नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग २९

फोटो - इंटरनेट

……….ज्या दिवशी नीलने राजला हॉस्पिटलमध्ये ओळखले त्यानंतर त्याच्यात ट्रिमेंडस बदल होत गेले. नील, तू सांग त्यावेळी काय झालं ते.

भाग २९ वा – शेवटचा

नील : मी हॉस्पीलटच्या दारात दादाला पाहताच ओळखलं होतं. गेले साडेतीन वर्ष ज्या भावाला मी जीवाची वणवण करून हुडकत होतो, तो असा अचानक, जीवंतपणी माझ्यासमोर पाहून त्यावेळी मला धक्का बसला आणि मला भोवळ आली.  डॉक्टरकाकांनी माझ्यावर उपचार करून मला ठीक केलं.  मग मी त्यांना माझ्याबद्दल आणि राजबद्दल सगळं सांगितलं.  मला भेटून दोनही डॉक्टर काकांना खूप आनंद झाला.  त्यांनी दादावर आत्तापर्यंत केलेले उपचार आणि याची प्रगती याबद्दल सगळी माहिती मला दिली.

मग आम्ही तिघं राजदादाला भेटायला त्याच्या हॉस्पिटलमधल्या रूममध्ये गेलो.  त्याच्या डोळ्यांत मला कोणतीच ओळख दिसली नाही.  पण जेव्हा मी आवेगानं धावत जाऊन त्याला मिठी मारली तेव्हा, माझ्या स्पर्शानं त्याच्या अंगात विज सळसळावी तशी प्रतिक्रिया डॉक्टरांना दिसली.  गेल्या साडेतीन वर्षात दादानं अशी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.  मग मी त्याच्या शेजारी, त्याचा हात हातात घेवून बसून राहिलो.  त्याला जेवण भरवलं.  औषधं दिली. हे सगळं करताना मी त्याला दादा हे खा, दादा पाणी पितोस का? दादा जरा औषध घे बरं, दादा आपण लहानपणी काय काय गंमत करायचो ते तुला आठवतंय का? असं म्हणून लहानपणीच्या बर्‍याच गंमती जमती सांगत बसत होतो आणि तो चक्क मला चांगला रिस्पॉन्ड करत होता.

डॉ. प्रशांत जोशी : हा रिसपॉन्स बघून आम्हालाही खात्री पटली की नील राजचा सखखा भाऊ आहे.  मग आठवडाभर नील इथं राहिला.  आम्ही राज कशाकशाला चांगला रिसपॉन्स देतोय ते पाहिले आणि त्याप्रमाणे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये बदल केले.

राज पूर्ण बरा होईपर्यंत, नीलला, तो इथं आलाय आणि त्याला राज सापडलाय हे कुणालाच सांगायचं नव्हतं.  त्यामुळे नीलच्या आई बाबांनासुद्धा राज सापडल्याचं कळवलं नव्हतं.  नील जास्त दिवस मुंबईतून गायब राहिला असता तर तुम्हालाही संशय आला असता, त्यामुळे त्याला मुंबईला परत जाणं भागच होतं. म्हणून आम्ही आठ दिवसांत नीलच्या आवाजातील वेगवेगळे शब्द आणि वाक्यं रेकॉर्ड करून घेतली आणि मग ते आवाज चालू करून लक्ष्मण आणि हौसाबाई राजला एक एक कृती करायला शिकवू लागल्या.  यापूर्वी तो स्वतःहून अजिबात चालू शकत नव्हता.  एकतर त्याच्या अंगात ताकद कमी होती आणि त्याचा मेंदू, चालण्याची कमांड समजून घेत नव्हता. मग आठ दिवसात नीलने त्याला व्हिलचेअरवरून उतरवून हळू हळू चालायला शिकवलं.  त्यावेळीही नील सतत राजशी बोलत असे.  हळूहळू तो चालायला शिकला.  मग रोज लक्ष्मणकाका राजला सकाळ संध्याकाळ फिरवायला लागले, त्यामुळे मग खाल्लेलं अन्न पण चांगलं पचायला लागलं आणि औषधांनाही राजचा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.

डॉ. प्रकाश जोशी : नील जरी मुंबईला परत गेला तरी तो सतत आमच्या संपर्कात होता.  आम्ही चौघंही राजच्या प्रगतीचा दर आठवड्याला आढावा घेत होतो.  त्याच्या वागण्यात होणार्‍या बदलांची नोंद करत होतो. गेल्या साडेतीन वर्षाच्या तुलनेत, नील राजला भेटल्यानंरची राजची प्रगती ट्रिमेंडस होती. त्यातच मागच्या महिन्यातएका कॉन्फरन्ससाठी माझा एक डॉक्टर मित्र रूपेश अगरवाल हा भारतात आला होता.  तो अशाच विषयांवर संशोधन करत होता.  आम्ही त्याला केस स्टडीसाठी म्हणून राजची केस पाठवली.  त्याला ती खूपच इंटरेस्टिंग वाटली म्हणून तो मुद्दामहून राजला भेटण्यासाठी इथं, आपल्या गांवी येवून गेला. राजचे सगळे रिपोर्ट पाहून मग आम्ही एक प्रयोग करायचं ठरवलं. त्यासाठी नीलची परवानगी आणि सहभाग दोन्हीची गरज होती.

आरू : कसला प्रयोग करणार होता तुम्ही?

डॉ. प्रशांत जोशी : डॉ. रूपेशने सूचवल्याप्रमाणे आपण राजला परत पूर्वीसारखं होण्यासाठी दोन प्रकारे प्रयोग करू शकत होतो. एक म्हणजे त्याला गढीच्या छतावर नेवून, अर्थात त्याच्या सुरक्षिततेचे सर्व उपाय अवलंबून मगच, तो पूर्वी जसा छतावरून विहीरीत कोसळला, तसा त्याला परत वरून विहिरीत ढकलणे.  ज्यामुळे मागच्या प्रसंगाची त्याच्या मनावर आणि शरीरावर उजळणी होवून तो पूर्ववत होण्याचे चान्सेस 60 टक्के होते.  पण जर आपण कितीही खबरदारी घेतली आणि खाली पडताना आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळं काहीतरी झालं तर दोन शक्यता होत्या, एक तर तो पूर्ण बरा झाला असता किंवा जर त्या धक्क्याने त्याच्यावर विपरीत परिणाम झाला असता, तर आपण राजला कायमचा गमावून बसलो असतो.

आरू : बापरे….. म्हणजे असं करणं धोकादायक होतं.

डॉ. प्रशांत जोशी : अर्थात.  हे धोकादायकच होतं.  दुसरा उपाय म्हणजे, जो प्रसंग तुम्ही परवा गढीवर अनुभवला तो, म्हणजे राज आणि लताच्यात शेवटी जे भांडण झालं तसा प्रसंग पुन्हा निर्माण करून, त्या सगळ्याचं साक्षीदार राजला बनवणं.  ज्यामुळे त्याच्या स्मृती परत जागृत होवून तो आपोआपच बरा झाला असता.  ही कल्पना यशस्वी होण्याची शक्यता 90 टक्के होती.  त्यामुळं आम्ही हाच उपाय करून बघायचे ठरवले. गेले सहा महिने प्रत्यक्ष खूप वेळा आणि इतर वेळी टेपवरून नीलचा आवाज ऐकून राज त्या आवाजाकडे लक्ष द्यायला शिकला होता.  त्याचा मेंदू नीलच्या आवाजात येणार्‍या सुचना ग्रहण करायला शिकला होता.  त्यामुळे नील लताशी बोलत असताना त्यांचे आवाज ऐकून त्याची स्मृती जागृत होण्याच्या ठोस शक्यता होत्या.

नील : केळकरकाका आणि लक्ष्मणकाकांच्या अंदाजानुसार लताने राजला वरून ढकलून दिले होते.  त्यामुळे हीच शक्यता विचारात घेवून आमचा असा प्लॅन होता की, मी आणि लता छतावर आलो की, खाली गण्या आणि त्याची माणसं आधिपासूनच तयार असतील.  ज्याक्षणी लता कबूल करेल की तिने राजला वरून ढकलून दिले त्याक्षणी मी छतावरून खाली उडी मारणार होतो किंवा संतापाच्या भारात कदाचित लता मला खाली ढकलून देईल, जर असे घडले तर, मी जरी खाली पडलो असतो तरी विहीरीत आधीपासूनच गवताच्या पेंड्या टाकलेल्या होत्या आणि गणूची टीम तयारच होती. आणि हा सगळा प्रसंग पाहून राजच्या स्मृती जागृत होतील आणि तो बरा होईल अशी आम्हाला खात्री वाटत होती.

डॉ. प्रशांत जोशी : राज जिवंत असल्यामुळे आपण लताला शिक्षा करण्याचा विषयच येत नव्हता.  फक्त ह्या प्रसंगाचं नाट्य परत घडल्यानं, तिच्या मनावर जे राजच्या खूनाच्या अपराधाचं ओझं होतं ते निघून गेलं असतं आणि राज बरा झाला असता, तर दोघं परत एकत्र आले असते.

केळकर : या सगळ्या गोष्टींवर आम्ही खूप दिवस विचार करून, सर्व शक्यतांचा उहापोह करून मगच हा प्लॅन बनवला आणि त्याप्रमाणे नीलनं गावी येण्याचा विषय काढून, ताईसाहेबांना तो इकडं घेवून आला.  फक्त हा सगळा प्लॅन करताना आम्ही राज आणि नील ह्यांच्यावर काय परिणाम होईल किंवा यांनी कसे वागायला पाहिजे, या बाबतीत काय काय होईल याचाच विचार केला होता.  पण प्रत्यक्ष मात्र ताईसाहेब या घटनेवर ज्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट झाल्या, म्हणजे ’स्वतःला शिक्षा करण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःच छतावरून विहीरीत उडी मारली,’ या गोष्टीचा आम्ही अजिबातच विचार केला नव्हता.  सुदैवानं विहीरीला जाळी बसवलेली असल्यामुळं, त्यावर गवताचे भारे टाकलेले होते आणि ऐनवेळी गण्या आणि सगळी मंडळी उपलब्ध होती, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

नील : डॉक्टरकाका तुम्ही दोघंजणं, केळकरकाका, लक्ष्मणकाका, हौसाबाई, गणू या सगळ्यांनी मला या बाबतीत मदत केलीत म्हणून मी आज परत माझ्या दादाला माणसांत आलेलं पाहू शकलो.  तुमचे आभार मानून मी तुमच्या भावनांचा अपमान करणार नाही, पण तुमचा सगळ्यांचा मी यासाठी आयुष्यभर ऋणी राहणंच पसंत करीन.

आरू : हे सगळं माझ्या कल्पनेच्या आणि विचारांच्या पार पलीकडचं आहे.  नील बरं झालं तुम्ही मला आधी हे काही सांगितलं नाहीत ते.  मला खरोखरच हे काही समजलं नसतं.  पण डॉक्टरकाका, मला एक गोष्ट समजली नाही.

डॉ. प्रकाश जोशी : कोणती बेटा ?

आरू : तुम्ही सगळेच जर नीलला आधीपासून ओळखत होता, तर आमच्याबरोबर नीलला आलेलं पाहून तुम्ही प्रत्येकाने त्याला ओळख दाखवली नाही आणि तरीपण आधी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय असं का म्हणालात?

डॉ. प्रकाश जोशी : तो ही आमच्या प्लॅनचाच एक भाग होता.  आरू, आम्ही नीलला ओळख दाखवली असती तर, तुझ्या कदाचित ही गोष्ट लक्षात आली नसती, पण तुझी दी खूप शार्प आहे,  तिला जरा जरी शंका आली असती, तर तिने एक तर नीलवर विश्वास ठेवला नसता आणि खरं काय आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता.  मग हे इतके महिने रिहर्सल केलेलं नाटकं रंगमंचापर्यंत पोहोचलंच नसतं.  नाही का?

आरू : बापरे, डॉक्टरकाका तुम्हा सर्वांना या गोष्टींचा किती पद्धतीने विचार करावा लागला होता.  पण हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झालं. म्हणून यासाठी मी ही तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे.  अर्थात मलाही आयुष्यभर तुमच्या ऋणातच रहायला आवडेल.  पण आता या सगळ्यातून माझ्या दीला बरं व्हायला किती कालावधी लागेल?  ती या धक्क्यातून बाहेर येईल ना?

डॉ. प्रकाश जोशी : हो निश्चितच.  आता तिच्यावरच्या ट्रीटमेंटचा भाग म्हणून, नीलने राजच्या सोबत जे उपचार केले, जवळपास तसेच प्रयोग आपण राजकडून तुझ्या दीवर करणार आहोत.  राजचा आवाज ऐकून, तुम्हा सगळ्यांचं तिच्याशी प्रेमळ, आश्वासक, वागणं बोलणं पाहून, आपण अपराधी नाही आहोत हे तिला हळूहळू पटायला लागेल. ती घटना ही निव्वळ एक अपघात होती हे आपण तिला पटवून देवू.  थोडा कालावधी जाईल यासाठी…. पण तोपर्यंत राजची प्रकृतीपण उत्तम होईल. तोही पहिल्यासारखा राजबिंडा दिसायला लागेल.

डॉ. प्रशांत जोशी : आणि बरं का रे नील.  राज सापडलाय आणि तो सुखरूप आहे, हे आता दिल्लीला फोन करून तुझ्या आईबाबांना कळंव, फक्त त्याला भेटायला थोडं उशीरा या असं सांग, म्हणजे त्यांनापण राज सुखरूप आहे हे ऐकून आनंद होईल.

आरू : पण डॉक्टरकाका, नीलच्या आईबाबांना हे सगळं कळलं तर ते माझ्या दीबद्दल काय विचार करतील?

केळकर : आरूताई, मग आम्ही सगळे कशाला आहोत?  एका नाटकाचा Full Experience आहे आम्हाला.  आता एकत्र जमलोच आहोत तर एक नवीन गोष्ट तयार करू. राजसाहेबांना कसा अपघात झाला? त्यांना कुणी वाचवलं? मग योगायोगानं त्यांची आपल्याशी गाठ कशी पडली वगैरे वगैरे…… जेणेकरून ताईसाहेबांवरपण काही आळ येणार नाही आणि राज साहेबांना तर गढीवर काय झालं ते काही आठवतच नाहीये. हो की नाही डॉक्टरसाहेब?

हे ऐकून सगळेच मनमुराद हसायला लागले.

डॉ. प्रकाश जोशी : आरू बेटा, तुम्हाला जास्तीत जास्त आठवडाभर इथं रहावं लागेल. मग तुम्ही राज आणि लताला तुमच्या बंगल्यावर घेवून जाऊ शकता. तुमच्या बरोबर एक प्रशिक्षीत नर्स पाठवायचीही मी व्यवस्था करतो.  रोज रात्री आपण कॉल करून त्यांच्या प्रगतीचा आढावा घेत जाऊ, त्यानुसार त्यांची ट्रिटमेंट चालू ठेवू.  मग सगळं काही व्यवस्थित होईल.

डॉ. प्रशांत जोशी : लता आणि राज, दोघेही व्यवस्थित बरे झाले की मग आम्हा दोघा भावांना एकदा दिल्ली वारी करावी लागेल.

आरू आणि नील एकदम म्हणाले : दिल्ली वारी, ती का?

दोन्ही डॉक्टर एकदम म्हणाले : का म्हणजे काय? आमच्या दोन्ही लेकींच्या लग्नाची बोलणी करायला जोगळेकरांकडे जायला नको का आम्हाला?

हे ऐकून मात्र आरू एकदम् झक्कास लाजली आणि सगळ्यांच्या हास्यकल्लोळात कॉन्फरन्स हॉल दुमदुमून गेला.

॥ शुभं भवतु ॥

— © संध्या प्रकाश बापट 

— समाप्त —

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

4 Comments on अजब न्याय नियतीचा – भाग २९

  1. शेवट पर्यन्त उत्सुकता ताणून ठेवणारी कथा आहे मी माझ्या ग्रुप मध्ये तसेच माझ्या मिस्सेस च्या ग्रुप मध्ये ही कथा रोज एक एपिसोड च्या प्रमाणे पाठवत होतो सगळ्यांचा खुप छान रिस्पॉन्स होता आपल्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

    • आपल्याला माझी कथा आवडली आणि आपण ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेत, त्याबाद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे.

  2. अजब न्याय नियतीचा फारच उत्कंठादायक व रोचक कथा आहे. लेखिकेच्या नावासहित आमच्या ग्रूपवर कथा टाकली असता जबरस्त प्रतिसाद मिळाला. सौ. बापट यांचे आभार. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

    • आपल्याला माझी कथा आवडली आणि आपण ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेत, त्याबाद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..