नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग १८

फोटो - इंटरनेटवरुन

त्या दिवशी exactly काय घडलं ते आरू सांगत होती.

फोटो – इंटरनेटवरुन

“14 तारखेला आम्ही तिघं खरंतर गढी बघायला जाणार होतो. तोपर्यंत दीने गढीविषयी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. आपण गढी पहायला गेलो की माहिती सांगेन असं ती म्हणाली. परवा आपण देवळात गेलो तेव्हा तू विचारलंस म्हणून दीने आपल्याला गढीची माहिती सांगितली.

पण त्या दिवशी माझा पाय मुरगळल्यामुळे दुखत होता. दी म्हणाली की तिथं खूप चालावं लागेल. ते मला शक्य नव्हतं, म्हणून मी घरीच थांबले. दुपारी दी आणि जिजू बाहेर फिरायला गेले. ते आधी गावातली काही कामं करून मग गढीवर जाणार असे म्हणाले होते. जाताना दीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यावर मॅचिंग पर्स, हलकासा मेकअप, छानसी हेअरस्टाईल असं आवरून ती तयार झाली होती. आज दी नेहमीपेक्षा जरा जास्तच फ्रेश दिसत होती. माझ्या मनात आले, आज व्हेलेंटाईन डे आहे त्यामुळे राज बहुतेक ऑफिशिअली दीला प्रपोज करणार असेल. मला दिलेल्या ग्रीटींगमध्ये कदाचित त्यांनी त्यांच्या आणि दीच्या लग्नासंबंधीही एखादी सजप्राईज तारीख वगैरे डिक्लेअर केलेली असू शकेल असंही मला वाटलं. परत आल्यावर ती दोघं मला कोणती गुड न्यूज देतील याची कल्पना करत मी वाड्यातच त्यांची वाट बघत बसले होते.

दी बाहेर पडल्यानंतर अर्धा तासांनी केळकर साहेब वाड्यावर आले. त्यांचं दीकडे काहीतरी अर्जंट काम होतं. मी त्यांना दी आणि राज गढी बघायला गेलेत असं सांगितलं. तेव्हा काकांनी मला विचारलं की, “त्यांनी सोबत लक्ष्मणला नेलंय का?” मी नाही म्हणाले. “तुम्ही त्या दोघांना एकटंच कसं काय गढीवर जाऊ दिले” असं ते रागाने म्हणाले आणि तरातरा वाड्याच्या मागच्या भागात गेले, काही मिनीटांतच ते लक्ष्मण काकांना घेवून आले आणि गाडीत बसून केळकर काका आणि लक्ष्मण काका निघून गेले.

साधारण सहाच्या सुमारास वाड्याच्या दारासमोर दीने जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली आणि ती एकटीच वाड्यात आली. तिचा चेहरा खूप घाबराघुबरा दिसत होता आणि ती संतापाने फणफणत होती. जाताना ती सुरेख नटली होती पण आता मात्र तिचा अवतार झालेला होता. मी तिला विचारलेही की, “राज कुठे आहे” तर मला काहीच उत्तर न देता ती धावतच जिन्याच्या पायर्या चढत वरच्या खोलीत निघून गेली आणि धाडकन दरवाजा बंद केल्याचा आवाज मला आला. माझा पाय दुखत असल्याने मी पटकन तिच्या पाठोपाठ वर जाऊ शकत नव्हते. तिचं नेमकं काय बिनसलंय हे समजायला मार्ग नव्हता. ती अशी चिडलेली असताना तिला काही विचारण्यात अर्थही नव्हता. दी गाडी घेवून एकटीच परत आली होती.

कदाचित थोड्या वेळाने राज आल्यावर त्यालाच विचारता येईल असा विचार करून मी त्याची वाट पहात बसले. पण रात्र झाली तरी राज वाड्यावर परतला नाही.

केळकर साहेब आणि लक्ष्मणकाका दीच्या पाठोपाठच गढीवर गेले होते, त्यामुळे ते परत आले की त्यांना, तिथं गढीवर नेमकं काय झालंय हे माहित आहे का हे विचारण्यासाठी मी लक्ष्मणकाकांची वाट पहात होते. पण बरीच रात्र झाली तरी लक्ष्मणकाका वाड्यावर परत आल्याचं मी पाहिलं नव्हतं. जेवणाची वेळ झाल्यावर हौसाबाईंनी दोन-तीन वेळा वर जाऊन बोलावूनही दी जेवायला खाली आली नाही. लक्ष्मणकाका दिसत नव्हते म्हणून हौसाबाईंना मी त्यांच्याबद्दल विचारलं, तर त्यांच्या ओळखीच्या कोणालातरी अक्सिडेंट झालाय, त्यांना दवाखान्यात अॅडमिट केलंय म्हणून लक्ष्मणकाका त्याच्या सोबत दवाखान्यातच थांबलेत असं त्या म्हणाल्या.

दीची बराच वेळ जेवणासाठी वाट पाहून शेवटी मी थोडंस जेवून, औषध घेवून वर झोपायला गेले तेव्हा दी अंथरूणात मुसमुसत होती. मी तिला परत विचारले, “ती का रडते आहे? ती एकटीच कशी परत आली? राज अजून कसा परत आला नाही?” तेव्हा “राजशी माझं भांडण झालं म्हणून तो एकटाच परस्पर निघून गेला” एवढंच उत्तर तिनं मला दिलं.

राजची बॅग तर इथंच होती. त्याला इथून मुंबईला परत जायला गाडी तरी मिळाली असेल का? तो घरी गेला असेल की गावातच थांबला असेल? यांचं नक्की कशावरून भांडण झालं असेल? याचा रात्रभर विचार करत मी झोपी गेले.

दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही दोघी मुंबईला परत यायला निघालो. उठल्यापासून “आपण आज परत चाललोय” एवढंच दी माझ्याशी बोलली होती. बॅग भरताना मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की, जिजूनी मला दिलेलं ग्रीटींग माझ्या बॅगमध्ये नव्हतं. दीला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. तरी निघण्यापूर्वी मी राजच्या मोबाइलला कॉल करून बघितलं, पण तो बंद होत. जाताना राजचीही बॅग सोबत घेवून आम्ही मुंबईला परत आलो. वाटेतही दी माझ्याशी काहीच बोलली नाही.

त्या दिवसानंतर कितीतरी दिवस दी माझ्याशी एकही शब्द बोलत नव्हती. सतत तिच्या खोलीत दार बंद करून बसत असे. मी सुरूवातीला तिला चहा नाष्टा घेण्यासाठी, जेवणासाठी बोलवायला जात असे. तिला बरं वाटतंय का हे बघून येत असे. राजचा काही फोन आला का? तुमचं भांडण मिटलं का? असं विचारत असे. पण ती कशाचंच उत्तर मला देत नसे.

मी माझ्या मोबाईलवरून राजच्या मोबाईलवर खूप वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा नंबर बंद आहे असाच रिप्लाय येई. तो मुंबईत कुठं रहात होता, त्याचे कुणी नातेवाईक होते का, मुंबईतलाच होता की बाहेरून कुठून आला होता याची मला काहीच माहिती नव्हती. या कालावधीत राजच्या ओळखीचेही कोणी आमच्याकडे त्याची चौकशी करण्यासाठी आले नाहीत याचेही मला आश्चर्य वाटले.

माझं रोजंचं रूटीन, कॉलेज, अभ्यास या सगळ्यात मी गुंतुन गेले, त्यामुळे काही महिन्यांत मीही हळूहळू राजला विसरून गेले.

काल रात्री ज्या पद्धतीने दी झोपेतून ओरडत उठली, तशी ती आम्ही गावावरून परत आल्यापासून बर्याचदा ओरडत उठत असे. आमच्या दोघींच्या बेडरूम सेपरेट होत्या, पण शेजारी शेजारी होत्या, त्यामुळे ती मोठ्यानी ओरडल्याला आवाज मला ऐकू येत असे, पण ती काय बोलतेय ते शब्द कधी मला ऐकू आले नाहीत. तिचा आवाज ऐकून मी उठले आणि तिच्या दारावर कितीही थापा मारल्या, हाका मारल्या तरी ती दार उघडत नसे. मी विचारले तर उत्तर देत नसे. मग मी पण विचारणं बंद केलं. मी स्वतःला माझ्या ऑर्केस्ट्राच्या कामात गुंतवून टाकलं.

एकदा संध्याकाळी मी घरी आले तर दी चक्क हॉलमध्ये माझी वाट पहात होती. तिनं एक छोटासा केक मागवला होता आणि केकवर राजचं नाव लिहीलं होतं. केकवर एकच मेणबत्ती लावली होती. त्या दिवशी राजचा बर्थडे होता. मला खूप आनंद झाला. मला वाटलं की, राज परत आला असावा आणि दुसरं म्हणजे आज इतक्या दिवसांनी दी स्वतःहून खोलीतून बाहेर आली होती. मी आत जावून राज कुठे दिसतोय का पाहून आले पण तो कुठेच नव्हता. दीने मेणबत्ती विझवली आणि स्वतःच केक कट केला “हॅपी बर्थडे टू राज” असं म्हणाली आणि मला केक भरवला.

मला दीनं शेजारी बसवलं आणि परत एकदा विचारलं, “आरू, मला अगदी मनापासून सांगशील? तुझं राज बद्दल काय मत होतं? तुला राज आवडत होता ना? तू राजला खूप मिस करतीस का?”

मी म्हणाले “हो दी, मला राज मनापासून आवडत होता, कारण त्यानं आपले आई बाबा गेल्यावर आपलं घर सावरलं. तुला परत माणसांत आणलं. माझ्यावर तु करतेस इतकीच माया केली. माझे सगळे हट्ट पुरवले. मला असं सारखं वाटत होतं की तुम्ही दोघांनी लग्न करावं म्हणजे आपल्या घराला घरपण मिळालं असतं. आपल्याला जिजूचा किती आधार होता. ते असले की मला खूप सुरक्षित वाटायचं. पण तू कधी मोकळेपणाने या विषयावर माझ्याशी बोललीच नाहीस आणि लग्नाचंही मनावर घेतलं नाहीस.”

माझं हे बोलणं ऐकून दी एकदम किंचाळलीच, “काय, तू राजला तुझा जिजू समजत होतीस?”

“हो दी, मी तुला कितीवेळा याबद्दल आडून आडून विचारलं, पण तुला जिजू पसंत आहे की नाही, तू लग्न करणार की नाही, याचा तू मला काही थांगपत्ताच लागू देईनास मग मी त्याला तुझ्यासमोर डायरेक्ट जिजू कसं म्हणणार? पण मी राजला जिजू मानते हे माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माहित होते, ते सगळेही राजचा उल्लेख जिजू असाच करत होते.”

फोटो – इंटरनेटवरुन

दीचा चेहेरा एकदम काळा ठिक्कर पडला. ती चक्कर येवून एकदम सोफ्यावर पडली. मला तर काय करावं काहीच सुचेना. मी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला जागं केलं. सोफ्यावर नीट टेकून बसवलं. थोडं पाणी प्यायला दिलं. तिला सावरायला 5-10 मिनीटं वेळ लागला. मी तेवढ्यात कॉफी करून आणली. थोडी कॉफी प्यायल्यावर तिला जरा हुशारी आली. ती अविश्वासानं माझ्याकडं पहात होती.

“दी काय झालं? तू असं का विचारलंस मला?”

“तुला खरंच राज जिजू म्हणूनच आवडत होता? तुला त्याच्याबद्दल बाकी काही वाटत नव्हतं?”

“नाही दी, खरंच नाही. मला तर तुम्ही लग्न कराल अशीच खात्री वाटत होती. आणि आपण गांवी गेलो तेव्हा 14 तारखेला व्हेलेंटाईन डे होता, त्यामुळं तुम्ही दोघं कदाचित लग्नाचं जाहीर कराल असा माझा अंदाज होता, आणि नेमकं त्या दिवसापासून जिजू गायब आहे. दी आता तरी मला सांगशील का त्या दिवशी नेमकं काय झालं?”

हे ऐकून दी एकदम रडायला लागली. “मी हे काय करून बसले?” असं म्हणून ती फडाफडा स्वतःच्या मुस्काटात मारून घेऊ लागली. रडत रडत ती म्हणत होती, “मी तुला परत एकदा विचारायला पाहिजे होतं आरू. माझंच चुकलं. मी हे काय करून बसले?” आणि झटकन उठून ती परत तिच्या खोलीत निघून गेली आणि दार बंद करून घेतलं. मी तिच्या मागोमाग धावत गेले. तिला खूप हाका मारल्या, पण तिनं दार उघडलं नाही.

रात्रभर मी तिच्या रूमबाहेर बसून होते. खूपवेळ तिच्या खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. मग कधीतरी मला दाराबाहेरच झोप लागली.

सकाळी कामवाल्या मावशी आल्यावर त्यांनी मला जागं केलं. मग आम्ही दोघींनी दीला हाका मारायला सुरूवात केली. आमच्या दोघींच्या हाकांचा आवाज ऐकून दीनं दार उघडलं. दीचा नुसता अवतार झाला होता. केस विस्कटले होते. रडून रडून डोळे सुजले होते. तिनं एकदम मला मिठीत घेतलं आणि ती परत रडायला लागली.

“आरू, माझ्या हातून खूप मोठी चूक झालीय. मी तुझ्याबद्दल माझ्या मनात गैरसमज ठेवून तुझ्याशी अबोला धरला. मला माफ कर. मी तुझा खूप मोठा अपराध केलाय. मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. आपण परत पहिल्यासारखं जगूया. मला माफ कर. मला माफ करशील ना? प्लीज……”

मला खरं तर कळतच नव्हतं की दीची काय चूक झालीय…. पण ती सारखं “मला माफ कर.. मी तुझा खूप मोठा अपराध केलाय” म्हणत होती, म्हणून मी तिला म्हणाले, “माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच शंका किंवा राग नाहीये दी, मग मी माफ करायचा प्रश्न येतोच कुठे? आणि समजा, तू काही चुकली असशील किंवा कळत नकळत तुझ्या हातून काही चूक झाली असली, तरी मी लहान बहीण आहे तुझी, आईसारखी माया करून वाढवलंयस तू मला, मग तुला तेवढा अधिकार निश्चितच आहे की, माझ्यासाठी जे योग्य असेल ते तू करू शकतेस. तर आता तू मनावर कोणताही ताण घेवू नकोस आणि आधी खाली चल. तू माझ्याशी पुन्हा बोलायला लागलीस हीच माझ्यासाठी लाखमोलाची गोष्ट आहे. चल, आपण चहा घेवूया.”

मी अत्यानंदाने ओरडले, “मावशी, चहा आणा आणि आमच्यासाठी काहीतरी दीच्या आवडीचा नाष्टापण करा.”

“दीsss, खूप दिवसांत आपण गप्पाच मारलेल्या नाहीत. मला किती काय काय बोलायचंय तुझ्याशी. आज आपण अगदी पोटभर गप्पा मारूया.”

त्या दिवसानंतर हळूहळू दी पुन्हा नॉर्मल झाली आणि आम्ही पहिल्यासारख्या बोलायला लागलो. पण ते घरापुरतंच मर्यादित होतं. दी बाहेर जात नव्हती. मी माझ्या कॉलेज, प्रोग्रॅम्स, रिहर्सल्स ह्यांत गुंतून गेले. पण नंतर आमच्यात राजचा विषय कधीच निघाला नाही. तो कुठे गेला, काय करतो, कसा आहे काहीच पत्ता लागला नाही.

सुरूवातीला मी दीला म्हणाले होते की आपण राज नाहीसा झालाय हे पोलिसांना कळवू या का, पण तीने पोलीसात जायला ठाम नकार दिला. त्यामुळं राजच्या नाहिसं होण्याचं रहस्य तसंच राहिलं आणि ते फक्त दीलाच माहिती आहे.”

बस्स, एवढंच मला आठवतंय.”

“बरं झालं तू मला हे सगळं सांगितलंस. आता आपल्याला लताच्या मनात नेमकं काय टोचतंय ते शोधायला सोप्पं पडेल. तिनं आजपर्यंत तुला काहीच सांगितलं नसलं तरी मला खात्री आहे की, ती तिच्या मनातलं मला नक्की सांगेल. आणि एकदा का मला तिच्या मनातलं कळालं, की आपण त्यावर योग्य ते सोल्युशन काढू. कदाचित तुझी दी तुला पहिल्यासारखी परत मिळेल. आणि सगळं सुरळीत झालं की मग मी लगेच तिच्याकडे तुझा हात मागतो. कशी आहे आयडिया?”

“मस्त…मग आजच हे काम करून टाकूया.”

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट 

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..