अजित डोवल यांचा जन्म २० जानेवारी १९४५ रोजी झाला.
अजित डोवल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करून पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक स्पष्ट संदेश दिला होता. ‘सुशासन’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’ हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशात शांततेचे वातावरण निर्माण करून प्रगतीच्या मार्गात असलेल्या बाह्य आणि अंतर्गत समस्यांवर मात करण्याचा मोदी सरकारचा निर्धार यामधून दिसून आला. केरळ केडरचे IPS अधिकारी असलेले डोभाल हे प्रथमदर्शनी सामान्य सरकारी अधिकाऱ्यासारखेच दिसतात, पण त्यांच्या डोळ्यातली अद्भुत जरब आणि ऒठांवरचं गूढ हसू पाहताच समजतं की हे काहीतरी वेगळं पाणी आहे. भारताचे सर्वश्रेष्ठ गुप्तहेर असा लौकिक असलेल्या या नावाभोवती गेल्या ४५ वर्षात गूढतेचं एक अद्भुत वलय तयार झालंय ज्यामध्ये असंख्य कथा गुंफल्या आहेत… काही वास्तविक, काही अकल्पित तर काही कल्पनातीत!!
डोभाल सर्वप्रथम १९६४ साली प्रकाशात आले ते त्यांच्या मिझोराममधील यशस्वी कामगिरीमुळे. लालडेंगा याच्या नेतृत्वाखालील मिझो नेशनल फ्रंटने ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या आणि सरकारच्या चर्चेचे प्रस्ताव ते सतत फेटाळून लावत होते. डोभाल तिकडे गेले आणि लालडेंगाच्या सहा महत्त्वाच्या साथीदारांना आपल्या बाजूस वळवले. लालडेंगा नाक मुठीत धरून शरण आला, एवढंच नव्हे तर सरकारच्या सर्व अटी मान्य करून मुख्य प्रवाहात सामील झाला. एकेकाळी अशक्य वाटणारी ही गोष्ट डोभालांनी लीलया साध्य करून दाखवली. सिक्कीमचे भारतातील विलीनीकरणाचे अत्यंत अवघड कामही त्यांनी अगदी अलवार करून दाखवले.
१९७४ साली अणूस्फोट घडवून भारत एक अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र बनले. पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यानेही अण्वस्त्रे बनवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न सुरू केले. या काळात डोभाल एकदमच गायब झाले. तब्बल ७ वर्षं त्यांचा ठावठिकाणा काही मोजक्या लोकांनाच ठाऊक होता. नंतर समजलं की डोभाल चक्क पाकिस्तानातील लाहोर शहरात रहात होते. या ७ वर्षात त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमात प्रचंड अडथळे आणले आणि सर्व गुपिते भारतीय गुप्तहेरयंत्रणांना पुरवली. या ७ वर्षात एखादी छोटीशी चूकही त्यांच्या जीवावर बेतली असती, पण हा महान देशभक्त आपल्या प्राणांची पर्वा न करता हे अतिधोकादायक काम सतत ७ वर्षे करत राहिला. या काळात त्यांनी पाकिस्तानात RAW चे मजबूत जाळे विणले आणि कसलाही पुरावा मागे न ठेवता भारतात परत आले. ही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोचली नाही, पण ती सर्व देशांच्या हेरगिरी संघटनांना समजली आणि पाकिस्तानच्या ISI संघटनेची सर्व जगात चांगलीच छी-थू झाली. तेव्हापासून डोभाल हे ISI चे क्रमांक १चे शत्रू बनले.
१९९०च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सुरूवात झाली होती. हा दहशतवादी आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे हे लक्षात येताच केंद्र सरकारला पुन्हा एकदा डोभाल यांची आठवण झाली. काश्मीरमधील हा धर्माधिष्ठीत दहशतवादी केवळ शस्त्रबळाने चिरडल्यास तात्पुरते यश मिळेल पण त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट असतील हे डोभाल यांनी ओळखले आणि एक वेगळीच चाल खेळली. काश्मिरीमधील गावागावातून दहशतवादी संघटनांमधे सहभागी झालेल्या तरुणांवर त्यांनी बारीक नजर ठेवली आणि या तरूणांचा brainwash करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी सर्व मार्ग वापरले. अशा brainwash केलेल्या तरुणांची एक दहशतवादविरोधी संघटना उभी करून त्यांनी पाकप्रणीत दहशतवादास तोडीसतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादी बनलेले हजारो तरूण पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाले. पुढे पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि सर्व जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. भारतीय सैन्य, BSF, काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षादले यांच्यामध्ये काटेकोर समन्वय साधून डोभाल यांनी एक अत्यंत कार्यक्षमता यंत्रणा उभी केली. या यंत्रणेचा success rate ९९% आहे, म्हणजे १०० पैकी ९९ दहशतवादी कारवाया या होण्याआधीच थांबवल्या जातात. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे डोभाल याना ‘कीर्तीचक्र’ हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार फक्त लष्करी अधिकारी अथवा सैनिकांना मिळतो. गेल्या ७० वर्षात हा पुरस्कार मिळालेले डोभाल हे एकमेव पोलिस अधिकारी आहेत.
२००४ साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला आणि डोभालांनी निवृत्ती घेतली. पण या काळातही RAW, IB, NIA या संघटनांचे प्रमुख त्यांचे मार्गदर्शक घेतच राहिले.दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात.
भारतातील सामान्य जनतेस डोभाल यांच्याविषयी फारशी माहिती नाही, पण पाकिस्तानी लष्कर, ISI, सर्व राजकीय पक्ष, इतकंच नव्हे तर जनताही डोभाल यांचा प्रचंड तिरस्कार करते. पाकिस्तानच्या प्रत्येक वृत्तपत्रात डोभाल यांच्या विरोधातील लेख नियमितपणे छापले जातात, इलेक्ट्रॉनिक मेडीयामधे त्यांच्याविरोधात गरळ ऒकली जाते, इतकंच नव्हे तर ट्विटरवर अशी शेकडो पेजेस आहेत ज्यावर केवळ डोभालविरोधातील लिखाणच केले जाते. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि वजिरीस्तान या भागातील पाकविरोधी दहशतवादी संघटनांचे संचालन डोभाल करतात अशी पाक सरकारची पक्की खात्री आहे. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचे डोभाल हेच बाप आहेत असं पाकिस्तानातील सामान्य जनतेसही वाटतं. हा माणूस पाकिस्तानात कुठेही काहीही करु शकतो अशी भिती पाकिस्तानला वाटते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना डोभाल यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की जर पाकिस्तानने पुन्हा २६/११ सारखा हल्ला केला तर त्यांना कदाचित बलुचिस्तान गमवावा लागेल. या एका वाक्याने संपूर्ण पाकिस्तानात अक्षरशः वादळ निर्माण केले होते. पाकविरोधी सर्व संघटनांचे डोभाल हेच संचालक आहेत हा समज अधिकच ठाम झाला. पण आजवर पाकिस्तानला डोभाल यांच्याविरूद्धचा एकही पुरावा मिळालेला नाही.
शीख धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या हरमिंदर साहिब मंदिराच्या आसपासचं वातावरण जबरदस्त तणावपूर्ण बनलं होतं. शीख दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रावाले आणि त्याच्या सुमारे २०० साथीदारांनी हरमंदिरसाहेबवर अवैधरीतीने कब्जा केला होता आणि त्यांना हिसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने Operation Blue Star चे नियोजन केले होते. पण दहशतवाद्यांची संख्या, त्यांची ठिकाणं याविषयी भारतीय लष्करास फारशी माहिती नव्हती. सुवर्ण मंदिराच्या अवाढव्य परिसरात ठोस माहितीशिवाय जाणे हा मूर्खपणा ठरला असता, पण दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा सर्व परिसर सील केला असल्याने आत जाण्याचा मार्गच नव्हता. एवढ्यात एक पाकिस्तानी गुप्तहेर सुवर्णमंदिरात शिरला. त्याला आत सहज प्रवेश मिळाला कारण तो अमृतसरमधे गेले ७ महिने गुप्तपणे रहात होता आणि त्याने दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता. रात्री तो बाहेर आला आणि थेट Operation Blue Star चे मेजर जनरल ब्रार यांच्या office मधे पोचला. त्याने दहशतवाद्यांच्या जागा, त्यांची संख्या, एवढंच नव्हे तर सुवर्ण मंदिराचा संपूर्ण नकाशाच ब्रार यांच्याकडे सोपवला. या अमूल्य माहितीच्या आधारेच हे Operation यशस्वी झाले. नंतर समजले की ज्याने ही माहीत पुरवली तो पाकिस्तानी गुप्तहेर नव्हताच, तो होता भारतीय गुप्तहेर संघटना RAW चा अधिकारी … “अजितकुमार डोभाल ”
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply