बोंबिली राजा’ चित्रपट हिट ठरला. अजून काही तेलगु चित्रपटानंतर तिला बाॅलीवुडचा ‘विश्वात्मा’ हा ब्लाॅक बस्टर चित्रपट मिळाला.
या चित्रपटाला अफाट यश मिळालं. ‘सात समुंदर पार मैं तेरे.’ हे गाणंच, तिची ‘ओळख’ झालं. त्यानंतर ती दिसली, ‘शोला और शबनम’ मध्ये गोविंदा सोबत. नंतर आला, प्रेमाचा त्रिकोण. ‘दिवाना’ !! ऋषी कपूर व शाहरुख खान या दोघांच्या कात्रीत सापडलेली निरागस, लोभस ‘दिव्या’. या चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट ठरली. चित्रपटाने सर्वत्र रौप्यमहोत्सव साजरा केला.
जेव्हा ती यशाच्या शिखरावर होती, तेव्हाच तिला ‘नजर’ लागली. तिने साजीद नडियादवालाशी, धर्मांतर करुन लग्न केलं. दिव्याची ‘सना’ झाली. तिने तब्बल नव्वद चित्रपट साईन केलेले होते.
हेमा मालिनी निर्मित ‘दिल आशना है’, ‘दिल का क्या कसूर’ असे अनेक यशस्वी चित्रपट तिने दिले.
५ एप्रिल १९९३ रोजी पाचव्या मजल्यावरील, बाल्कनीच्या खिडकीतून पडून दिव्या, दूरच्या प्रवासाला निघून गेली. हे तिचं अचानक मृत्यूमुखी पडणं एक न उलगडलेलं, गूढ रहस्यच होऊन राहिलं.
तिच्या या अचानक जाण्यामुळे सत्तर टक्के पूर्ण झालेला, ‘लाडला’ हा चित्रपट, श्रीदेवीला तिच्या जागी घेऊन पुन्हा शुट करावा लागला.
तिच्या नसण्यामुळे, तिच्या ऐवजी ‘मोहरा’ मध्ये रवीना टंडन, ‘कर्तव्य’ मध्ये जुही चावला, ‘विजयपथ’ मध्ये तब्बू, ‘दिलवाले’ मध्ये रवीना टंडन आणि ‘आंदोलन’ मध्ये ममता कुलकर्णीला प्रेक्षकांना पहावं लागलं.
तिला जाऊन एकोणतीस वर्ष झाली. शुक्राच्या ‘चांदणी’ प्रमाणे ती प्रकाशली आणि ‘लुप्त’ झाली. अचानक जाण्यामुळे तिचा ‘आत्मा’ काही वर्ष भटकत होता, अशाही दंतकथा आहेत.
बाबूमोशायच्या भाषेत, ‘जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए.’ तसंच दिव्याची अवघी तीन वर्षांची कारकीर्द अविस्मरणीय अशीच आहे.
‘ऐसी दिवानगी, देखी नहीं कहीं.’ असंच तिच्या बाबतीत म्हणता येईल. अशी निरागस, सुंदर ‘दिव्या भारती’ पुन्हा होणार नाही.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२५-२-२२.
Leave a Reply