तिघेही गाडीतून नदीच्या जवळ आली. गाडी बाजूला लावून घाटाच्या पायऱ्यांवरून ते गप्पा मारत फिरत होते. आरुला तर गांवी यायला आणि असे नदीवर फिरायला खूपच आवडत असे, पण हल्ली गांवी जास्त येणं होत नव्हतं. नील आणि दीच्या गप्पा चालल्या होत्या. बोलत बोलत ते दोघे थोडे अंतर पुढे निघून गेले.
एकटी चालता चालता आरूच्या मनात भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या. चार वर्षांपूर्वीं शेवटचं त्या दोघी गांवी येऊन गेल्या होत्या.
त्यावेळी दीचा जे. नितीराज नावाचा मित्र त्यांच्याबरोबरच वाड्यावर आला होता. दी त्याला राज म्हणत असे. तोही एक आर्टिस्ट होता. फोटोग्राफीचा त्याला छंद होता. तो देश विदेशांत भरपूर भटकंती करत असे आणि तिथल्या प्रेक्षणीय ठिकाणांचे फोटो काढून आणत असे. दीला त्याने काढलेल्या फोटोंचा चित्रं काढण्यासाठीही खूप उपयोग होत होता. त्यामुळे कामाच्या निमित्ताने राजचे त्यांच्या घरीही येणे जाणे होत असे.
दोघांच्या एकंदर वागण्या-बोलण्यातून दोघे एकमेकांच्या गाढ प्रेमात आहेत हे लगेच लक्षात येत होते. आरूला, राज तिचा जिजू म्हणून एकदम पसंत होता. दीचं आणि राजचं लग्न व्हावं असं आरूलाही मनापासून वाटत होतं. पण
याबाबत तिची दी तिच्याशी कधीच स्पष्टपणे बोलली नव्हती.
आरू, दी आणि राज जेव्हा 4 वर्षांपूर्वी वाड्यावर आले होते तेव्हा तिघांनी खूप मजा केली होती. सगळीकडे खूप भटकंती केली. पण १४ फेब्रुवारीला दी आणि राज दोघेच बाहेर फिरायला गेले होते. पण तिथं दीचं आणि राजचं काहीतरी भांडण झालं म्हणून राज परस्पर निघून गेला होता आणि मग दुसऱ्या दिवशी दोघीच मुंबईला परत आल्या होत्या. का कोण जाणे पण त्यावेळी गावावरून परत आल्यापासूनच दी एकदम शांत आणि एकलकोंडी झाली होती.
त्या दिवसानंतर मात्र राज परत कधीही त्यांच्या घरी आला नव्हता. आरूने दीला राजबद्दल अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण दीने तिच्या प्रश्नांना कधीच, काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर आरुने दीकडे कधी गावाकडे जाण्याचा विषय काढला की, काही ना काही कारण काढून, दी तो विषय टाळत असे. आज नीलच्या आग्रहामुळे दी गांवी यायला तयार झाली होती याचा आरूला खूप आनंद झाला होता.
गांवी येण्याचे ठरले तेव्हा आरू नीलला म्हणाली होती की, “आपण गांवी जाऊ तेव्हा, दी समोर वागताना आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत याचा तिला कोणत्याही प्रकारे सुगावा लागेल किव्वा संशय येईल असे आपण वागायचे नाही.
आपण एकदम कॅज्युअल मित्र असल्या सारखेच वागायचे आहे हे लक्षात ठेव. आमचं गांव खूपच सुंदर आणि रोमँटिक आहे, तेव्हा तिथे तुला स्वतःवर संयम ठेवावा लागेल. आपण तिघे एकत्र असताना तू मला जास्त अटेन्शन देतो आहेस असे कधीही वाटता काम नये याची दक्षता घे. दोघांना कधी स्वतंत्र वेळ मिळाला तरच आपण गप्पा मारू.” नील आत्ता तिच्या सूचनांचं तंतोतंत पालन करत होता. तो जास्तकरून दी बरोबरच गप्पा मारत होता.
विचार करत चालता चालता आरू आणि त्या दोघांमधले अंतर वाढले होते, हे लक्षात येताच आरू थोडीशी भराभर चालत त्यांना जॉईन झाली.
थोडा वेळ घाटावर फिरून, नदीवरची गार हवा अंगावर घेऊन, तिघेही एकदम ताजेतवाने झाले. घाटावर थोडावेळ नदीच्या पाण्यात पाय सोडून बसले. नील त्यांना खूप सारे जोक सांगून हसवत होता त्यामुळे वातावरण एकदम हलके फुलके झाले होते. उत्साही मनाने सगळे वाड्यावर परतले.
हौसाबाई त्यांची जेवणासाठी वाटच पहात होत्या. त्यांनी गरमागरम जेवण वाढले. जेवणं झाल्यावर सगळे झोपण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले.
रात्री दी आणि आरू एका दालनात झोपायला गेल्या. त्यांच्या शेजारील दालनात नीलच्या झोपण्याची व्यवस्था केली होती.
मध्यरात्री साधारण दीडच्या सुमारास आरूला अचानक कसल्याशा आवाजाने जाग आली.
क्षणभर तिला कळेचना की आपण कुठे झोपलो आहोत. जरा जागी झाल्यावर तिच्या लक्षात आले की, आपण वाड्यावर आलो आहोत. ती उठून बसली आणि कानोसा घेऊ लागली………
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply