नवीन लेखन...

ऐतिहासिक भूकंप

अतितीव्र भूकंप हे रिश्टर मापनानुसार आठव्या किंवा त्याहून अधिक प्रतीचे असतात. गेल्या शंभर वर्षांच्या काळात जगभरात अशा सुमारे वीस अतितीव्र भूकंपांच्या नोंदी झाल्या आहेत. यापैकी सर्वांत तीव्र भूकंप हा ९.५ प्रतीचा होता. चिलीमध्ये १९६० साली झालेला हा भूकंप ‘वाल्दिविआचा भूकंप’ म्हणून ज्ञात आहे. परंतु वाल्दिविआच्या भूकंपाहून अधिक विध्वंसक असा एक भूंकप, चिलीच्या परिसरातच सुमारे ३,८०० वर्षांपूर्वी घडून गेल्याचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत. या भूकंपाची ‘व्याप्ती’ वाल्दिविआच्या भूकंपापेक्षा मोठी होती. चिली विद्यापीठातील दिएगो सालाझार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं, या भूकंपाचा शोध लावणारं हे संशोधन, ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.

सुमारे ३,८०० वर्षांपूर्वी घडून आलेल्या या भूकंपाची माहिती मिळाली ती, एका त्सुनामी लाटेच्या शोधाद्वारे. ही लाट चिलीच्या उत्तरेकडील अटाकामा या वाळवंटी प्रदेशावर धडकली होती. दिएगो सालाझार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेल्या पुराव्यांनुसार, या लाटेनं चिलीच्या किनाऱ्यावरील भूप्रदेशाची इतक्या प्रचंड प्रमाणात वाताहात केली, की तिथली मनुष्यवस्ती तर पूर्णपणे नष्ट झालीच; परंतु ती पूर्ववत होण्यास तब्बल एक हजार वर्षांचा कालावधी जावा लागला. चिलीच्या पश्चिमेला सुमारे नऊ हजार किलोमीटर दूर असणाऱ्या न्यूझिलंडलाही या त्सुनामीनं तडाखा दिला. हा तडाखा इतका जोरदार होता की, किनाऱ्याजवळच्या तीन-चार मीटर आकाराच्या प्रचंड शिळासुद्धा या लाटेमुळे दूर फेकल्या जाऊन, त्या किनाऱ्यापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर जाऊन विसावल्या.

उत्तर चिलीतला अटाकामा हा प्रदेश अत्यंत शुष्क आहे. इथल्या पावसाची वार्षिक सरासरी ही एक मिलिमीटरपेक्षा कमी आहे. मात्र या शुष्क प्रदेशातही संशोधकांना, खोल समुद्रात राहणाऱ्या सागरी प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. हे सागरी अवशेष सापडलेली विविध ठिकाणं, समुद्रकिनाऱ्याला समांतर अशा सहाशे किलोमीटरहून अधिक लांबीच्या पट्ट्यात पसरली आहेत. या ठिकाणांपैकी अनेक ठिकाणं ही समुद्रकिनाऱ्यापासून कित्येक मीटर दूर आहेत, तसंच काही ठिकाणं ही समुद्रसपाटीपासून काही मीटर उंचावरही आहेत. या शुष्क प्रदेशात अशा प्रकारे सागरी अवशेष सापडणं, ही एक आश्चर्याची बाब ठरली होती. हे सागरी प्राणी इथे कुठून आले, याचा संशोधकांकडून गेली काही वर्षं शोध घेतला जात आहे. यासाठी इथे अनेक ठिकाणी उत्खनन केलं जात आहे. दिएगो सालाझार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उत्खनन झालेल्या ठिकाणांचा आणि तिथे सापडलेल्या अवशेषांचा तपशीलवार अभ्यास केला. संशोधकांनी शोधलेले काही अवशेष हे वर्षानुवर्षं जमत असलेल्या मातीखाली झाकले गेले होते. अवशेषांवरच्या मातीच्या थराची जाडी ही काही ठिकाणी दोन मीटरपर्यंत होती. तसंच काही ठिकाणी या थरांची समुद्रसपाटीपासूनची उंची वीस मीटरपर्यंत होती.

दिएगो सालाझार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेल्या, इथल्या सुमारे तेहतीस हजार सागरी सजीवांच्या अवशेषांत, शैवाल, मासे, मृदुकाय प्राणी, कणाधारी (पृष्ठवंशी) प्राणी, तसंच कणा नसलेले (अपृष्ठवंशी) प्राणी, अशा अनेक प्रकारच्या सजीवांचा समावेश होता. यांतील अनेक प्राणी हे खोल पाण्यात राहणारे सागरी जीव आहेत. या सागरी प्राण्यांच्या अवशेषांबरोबरच, या संशोधकांना इथे विविध प्रकारची सागरी वाळू आणि सागरी दगड-गोटे सापडले. इथे सापडलेल्या, काही ठिकाणच्या अवशेषांत मानवी हाडांचा, कोळशाच्या तुकड्यांचाही समावेश होता. माणसांनी दगडांपासून उभारलेल्या भिंतींचे अवशेषही इथे सापडले. या अवशेषांतील दगड हे ज्या प्रकारे कलंडले होते, त्यावरून या भिंती समुद्राकडून आलेल्या शक्तिशाली लाटेमुळे पडल्या असल्याचं दिसून येत होतं. या सर्व पुराव्यांवरून या सागरी प्रदेशावर त्सुनामीचं आक्रमण झालं असल्याचं स्पष्ट झालं.

यानंतर या संशोधकांनी इथे सापडलेले सागरी प्राणी मृत होऊन किती काळ लोटला असावा, याचा शोध घेतला. यासाठी त्यांनी इथल्या विविध ठिकाणी सापडलेल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शंभराहून अधिक अवशेषांचं विश्लेषण केलं. सजीवाच्या शरीरातील कार्बन या मूलद्रव्याच्या एका विशिष्ट समस्थानिकाच्या प्रमाणावरून, त्या सजीवाचा मृत्यू कधी झाला ते कळू शकतं. या विश्लेषणावरून, या सर्व सजीवांचा अंत सुमारे ३,८०० वर्षांपूर्वी झाला असल्याचं दिसून आलं. यावरून ही त्सुनामी सुमारे ३,८०० वर्षांपूर्वी धडकली असल्याचं कळू शकलं. या भागातील मानवी वस्ती नसण्याच्या काळाचा आणि त्सुनामीच्या काळाचा स्पष्ट संबंध दिसून आला. ही घटना घडण्याच्या अगोदरच्या काळात त्या परिसरात मानवी वस्ती होती. मात्र सुमारे ३,८०० वर्षांपूर्वी तिथली मानवी वस्ती नाहीशी झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर इथे पुनः मानवी वस्ती निर्माण होईपर्यंत तब्बल एक हजार वर्षांचा काळ गेला. इथल्या मानवी वस्तीला या त्सुनामीचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत होतं. अटाकामावर असा विनाशी प्रहार करणारी ही त्सुनामी, एका मोठ्या भूकंपामुळे निर्माण झाली असण्याची शक्यता संशोधकांना वाटली आहे. कारण मुळातच हा भाग भूशास्त्रीयदृष्ट्या सक्रिय आहे.

पृथ्वीचा पृष्ठभाग हा विविध तुकड्यांचा – भूपट्टांचा – मिळून तयार झाला आहे. या भूपट्टांची सतत हालचाल चालू असते. जेव्हा एखादा भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली शिरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला दुसऱ्या भूपट्टाकडून घर्षणजन्य विरोध होतो आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा ताणाच्या स्वरूपात तिथे अडकून राहते. काही काळानंतर मात्र इथल्या पृष्ठभागाला हा ताण सहन करणं अशक्य होतं. त्यामुळे हा पृष्ठभाग आपलं स्वतःचं स्थैर्य गमावतो आणि तो पृष्ठभाग ‘फुटतो’. या सगळ्या प्रकाराचं पर्यवसान अतितीव्र भूकंपात आणि त्सुनामीच्या निर्मितीत होतं. पॅसिफिक महासागरातला नाझ्का हा भूपट्ट चिलीला खेटून वसलेला आहे. हा नाझ्का भूपट्ट, खुद्द चिली ज्यावर वसली आहे त्या दक्षिण अमेरिकन भूपट्टाखाली हळूहळू सरकत आहे. नाझ्काच्या या दक्षिण अमेरिकन भूपट्टाखाली घुसण्यामुळे, चिलीच्या परिसरात अनेक वेळा मोठे भूकंप घडून आले आहेत. सुमारे ३,८०० वर्षांपूर्वी घडून आलेला अतितीव्र भूकंप आणि त्यावेळची त्सुनामी, याच कारणामुळे निर्माण झाली असल्याची शक्यता आहे.

उपलब्ध पुराव्यांवरून मांडलेलं गणित हे, ही त्सुनामी सुमारे वीस मीटर उंचीची असल्याचं आणि तिची लांबी तब्बल आठ हजार किलोमीटर इतकी असल्याचं दर्शवतं. या त्सुनामीचा परिणाम पाहता, या संशोधकांच्या मते या वेळचा भूकंप हा रिश्टर मापनानुसार ९.५ प्रतीचा असावा. दिएगो सालाझार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्सुनामीच्या परिणामांवर आधारलेलं प्रारूप वापरून नाझ्काच्या सरकण्यामुळे तिथल्या भूपृष्ठावर झालेला परिणामही अभ्यासला. या परिणामानुसार, या परिसरातला सुमारे एक हजार किलोमीटर लांबीचा पृष्ठभाग फुटला असल्याचं दिसून आलं आहे.

उत्तर चिलीमध्ये झालेला हा इतिहासातला भूकंप, तीव्रतेच्या दृष्टीनंही ऐतिहासिक ठरला आहे. हा भूकंप रिश्टर मापनानुसार वाल्दिविआच्या भूकंपाइतकाच तीव्र असला, तरी त्याची व्याप्ती मोठी होती. कारण वाल्दिविआच्या भूंकपाच्या वेळी, भूपट्टांच्या हालचालींमुळे सुमारे आठशे किलोमीटर लांबीचा पृष्ठभाग फुटला, तर ३,८०० वर्षांपूर्वीच्या या भूकंपामुळे एक हजार किलोमीटर लांबीचा पृष्ठभाग फुटला होता. या भूकंपानं निर्माण झालेली त्सुनामी फक्त चिली आणि न्यूझिलंडच नव्हे तर, ती ऑस्ट्रेलिआपर्यंत नक्कीच आणि कदाचित जपान आणि रशियाच्या किनाऱ्यापर्यंतही पोचली असण्याची शक्यता आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या, ऑस्ट्रेलिआतल्या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील प्राध्यापक जेम्स गॉफ यांनी या घटनेबद्दल बोलताना एक मोठा धोका व्यक्त केला आहे. ते म्हणतात – “ पॅसिफिक महासागरातील विविध बेटं त्या काळी निर्मनुष्य होती. आज ही बेटं मनुष्यवस्तीनं गजबजलेली आहेत, ती पर्यटकांसाठी आवडीची ठिकाणंही आहेत. जर आता अशी घटना पुनः घडली तर, तिचे परिणाम अत्यंत विध्वंसक असतील…”. हे परिणाम किती विध्वंसक असतील, याची फक्त कल्पनाच केलेली बरी!

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/-v1ZSjHDHzM?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..