नवीन लेखन...

प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, जाहिरातलेखक अजित सोमण

प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला.

अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे अजित सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.

पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक ॲप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘संगीत’ या पुस्तकाचे ते सहलेखक होते. सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. “ऊंचे लोग ऊंची पसंद”, “चवीनं खाणार त्याला केप्र देणार”, ” या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्या घरी “, “सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो”, ” प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ” या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.

बासरी वादक म्हणून अजित सोमण यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. सुधीर फडके, यशवंत देव, पं.हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, आनंद मोडक, सुधीर मोघे, पं. बिरजू महाराज, पं. कालीचरण महोपात्र, पंडिता रोहिणी भाटे, प्रभा मराठे, डॉ.सुचेता चापेकर, मनीषा साठे, पार्वती दत्ता, रोशन दात्ये यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी बासरीची साथ केली. ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘ही वाट दूर जाते ‘ यांसारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हिटी, बुगी फॉर हनुमान या मध्ये अजित सोमण यांनी बासरी वाजवली आहे. अजित सोमण यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे.

युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या “राग रंजन” या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम अजित सोमण यांनी केले होते. या मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे पार्वती दत्ता तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश होता. स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा संस्थांचे अजित सोमण यांनी विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले. दिग्दर्शक अजित सातभाई यांनी अजित सोमण यांच्यावर एक लघुपट केला आहे. अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.

त्यांनी ‘राऊ’ सारख्या मालिकेसाठी आणि ‘देवी अहिल्याबाई’ या चित्रपटासाठी गीतलेखन केले. ‘एक होता विदूषक’ चित्रपटातील तराणा अजित सोमण यांनी लिहिला होता.

‘टोकन नंबर’, ‘या आमुच्या हसऱ्या घरात’ सारख्या मालिकांचे शीर्षकगीत व NDA चे स्फूर्तिगीत सोमण यांनी लिहिले होते. ‘लाखाची गोष्ट’, ‘गुळाचा गणपती’, ‘गाभारा’ या गाजलेल्या चित्रपटांची इंग्रजी उपशीर्षके सोमण यांची होती. अजित सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत. संगीत, जाहिरात, शिक्षण, साहित्य अशा क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करून ठसा उमटविणारे बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी स्वरशब्दप्रभू पुरस्काराने सन्मान करण्यात येत असतो. तसेच उदयोन्मुख कलाकाराला त्यांच्या नावाची शिष्यवृत्तीही देण्यात येते.

आजवर हा पुरस्कार सुधीर गाडगीळ, अरुण काकतकर, मनीषा साठे, रमाकांत परांजपे, सुधीर मोघे, श्रीधर फडके यांना मिळाला आहे. तसेच अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ ललित कला केंद्रातील सर्वोत्तम विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी ‘स्वरशब्दप्रभू’ शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात येतो. अजित सोमण यांचे २ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..