अजूनही त्या वाटेवर ……
अजूनही त्या वाटेवर नकळत डोळे एक आस लावून बसलेले असतात…
तू येशील आणि माझ्या हृदयातील तुझी जागा आपलीशी करशील..
आठवतय… तुझ्या येण्याच्या चाहूलीने ती वाट सुशोभित व्हायची,बागेतील निशिगंधाची कळी उगाचच खुलायची.. मिठीतील तुझ्या ते अनमोल क्षण आयुष्य माझे कारणी लावायचे..
आणि तुझे ते ओठावरील चुंबन रोमांच फुलवून जायचे…
कुठे गेली ती मिठी अन कुठे गेले ते अमृतासमान चुंबन.. माहितीये … हे विसरून की तू कधीच येणार नाहीस, अजूनही त्या वाटेवर माझे डोळे आस धरून बसतात….
आठवतय… कधी मी उशिरा यायचो आणि तू काळजीने कासावीस व्हायचीस,
अचानक समोर आल्यावर रडवेली होऊन कडकडून मिठी मारायचीस…
तुझ्या प्रितीने प्रिये धन्य होऊन जायचो..
देवाकडे तुझ्या मिठीत मरण देण्याची आराधना करायचो..
कुठे गेले ते निखळ निस्वार्थ प्रेम..
अन् कुठे गेली ती प्रेमाच्या करून रसाने मला ओथंबून टाकणारी माझी प्रिया….
दूर निघून गेलीस तू.. पण हे माझ्या डोळ्यांनाही एकदा सांग सखी,
अजूनही त्या वाटेवर तुझी नकळत आस लावून बसतात.
माहितीये… ती वाट आता वीरान झाली आहे तुझ्याविना, कडेचा निशिगंध ही फुलत नाही आता,वाट ही आता शृंगार नाही करत, डोळेही अश्रू नाही गाळत…
माझ्यावर प्रेम वर्षाव करून एक क्षणही माझ्याविना न राहणारी तू… कुठे हरवून गेलीस या अथांग दुनियेत..
हे माहीत असूनही तू आता माझी नाही राहिलीस,
अजूनही त्या वाटेवर नकळत माझे डोळे आस लावून बसतात.
दूरच लोटायचं होतं तर जवळ तरी का केलं मला..
द्यायचा होता ना विषाचा प्याला आणि जायचं होतं दूर..
काय ह्यासाठीच केला प्रेमाचा वर्षाव अन् काट्याचं परिवर्तन फुलांमध्ये….
अपार प्रेम देऊन तू रिती झालीस…
जीवनाचे हे अवघड ओझे देऊन माझ्यावर एकटीच तू निघून गेलीस..
तुझ्याविना ह्या सुनसान दुनियेत एकटाच चालतो आहे..
तू आता ह्या जगात नाहीयेस हे माहित असून सुद्धा माझे हे नादान डोळे अजूनही त्या वाटेवर तुझी वेडी आस धरून बसतात…
ऐक ना ,अजूनही त्या वाटेवर तुझीच आस धरून बसतात ….!
— दयानंद धुरी
Leave a Reply