ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनंतर नीलच्या गाडीतून चारू, आरू आणि नील गांवी जायला निघाले. मुंबईपासून गावापर्यंचे अंतर ४५० ते ५०० किलोमीटर तरी होते. पण गाडीत छानशी गाणी ऐकत, गप्पा मारत, अधुन मधून रस्त्यात निसर्गरम्य परिसरांत थांबून तिथले फोटो काढत, रमत गमत संध्याकाळ्च्या सुमारास ते गांवी पोहोचले.
गांवात प्रवेश करतांच गांवात झालेले बाह्य बदल लगेच आरू आणि दीच्या नजरेने टिपले. गांवातील रस्ते चांगले डांबरी झाले होते …… बऱ्याच जुन्या घरांच्या जागी नवीन दुमजली घरे उभारलेली दिसत होती ……रस्त्याच्या कडेने छोटी मोठी शॉपिंग सेंटर्स उघडलेली दिसत होती …… गांवात सगळीकडेच वीज आली होती …… रस्त्याने बऱ्यापैकी लोकांची वर्दळ दिसत होती …… मध्येच काही दुचाकी वाहनांची ये-जा चालू होती …… एकंदर गांवाचा बऱ्यापैकी कायापालट झालेला दिसत होता …… सोई सुविधांच्या दृष्टीने हे बदल निश्चितच चांगले होते पण दीच्या लहानपणीच्या आठवणीतल्या गांवाच्या प्रतिमेला तडे देत होते ……अजून काय काय बदललेले पाहायला मिळेल याचा विचार करत दी बाहेरचा परिसर न्याहाळत होती. हळूहळु गावच्या बाजारपेठेतून बाहेर पडून त्यांची गाडी शेतांमधून गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या वाड्याच्या दिशेने जाऊ लागली.
आरू आता नीलच्या शेजारी पुढच्या सीटवर बसली होती. ती त्याला रस्ताही सांगत होती आणि गावातील महत्वाच्या ठिकाणांची माहितीही सांगत होती. नील मात्र आज जाsssम खुश झाला होता. एक तर तो पहिल्यांदाच इतक्या जवळून गांव पाहत होता आणि अनुभवत होता. त्याला दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टींचं खूप अप्रूप वाटत होतं. रस्त्याने जाताना त्यांना वाटेत दिवसभर शेतात काम करून शेतावरून परतणारे शेतकरी, बैलगाड्या, गाई म्हशींचे तांडे क्रॉस होत होते…… रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या गुरांच्या खुरांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे गांवच्या मातीचा सुगंध, धुळीबरोबर हवेत पसरत होता…….शेतकऱ्यांचे पेहेराव पाहून त्याला गम्मत वाटत होती…… गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगुरांचे आवाज…… मालकांनी त्यांच्या जनावरांना मारलेल्या हाळ्या…… डोक्यावरून गवताचे, मोळ्यांचे भारे वाहात लगबगीने एका विशिष्ट लयीत चाललेल्या महिला…… बकऱ्या, शेरडं हाकलत जाणारी छोटी छोटी मुले…… महिलावर्गाची संध्याकाळच्या कामांसाठी चाललेली लगबग…… आजूबाजूच्या कौलारू घरातून निघणाऱ्या आणि वाऱ्याच्या प्रवाहावर विहरणाऱ्या धुरांच्या रेषा…… घरोघरी बनत असलेल्या जेवणाचा येणारा खमंग वास…… रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांमधून होणारे नदीपात्राचे दर्शन……त्यावर चकाकणारी सोनेरी किरणे……हिरवीगार झालेली शेतं……झाडांच्या फांद्यातून, पानांमधून मावळतीला चाललेल्या सूर्यनारायणाचे होणारे मनमोहक दर्शन…… जणू झाडांआडून सूर्य त्यांच्याशी लहान मुलांसारखा लपंडाव खेळात होता …… नदीकिनाऱ्यावरील घाटांवर बांधलेल्या देवळांतून येणारे सुरेल घंटानाद या सगळ्याने नील अगदी भारावून गेला होता.
थोड्याच वेळात ते वाड्यापाशी येऊन पोहोचले.
सायंकाळची वेळ झाल्यामुळे सगळीकडे दिवेलागण झाली होती. वाड्याच्या भव्य प्रवेशद्वारावर मोठे दिवे प्रकाशत होते त्यामुळे वाड्याचे बाह्यरूप खुलून दिसत होते. वाड्याच्या दाराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज येताच वाड्याच्या देखभालीसाठी ठेवलेल्या कुटुंबातील लक्ष्मण तगबगीने धावत बाहेर आला. साधारण ४५ ते ५० वयाचा, शेतात राबून करपलेल्या त्वचेचा, बलदंड शरीरयष्टी असलेला, उंचापुरा असा दिसणारा आणि पिळदार मिशा पण चेहेऱ्यावर निर्मल हसू असलेला लक्ष्मण त्यांना समोरा आला. दी आणि आरुला गाडीतून उतरताना पाहून त्याला मनापासून झालेला आनंद त्याच्या चेहेऱ्यावरून ओसंडून वहात होता. त्याने हसून त्यांचे स्वागत केले आणि गाडीतील सामान उतरवून घ्यायला तो मदत करू लागला.
नील गाडीतून उतरताच त्याचे नीलकडे लक्ष गेले आणि क्षणभर तो चपापून नीलकडे पहातच राहिला. तेव्हड्यात दीचे त्यांच्याकडे लक्ष गेले. तिने हसून नीलची ओळख करून दिली, “लक्ष्मणकाका, हे नील जोगळेकर, आमचे मित्र आहेत, ते पहिल्यांदाच आपल्या गावाला आले आहेत, ते आमच्या बरोबर इथेच वाड्यावर राहणार आहेत. त्यांच्यापण राहण्याची व्यवस्था करा.”
“ठीक हाय ताईसाहेब, समदी वेवस्था होईल. तुमि काय बी काळजी करू नगा.”
बोलत बोलत ते वाड्याच्या दारातून आंत प्रवेश करू लागले तसे लक्ष्मणने त्यांना थांबवले आणि म्हणाला, “ताईसाहेब, वाईच दोन मिंट उंबऱ्यापाशीच थांबा, आंत जाऊ नगा.” त्यांना कळेचना की हा असा उंबऱ्यापाशी का थांबायला सांगतोय.
त्याने वाड्याच्या दारातूनच आत डोकावून आवाज दिला, “मालकीणबाई आल्या हायती बरं का, या बेगी बेगी.”
आंतून लक्ष्मणची पत्नी हौसाबाई, साधारण ४० ते ४2 वयाची, नऊवारी लुगडं चापून चोपून नेसलेली, कपाळावर आडवी लाल कुंकवाची चिरी रेखलेली, चेहेऱ्यावर अनेक ठिकाणी हिरव्या गोंदवलेल्याच्या खुणा असलेली, दोन्ही हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा घातलेली, मायाळू चेहेर्याची स्त्री, हातात भाकरतुकडा आणि पाणी घेऊन आली. तिने तो भाकरतुकडा तिघांवरून ओवाळून टाकला आणि पायावर पाणी घालून, त्यांच्या डोळ्यांना पाणी लावून मग त्यांना ती आतमध्ये या म्हणाली.
“ताईसाहेब, किती वर्षांनी या वाड्याकडं आलासा तुमि? तिनिसांजेच्या वक्ताला आलासा न्हवं, म्हणून भाकरतुकडा वोवळून टाकला बगा. या आता बिंदास आतमंदी. दमला असाल ना दिवसभर परवास करून? मी तुमा समद्यास्नी चा आणि खायला घिवून येते. तुमि तोवर आवरून बसा … आलेच.” असं म्हणून ती आतमध्ये निघून गेली.
थोड्याच वेळात तिघंही फ्रेश झाले. वाडा जरी जुना असला तरी बांधकाम सुंदर होते. आतमध्ये आवश्यक त्या सर्व आधुनिक सुखसोयी सुविधा करून घेतलेल्या होत्या. सगळीकडे लाईट असल्यामुळे वातावरण प्रसन्न होते. गप्पागोष्टी करत मजेत प्रवास झालेला असल्यामुळे कुणालाच तसा फारसा थकवा आलेला नव्हता. लक्ष्मणने त्यांचे सामान वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या खोल्यांमध्ये नेऊन ठेवले होते. सगळीजणं हातपाय धुवून, कपडे बदलून, ताजी तवानी होऊन खाली जेवणाच्या हॉलमध्ये टेबलावर येऊन बसली. तेवढ्यात हौसाबाई सगळ्यांसाठी गरम गरम उपमा आणि चहा घेऊन आली. हौसाबाईच्या हाताला छान चव होती आणि चांगलीच भूक लागली असल्याचे उपमा आणि चहा घेऊन तिघेही खुश झाले.
दी हौसाबाईंना म्हणाली, “हौसाबाई, इतकी वर्ष झाली मी तुमच्या हातचे पदार्थ खातेय, पण तुमच्या हातची चव काही बदलली नाही बघा. किती छान बनावता तुम्ही सगळं.”
हौसाबाई लाजून म्हणाल्या, “कायतरीच काय वो ताईसाहेब, मी आपलं रोजच्या सारकच बनविते. तुमास्नी ते ग्वाड लागतंय हे माझं भाग्यच. बरं रातच्याला जेवाय काय बनवू?”
“वांग्याची भाजी, गरम भाकरी, त्यावर लोणी आणि मिरचीचा खरडा बनवा जास्त कोथींबीर घालून, आणि हो तुम्ही तो चुलीवर सुट्टा भात बनवता ना तसा बनवा त्यासोबत मस्त कढी. काय ग आरू, चालेल ना?”
“चालेल काय पळेल दी, पण हौसाबाई, सगळं थोडं थोडं बनवा. आताच खाणं झालाय ना, जास्त जेवण जायचं नाही. बरं, मग आम्ही तो पर्यंत घाटावर चक्कर मारून येतो.”
हौसाबाई म्हणाली, ” घाटावर जा, पन जास्ती लांब पर्यंत संध्याकाळचं भटकू नका, रात होयच्या आंत वाड्यावर परत या. नायतर उगच माज्या जीवाला घोर लागेल.”
दी हसून म्हणाली, “ठीक आहे हौसाबाई, तुम्ही नका काळजी करू, आम्ही वेळेत परत येतो.”
नील लताला म्हणाला, “कसला सॉलिड वाडा आहे तुमचा, परंपरा आणि आधुनिकता याचा सुरेख मेळ घातलाय तुम्ही. इथे येईपर्यंत माझ्या मनात आतापर्यंत हॉरर मुव्हीज मध्ये दाखवतात तसा, काळाकुट्ट, खूप अंधार असलेला वाडा, त्याला एक जुनं गेट, ते उघडताना कsssssर असा येणारा भीतिदायक आवाज, मग आतून हातात कंदील घेऊन, चेहेऱ्यावर गूढ भाव घेऊन दार उघडायला येणारा रामुकाका, असं काहीतरी चित्रं होतं.”
“अरे माझे बाबा स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना वाड्याचा मूळ फील कायम ठेवायचा होता, पण आधुनिक सुखसोयी पण करायच्या होत्या, त्याप्रमाणे त्यांनी बदल करून हे रूप दिलं वाड्याला.”
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply