अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन!
हुळहुळते अधरांवर माझ्या पहिले चुंबन!!
तुझा स्पर्श पहिल्यांदा झाला मला असा की,
उभ्या हयातीचे या माझ्या झाले कंचन!
गगनामध्ये अजून गर्दी नक्षत्रांची
तुझ्या नि माझ्या प्रीतीला ती करती वंदन!
सवे माझिया तू असली की, असे वाटते….
स्वर्गामधले अवतरले भवताली नंदन!
श्वासाश्वासामधे चालते तुझीच घमघम
अजून कुठले मला पाहिजे दुसरे रंजन!
मला न वाटे जीवन-मरणाची या भीती
जोवर आहे नाम:स्मरणाचे हे इंधन!
पहा लागलो बहराया मी दिशादिशांना
तुझ्या कृपेचे जेव्हा झाले अविरत सिंचन!
शब्द अता बोलतात माझे तुझीच भाषा
करतो आता तुझेच वाचन, तुझेच चिंतन!
हयात माझी गझलमय जणू झाली आहे
झोपेमध्ये सुद्धा चालू विचारमंथन!
कळते मजला तुझ्याविना मी अपूर्ण आहे
तू माझा स्वर, मी तर साधे आहे व्यंजन!
प्रोफेसर
प्रा. सतिश देवपूरकर
Leave a Reply