नवीन लेखन...

आजी तुझी आठवण येते…

इतके दिवस त्याला कळत नव्हतं , आजीच्या त्या बॅगेत काय ठेवलं होतं . बॅग खूप जुनी होती आणि तिनं ती सांभाळून ठेवली होती . दरवर्षी ब्लॉक साफ करताना , बाबा बॅग बाहेर काढायचे , त्याहीवेळी ती कायम लक्ष ठेवून असायची . घरातली अडगळ म्हणून सगळे वैतागायचे पण त्याकडे दुर्लक्ष करून आजी बॅग नीट पुसून , त्याभोवती कापड गुंडाळून पुन्हा तिच्या बेडखाली ठेवून द्यायची .

कोरोनामुळं लॉक डाऊनचे दिवस सुरू झाले तसं वेळ घालवण्यासाठी सगळ्यांप्रमाणे घरात शोधून शोधून कामं काढली जाऊ लागली . ती कामं सुद्धा संपली आणि मग आता काय करायचं हा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला .

– एके दिवशी दुपारचा चहा झाल्यावर आजींनं सगळ्यांना एकत्र बोलावलं .बेडखालची बॅग बाहेर काढली आणि उघडली . म्हणाली , ” तुम्हाला वेळ कसा घालवायचा हाच मोठा प्रश्न आहे ना , मग मी आता या बॅगेतला सगळा भूतकाळ तुमच्यासमोर ठेवते . वेळ कसा जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही . ”

आणि मग इतके दिवस दडवून ठेवलेला मौल्यवान खजिना बाहेर काढावा , त्याला अलगद हाताळावा , तसं आजी एकेक वस्तू बाहेर काढू लागली .

जुने कपडे , चांदीचे दागिने , काही चित्रे , काही दुर्मिळ पुस्तके , जपून ठेवलेल्या लग्नपत्रिका , जुन्या अंकलिपीची पुस्तके , जीर्ण झालेल्या गुणपत्रिका , चांदोबाची पुस्तके , मण्यांच्या माळा , दुर्मिळ औषधांचा बटवा , जुना रेडिओ , वेगवेगळे रंग , अत्तराच्या कुप्या , गंजिफा , पटावरच्या सोंगट्या , बुद्धिबळाचा पट , कसल्या कसल्या मूर्ती , वेगवेगळे दिवे , मातीची भांडी , निरांजन , समई , पागोटे , शेला , जुनी पैठणी , आजोबांचा अंगरखा , मुंडावळ्या , ताक घुसळण्याची रवी आणि एक गाठोडे तर चक्क भातुकलीच्या मातीच्या इवल्या इवल्या भांड्यांनी भरलेले …

आजी एकेक वस्तू बाहेर काढत होती आणि त्याप्रत्येक वस्तूच्या पाठचा इतिहास सांगत होती .
आजी आजोबांचा , आईबाबांचा , नातवंडांचा सगळा भूतकाळ उभा करीत होती . त्या प्रत्येक वस्तूचे माणसाशी असलेले भावबंध दाखवत होती . आजी गोष्टीवेल्हाळ होतीच पण आज तिला हक्काचे श्रोते आणि हाताशी प्रचंड वेळ होता …

सगळे गुंतून पडले होते .

“… आणि मग काय झाली गंमत माहितेय का …”
अशा शब्दांनी आजी आपल्या पोतडीतून एकेक गमती बाहेर काढत होती …
नातेसंबंध उलगडून सांगत होती . घराण्याचा इतिहास सांगत होती . जुन्या काळातला निसर्ग ,पाऊस थंडी ,वारा कसा होता हे सांगत होती . सणवार कसे साजरे केले जायचे , पक्वान्न , पदार्थ कसे असायचे , त्यातली पौष्टिकता , त्यातले औषधी गुणधर्म , काळानुरूप त्याचे शरीरासाठी असलेले महत्व सांगत होती . संस्कृती जपण्यासाठी आपण काय काय केले , काय काय करायला हवे हे उदाहरणे घेऊन सांगत होती . बचतीचे महत्व , काटकसरीचे महत्व , घरच्या ताज्या अन्नाचे महत्व सांगत होती . स्तोत्रे , परवचा , पाढे , घोकंपट्टी , जुन्या कविता अस्खलितपणे म्हणून दाखवत होती .

आजीने केवळ बॅगच उघडली नव्हती तर जणू विस्मरणात गेलेल्या भारतीय संस्कृतीचं विलोभनीय दर्शन घडवलं होतं.

बोलता बोलता हळूच बॅग बंद करून , तिनं विचारलं ,

” हा मेला कोरोना जगभरातून आपल्याकडे आला नसता आणि हा कायसा तुमचा लॉक डाऊन नसता तर तुम्ही आला असता काय रे माझ्याकडे हे सगळं ऐकून घ्यायला ? ”

कुणी बोललं नाही .
मग आजीच मोठमोठ्यांदा हसू लागली .

” आता उद्यापासून , तुमच्या आजोबांनी दिलेली साडी नेसून एकेक गोष्टी सांगत जाईन आणि तुमच्या मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंग करून ठेवा , काय ? ठेवा जपायला हवाय ना ? ”

आजी पुन्हा हसू लागली .

आजीचं बोलणं खरं होतं .
कोरोनानं जगभर थैमान घातलं आणि आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटू लागलं .
अजूनही त्यावर खात्रीशीर औषध सापडलं नाही , पण घरी राहून सुरक्षितता ठेवणं आणि स्वच्छता सांभाळणं यामुळं प्रत्येक माणूस कोरोना पासून बचाव करू शकतो हे जगभरात सिद्ध झालं .
जगभरातील शोकांतिका आपल्याकडे येण्याआधी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी , हस्तांदोलना ऐवजी हात जोडून नमस्कार ही भारतीय संस्कृती सगळ्या जगाला शिकवली . आणि एकमेकात मिसळण्याऐवजी , प्रत्येकानं जिथे आहोत तिथे सुरक्षित राहण्यासाठी , घरातच राहण्यासाठी , घरातूनच ऑफिस काम करण्याविषयी आग्रह धरला .
परिणामतः कोरोना प्रचंड प्रमाणात अजून तरी फैलावला नाही .

अर्थात हा निर्णय सर्वानाच रुचला असे नाही . अनेकांनी नाक मुरडले ,गैरसमज करून घेतला , घरी राहण्याच्या कल्पनेने अनेकांना अस्वस्थ वाटू लागले . लोक शोधून शोधून कारणे काढून घराबाहेर येऊ लागले . त्याचेही परिणाम समाजाला भोगायला लागले .

लॉक डाऊन मुळे नोकऱ्यांमध्ये समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान , त्यांच्या भविष्याबद्दल चिंता सर्वानाच सतावू लागली आहे .गोरगरीब जनतेचे प्रश्न , शेतकऱ्यांचे प्रश्न , उद्योगधंद्यांचे प्रश्न असे दृश्य स्वरूपातले प्रश्न तर आ वासून उभे आहेत.

पण याही पेक्षा घरात कोंडल्यासारखे वाटण्याने मानसिक चिंता वाढू लागली आहे . एका न्यूज चॅनल च्या पाहणीनुसार जगभरात नवराबायकोची भांडणे , हिंसाचार वाढू लागला आहे . न संपणाऱ्या वेळामुळे गैरसमज , चिडचिड , मारामाऱ्या वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत .

नोकरीला लागणाऱ्या वयाच्या सीमारेषेवर जे आहेत त्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि करिअर धोक्यात आले आहे
एक ना दोन , अशा अनेक गोष्टींना सध्याचे जग सामोरे जात आहे . ढग भरून आले आहेत पण पाऊस पडू नये , अंधारी रात्र संपून उजेड येऊ नये अशी अवस्था असताना जशी मनःस्थिती असेल तसे काहीसे झाले आहे . हे सगळे केव्हा संपणार अशा निरुत्तर करणाऱ्या प्रश्नाने सगळा आसमंत भरून गेला आहे .

पण मला तर ही एक प्रकारे इष्टापत्तीच वाटत आहे .
अर्थात जे या रोगाचा बळी पडले आहेत , ज्यांचे आयुष्य पणाला लागले आहे त्यांच्याबद्दल वाईटच वाटत आहे , त्यासर्वांबद्दल सहानुभूती आहेच .
सर्व डॉक्टर्स , नर्सेस , पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांच्याबद्दल नितांत कृतज्ञता आहे .

मग इष्टापत्ती का वाटते ?

याचं कारण त्या आजीच्या वर सांगितलेल्या घटनेत आहे .

आजच्या प्रचंड धावपळीच्या युगात आम्ही माणुसकी विसरलो होतो .
आम्ही नातेसंबंध विसरलो होतो , नाती आक्रसली होती , विरविरीत, विसविशीत होऊ लागली होती .
आम्ही मोबाईल , वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स, ऑनलाइन शॉपिंग यांच्या आहारी गेलो होतो .

उद्यापेक्षा आम्हाला आजचा आणि आजच्यापेक्षा आत्ताचा क्षण मोठा , हवाहवासा वाटू लागला होता .

आपल्या विविधतेने नटलेल्या चांगल्या संस्कृतीपेक्षा चंगळवादी संस्कृतीचे आकर्षण हवेसे वाटू लागले होते . पैसा ,अधिक पैसा , अधिकाधिक पैसा आणि मग त्यासाठी कुठेही , कधीही आणि काहीही करायला तयार झालो होतो .
आपली संस्कृती , आपले तत्वज्ञान , आपले धर्मग्रंथ , आपला निसर्ग , आपला इतिहास , आपला भूगोल , आपली आदरणीय मानचिन्हे आणि श्रद्धास्थाने विसरू लागलो होतो . किंबहुना ते सर्व त्याज्य , टाकाऊ असंच वाटायला लागलं होतं . आजूबाजूचं सगळं वातावरण तसंच तयार होत होतं. आणि सर्व प्रकारच्या मीडियाचा आपल्याला घट्ट विळखा पडला होता .
थोडक्यात आपला स्वाभिमान धोक्यात आला होता .

पण कोरोना आला .
आणि स्वतः बरोबर , स्वतःच्या कुटुंबियाबरोबर सक्तीनं का होईना , घरातच राहण्याची वेळ आली .

मग सगळं चित्रच बदलून गेलं .

आपल्या नात्याविषयी आपण पुन्हा नव्याने विचार करू लागलो .
आपली पत्नी , आपला पती , मुलं आणि सर्वच नाती नव्याने घासूनपुसून लखलखीत झाल्यासारखी वाटू लागली .
एरव्ही क्वचित केला जाणारा फोनवरचा संवाद आता प्रकर्षाने हवाहवासा वाटू लागला . त्यातील गोडी , आपुलकी नव्याने जाणवू लागली . टीव्ही वरच्या जुन्या काळातील रामायण, महाभारत , चाणक्य , अशा मालिका पुन्हा बघाव्याशा वाटू लागल्या . त्यावेळच्या सगळ्या आठवणी जाग्या होऊ लागल्या .
व्हॉट्सअप , फेसबुकवर जुन्या आठवणी , जुने फोटो शेअर करण्यात ,त्यांच्यावर कमेंट्स करण्यात , जुनी मित्रमंडळी शोधण्यात विलक्षण आनंद वाटू लागला .
अनेकांना आपण गायक , गायिका आहोत आणि त्यासंबंधीच्या क्लिप्स शेअर करायलाच हव्यात हे जाणवू लागले .
अनेकांना आपण अभिनेते होतो , आपण लेखक , कवी आहोत याची जाणीव झाली आणि ते सोशल मीडियावर सांगणे क्रमप्राप्त वाटू लागले .
प्रसिद्धी नव्याने धावून येऊ लागली .
अहंभाव गळून गेला .
जगण्यासाठी अन्नापेक्षा आणखी काही गोष्टींची गरज असते हे समजू लागले .
स्वयंपाकघरातले काम किती निगुतीने करावे लागते आणि स्वयंपाकाला नावे ठेवण्याऐवजी नावाजणे किती आवश्यक आहे हे स्वानुभवावरून पटू लागले .
घरातील ज्येष्ठांचे महत्वाचे प्रश्न , लहानग्यांच्या समस्या यात रस घ्यावा असे वाटू लागले .
पैसा असून उपयोग नाही तर माणुसकी हवीच याचे आकलन झाले .
अन्नाचे महत्व पटू लागले , काटकसर , बचत या शब्दांचे अर्थ समजू लागले .
व्यायाम अत्यावश्यक आहे हे मनाला वारंवार बजावण्यात कृतार्थता वस्तू लागली .
माणूस म्हणून एकमेकांना समजून घ्यायला हवे , प्रत्येकाच्या भावनांचा आदरभाव ठेवायला हवा , पुढच्या प्रत्येकाचे बोलणे ऐकायलाच हवे ही लोकशाही वृत्ती अंगी भिनली .

हे सर्व कोरोनाच्या निमित्ताने घडून आले , हा विधायक भाग मला मोलाचा वाटतो .
कोरोना घातकच आहे , कुणाच्याही वाट्याला तो येऊ नये , पण सुरक्षितता सांभाळली तर त्याला आपण सर्वजण मिळून परतून लावू शकतो या आत्मविश्वासाला बळ मिळते ते घरात राहण्याने . नातेसंबंध जपण्याने . आणि वेळेचा सदुपयोग करण्याने .

माणसाचं जीवन , रस , रंग ,स्पर्श , गंध यामुळे संपन्न होतं,पण त्याची जाणीव अधिक समृद्ध होणं नितांत गरजेचं , असं मला वाटतं !

कोरोनाच्या निमित्ताने ही जाणीव पुन्हा एकदा झाली , इतकेच !

— आणि हो आजीचीसुद्धा यानिमित्ताने आठवण झाली . तिला विसरून चालणार नाही !!

— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..