‘रमजान ईद’चा दुसरा दिवस होता. पुण्याच्या सारसबागेवरून कुठेशी जात होते तेव्हा पाहिलं, तर सगळी बाग मुस्लिम बांधवांनी भरून गेली होती. नटून थटून आलेल्या बायका, मुलं आणि सगळी मिळून सणाची मजा लुटत होती. ते दृश्य पाहूनच छान वाटलं. दुसरी कुठली जागा नाही म्हणून असेल, त्या स्थळाच्या मध्यवर्तीपणामुळं असेल किंवा सौंदर्यामुळे कदाचित आसपासच्या चटकदार स्टॉल्समुळंही असेल, पण ईदचा आनंद गणपतीमंदिराच्या प्रांगणात फुलला होता.
सहज मनात आलं, आपण सारी सामान्य माणसं तशी सारखीच असतो. निर्वेधपणे जगता यावं, छोट्या-मोठ्या अडचणीत एकाकी असू नये आणि दुसऱ्याला त्रास न देता आपल्याही खिशाला झेपतील असे काही आनंदाचे क्षण भोगावेत यापलिकडे आपली फार मोठी इच्छा नसते. दुसऱ्यांचंही जीवन आपल्याला त्रास न होता असंच जात असेल, तर आपली तक्रार नसते. म्हणूनच धर्माधर्मामधली भांडणं तशी आपल्या रोजच्या आयुष्यात नसतातच.
उलट ‘फ्लॅट’ संस्कृतीत राहून ज्यांचे चेहरे ‘फ्लॅट’ झालेले नाहीत आणि माणसानं माणसांकडे बघून हसणं, बोलणं यात ज्यांना कमीपणा वाटत नाही अशा वस्तीत दिवाळीचा फराळ मुस्लिम, ख्रिश्चन शेजाऱ्याकडे जात असतो आणि रमजानच्या शिरखुर्म्याची चव हिंदू कुटुंबाच्या जिभेवर रेंगाळत असते.
वरवर पाहता ही साधी वाटणारी गोष्ट. पण सामान्य माणसाच्या या सामान्यपणामुळेच माणुसकी त्यामुळं मानवी संस्कृती टिकून आहे. ‘मीही जगतो तूहि जग’ हा या संस्कृतीचा पाया आहे. म्हणूनच धार्मिक किंवा जातीय दंगली सामान्य माणसं सुरू करत नाहीत. या दंगली ज्यांना काही साधायचं आहे अशी महत्त्वाकांक्षी माणसं करतात. ही गोष्ट भारतापुरती सीमित नाही. संपूर्ण जगातच सत्ताधारी किंवा सत्तार्थी व्यक्ति वंशावंशांमध्ये, जातींमध्ये, पंथांमध्ये, धर्मामध्ये किंवा देशादेशांमध्ये भांडणं लावून देतात.
कारण महत्त्वाकांक्षी व्यक्तींना नुसतं जगायचं नसतं, तर कुणावर तरी सत्ता गाजवत जगायचं असतं. माणसांनी आपले अनुयायी म्हणून जगावं अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी नेतृत्व हवं आणि नेतृत्वासाठी संघर्ष हवा. नसेल तर तो निर्माण करायला हवा. म्हणूनच ज्या प्रश्नांचा आपल्या रोजच्या आयुष्याशी सुतराम संबंध नाही, अशा प्रश्नासाठी सामान्य माणसांना परस्परांमध्ये लढवलं जातं.
अतिरेकी महत्त्वाकांक्षा माणसाला नेहमी क्रूर बनवते. आपल्यासारख्या साध्या मध्यमवर्गीय माणसांना कसलीही महत्त्वाकांक्षा नाही, जिद्द नाही म्हणून हिणवलं जातं. आपला उल्लेखही बऱ्याचदा तुच्छतेने होतो. पण सामान्य माणसं जशी आहेत त्यात सुखी असतात म्हणून आजूबाजूचे बंगले सुखात राहू शकतात.
जे त्याच्याजवळ आहे ते मी हिसकावून घेईन असं सारीच म्हणाली तर जगात कोणीच सुखाने राहू शकणार नाही.
सामान्य माणसाच्या या सामान्यपणामुळेच जग टिकून आहे. याच साध्या जगण्याच्या आणि जगू देण्याच्या इच्छेमुळे माणसं धार्मिक, जातीय दंगलीत परस्परांना मदत करतात.
हिंदू-मुसलमान दंगलीतही कित्येकदा शेजारच्या मुस्लीम कुटुंबाचं संरक्षण हिंदू जमावापासून हिंदू घर करतं, तर हिंदू कुटुंबाचं संरक्षण मुस्लिम घर करतं. बाहेरच्या वैराशी त्यांचं काही देणंघेणं नसतं. जगात आजपर्यंत कित्येक संस्कृती आल्या आणि नष्ट झाल्या. कित्येक राज्यकर्ते आले-गेले. काही अन्यायी-जुलमी होते; ते इतिहासात बदनाम झाले.
जे सामान्यांचा – शोषितांचा कैवार घेऊन लढले, त्यांना इतिहासानं सन्मान बहाल केला. पण या साऱ्यांमध्ये टिकून राहिली ती सामान्य माणसाची जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि जगू देण्याची माणुसकी. या दोन गोष्टी पृथ्वीवरून समूळ नष्ट कधीच झाल्या नाहीत.
थोडी माणसं महत्त्वाकांक्षेनं पिसाट झाली, पण बहुसंख्य माणसं माणसांबर प्रेम करत राहिली. छोटे छोटे आनंद एकमेकांना देत राहिली, स्वतः घेत राहिली. दगडी इमारतीच्या इवल्याशा भेगेतही क्वचित एखादं हिरवंगार रोपटं उगवलेलं दिसतं. ते कुणी मुद्दाम रुजवत नाही. त्याला पाणी घातलं जात नाही. उलट ते तोडण्याचेच प्रयत्न केले जातात. तरी ते चिवटपणे टिकून राहतं. इवलीइवली हिरवी पालवी त्याला फुटतच राहते.
तशी ही ‘माणुसकी’ अनेक आघात सहन करूनही माणसाच्या मनात टिकून आहे. अनेक वर्षं झाली, युगं झाली, पृथ्वी जात्यंधाच्या, धर्माधांच्या तलवारीनं भंगली. निरपराभ्यांच्या रक्तात भिजली तरी अंती अजिंक्य ठरलं मानव्य ! कुठलाही एक धर्म – एक संस्कृती नव्हे – तर ‘मानवी संस्कृती’, दगडी इमारतीतल्या भेगेत उगवलेल्या इवल्याशा रोपट्यासारखी जिवंत राहिली. सळसळती राहिली.
सारसबागेतल्या त्या साऱ्यांचा संबंधही जीवनाशी होता. जीवनातल्या छोट्या-छोट्या, आईस्क्रीम, भेळ, पाणी पुरी सारख्या, आनंदाशी होता.
शेवटी धर्म हे जीवनाचं एक अंग आहे. जीवन सुखकर आणि नियंत्रित व्हावं यासाठी त्यानं मदत करायची असते. या धर्माचंच शस्त्र करून जर कुणी मारू पाहात असेल, तर अंतिम विजय जीवनाचाच व्हायला हवा ना? कारण माणसाचं जीवन छोटं असेल; पण मानवजातीचं जीवन अनंतच आहे.
Leave a Reply