घरी गेल्यावर मी पाचगणीला आईला मोबाईलवरून झालेली घटना सांगितली. ती म्हणाली, “अजितराजे, राजासमोर कुणी कसे बोलावे हे लोकांना कळत नाही. पण हे नेहमीचे उत्तर मला काही पटले नाही. एखाद्याच्या केवळ नजरेने एखाद्याची हृदयक्रिया बंद पडावी आणि त्यात त्याचा जीव जावा हे मला फारच विचित्र वाटले. आजपर्यंत माझ्या नजरेत अनोखी जरब आहे हे मला दिसत होते आणि त्याचा मी फार गांभीर्याने विचार करत नव्हतो. असते एखाद्याची नजर विलक्षण, पण त्याचा इतका जीवघेणा परिणाम होईल असे माझ्या स्वप्नातही कधी आले नाही. मी म्हणालो, “आई हे तुझे नेहमीचे उत्तर मला आता पाठ झाले आहे. मला तू आपल्या घराण्याची, पूर्वजांची हकिकत सांगणार आहेस ना? मग कधी? मला फार उत्सुकता वाटते.’ ती म्हणाली, “अजित राजे, आता ती वेळ आलेली आहे. पण त्यापूर्वी आपण एकदा काकांना भेटायला जायचे आहे.
मला आश्चर्य वाटले कारण आजपर्यंत आम्ही कधीही त्यांचे तोंडसुद्धा पाहिले नव्हते. मग आत्ताच त्यांना कशाला भेटायचे? असो. आईच्या इच्छेप्रमाणे त्यांना भेटण्यात माझा काहीच तोटा नव्हता. उलट आमचे संस्थान एकदा तरी बघावे असे मला वाटत होतेच.
मी म्हणालो, “ठीक आहे कधी जायचे आपण?” तिने लवकरच एक दिवस ठरवला आणि तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आम्ही रात्रीच प्रवास करून भोकरला पोहोचलो.
आईने मला बाबांचा शिकारीचा ड्रेस घालायला लावला होता. कधी कधी ती असे विचित्र वागायची. पहिल्यांदाच मी त्यांना भेटायला जाणार तर हा काय वेश झाला? पण तिला दुखवणे मला कधीच जमले नाही. ती सांगेल ते मी निमूटपणे करत असे. तसेच तो ड्रेसही मी केला. खरंतर मला तो खूप आवडला. खूप रूबाबदार दिसत होतो मी त्या वेशात.
तर सांगायची गोष्ट म्हणजे रात्रीचे फार उशीरा भोकर संस्थानमध्ये पोहोचलो. मी म्हणालो आईला, “आता फार उशीर झालाय. आपण उद्या सकाळीच गेलो तर बरे” पण ती म्हणाली, “अरे काही झालं तरी हे आपलं संस्थान. रात्री काय आणि दिवसा काय सगळं सारखंच. शिवाय आज तुझ्या वडिलांची पुण्यतिथी!
म्हणून मी आजचा दिवस ठरवला आहे.” बाबांची पुण्यतिथी आम्ही आठवणीनं साजरी करतो. मग आजच मी कसा विसरलो? अर्थात हे असले दिवस वगैरे मी फारसे मानत नाही. पण आईसाठी करतो. असो तर रात्री सुमारे अकरा वाजता आम्ही राजवाड्यावर पोहोचलो.
आम्ही येणार म्हणून आईने आधी कळविले होते. रखवालदाराने दरवाजा उघडून आमची गाडी आत घेतली. भव्य रस्त्यावरून दिमाखदार वळण घेऊन गाडी राजवाड्याच्या भव्य पोर्चमध्ये दाखल झाली. पंचताराकित हॉटेलमध्ये असतो तसा एक उंचापुरा भालदार पुढे आला. त्याने अदबीने गाडीचे दार उघडून आईला व मला लवून मुजरा केला आणि तो आम्हाला दिवाणखान्यात घेऊन गेला.
दिवाणखान्याचा थाट तर काही औरच होता. सबंध दिवाणखान्यात उंची गालिचे, इंपोर्टेड फर्निचर, नक्षीदार सुबक लाकडी खांब, सुंदर महिरीपींच्या कमानदार खिडक्या, दरवाजे, अप्रतिम पडदे, भिंतीवर जागोजाग आमच्या पूर्वजांची पूर्णाकृती तैलचित्रे, छताला परदेशी बिलोरी काचांची हिऱ्यासारखी चमचमणारी झुंबरे! एकूणच संस्थानच्या वैभवाची कल्पना त्या दिवाणखान्यावरून थोडीफार येत होती. खरंतर या वैभवाचा मीच खरा वारसदार होतो. पण आता त्या जरतरच्या गोष्टी होत्या. माझा वारसाहक्क डावलून आईला आणि मला का परांगदा व्हावे लागले ते मला अजूनही गूढच होते.
आम्हाला बराच वेळ म्हणजे सुमारे तासभर तरी ताटकळत बसावे लागले. दिवाणखान्याचे निरीक्षण करता करता माझे लक्ष दिवाणखान्याच्या भव्य जिन्याच्या मधल्या भागात लावलेल्या एका तैलचित्राकडे गेले आणि मी थक्कच झालो! हुबेहुब माझेच चित्र! तोच चेहरा, तोच रूबाब आणि मी घातला होता तसाच शिकारीचा ड्रेस! मी त्या चित्राकडे पाहतोय हे पाहून आई म्हणाली, “अजितराजे, हेच तुमचे वडील! सूर्यकांत राजे! ती एवढे म्हणते आहे तोच वरून दोन व्यक्ती खाली उतरू लागल्या.
आई म्हणाली, “ते येताहेत ते तुझे काका, चंद्रकांत राजे आणि ती त्यांची बायको राणी सरलादेवी.”
ते दोघे उतरच असतानाच ते दोघेही माझ्याकडे डोळे फाडून पाहत होते. मी ही नजर रोखून त्यांच्याकडे पाहत होतो!
आई म्हणाली, ‘चंद्रकांत राजे हा बघा तुमचा पुतण्या, आहे ना तुमच्याच भावासारखा? चंद्रकांत राजांचा चेहरा पांढरा फटक पडला! काही न बोलताच त्यांनी एकदा माझ्याकडे आणि एकदा पेंटिंगकडे पाहिले! विस्फारलेल्या डोळ्यांनी ते माझ्याकडे आणि पेंटिंगकडे आळीपाळीने पाहातच राहिले आणि एकाएकी त्यांचा चेहरा प्रचंड भीतीने वेडावाकडा झाला आणि ते जिन्यावरून खाली गडगडले ते थेट माझ्या आईच्या पायाशीच, पुन्हा न उठण्यासाठी! सरलादेवी मोठमोठ्याने किंचाळायला लागल्या. त्या आरडाओरडीने घरातले नोकरचाकर धावले! दोघातिघांनी सरलादेवींना घट्ट पकडून ठेवले. त्या कोणालाही आवरेना झाल्या. शेवटी डॉक्टर आल्यावर त्यांनी एक इंजिक्शन दिले तेव्हा त्या शांत झाल्या!
पुढे त्यांना वेडच लागले! मुलबाळ काही नव्हतेच. दत्तक घ्यायचा विचार चालू होता त्यातच हा प्रकार घडला. त्यामुळे सर्व संपत्तीच्या वारसदार म्हणून माझी आईच राहिली! तिने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून इस्टेटीचा ताबा घेतला. मी पुन्हा मुंबईस आलो. ती मागे थांबली आणि इस्टेटीचे सर्व व्यवहार पूर्ण करून तिच्या मागे मीच एकमेव वारसदार म्हणून सर्व कागदपत्रे पूर्ण करून पाचगणीला गेली. त्या वाड्यात ती राहिली नाही. अधूनमधून प्रॉपर्टीच्या कामासाठी जाते पण मुक्काम करत नाही.
आता ती फार थकली आहे. तिच्यावर झालेल्या अन्यायाचे निराकरण झाले. आता एकदा माझ्यावर सगळं सोपवून निवृत्त व्हावे असे तिला वाटते. म्हणूनच ती आज मला पूर्वेतिहास सांगणार आहे. खरंतर मला आता सगळं समजल्यासारखंच आहे. आणि समजलं नाही तरी त्यानं फारसा फरक पडणार नाही. पण ही माझ्या नजरेची अद्भूत शक्ती काय आहे हा विचार मला अस्वस्थ करतो. त्याचाच तर ती आज खुलासा करणार आहे. माझी उत्सुकता अगदी पराकोटीची ताणली गेली होती.
कसला तरी आवाज झाला आणि माझी विचार तंद्री एकदम तुटली. सखारामने मी बसलो होतो तेवढा भाग सोडून टेरेसवरचे सर्व दिवे बंद केले होते. समोरच्या काळोखातून जणू आल्यासारखी आई एकदम माझ्या पुढे आली! ती लिफ्टने सरळ वर आली असणार आणि लिफ्टच्या दाराच्या आवाजाने माझी तंद्री मोडली. तिने पांढरी शुभ्र साडी, ती नेहमीच पांढरी साडी वापरते, नेसली होती. आधीच गोरापान रंग, त्यातच अंधारातून ती एकदम पुढे आल्यामुळे मला तो खूपच पांढरा वाटला. चेहेराही खूप थकल्यासारखा दिसत होता. एवढा लांबचा प्रवास करत जाऊ नकोस म्हणून मी तिला नेहमी सांगतो पण ऐकत नाही. पुढे येऊन तिने माझ्या डोक्यावरून आपला म्हातारा हात फिरवला आणि माझ्या गालावर ओठ ठेवून तिच्या नेहमीच्या सवयीनुसार माझा लाडाने मुका घेतला. थंडीमुळे आणि प्रवासामुळे तिचे ओठ थंड पडले होते. ती समोरच्या इझीचेअरवर बसली आणि माझ्याकडे पाहून गोड हसली.
मी म्हणालो, “आई किती हा उशीर? आता तुझी ही रात्रीच्या प्रवासाची खोड सोड पाहू. सखाराम पण दोनदा विचारून गेला, येतो येतो म्हणून मी किती वेळ बसलोय कोण जाणे इथे.”
“साहेब, बारा वाजून गेले. आता कधी येताय जेवायला?” जणू अंधारातूनच सखारामचे शब्द आले. मी म्हणालो, ‘हो आलोच रे. येतोच थोड्या वेळात.’ “बघ आई मी म्हणालो नाही? चल बघू आता आपण आधी जेवण उरकून घेऊ. मग उद्या सांग तुला काय सांगायचे ते. चल चल!”
“अजितराजे उद्या नको, मी आजच जे काही सांगायचे ते सांगते. जेवण काय रोजचेच आहे. एखादा दिवस उशीर झाला तर काही बिघडत नाही.
तिने एक दीर्घ श्वास घेतला. जरा रेलून बसली आणि दूर आकाशात नजर लावली. जणू भूतकाळातच शिरली!
“ऐका, अजितराजे, मी आज जे काही सांगणार आहे ते अद्भुताहूनही अकल्पित आहे. पण मला आज ते सांगितलेच पाहिजे. तुम्हीही आता ते ऐकण्या एवढे झाला आहात. कारण हा वारसा आता तुम्हालाच पुढे चालवायचा आहे!”
“माझे माहेरचे नाव कदमबांडे. मी पण सरदार कदमबांड्यांची एकुलती एक मुलगी. आमचे घराणे पण नावाजलेले. लाडाकोडात वाढले. अत्यंत हूड. रूप मात्र अप्सरेचं. भोकर संस्थानकडून मला मागणी आली. त्यांच्या थोरल्या चिरंजीवांसाठी राजे सूर्यकांत यांच्यासाठी. सूर्यवंशी घराणे मोठे तालेवार. आमच्यापेक्षा तर फारच वरचढ. पण मी ही रूपाने काही कमी नव्हते. एखाद्या महाराणीला शोभेल असे माझे रूप होते. माझ्या वडिलांना म्हणजे सरदार हंबीररावांना तर किती आनंद झाला सांगता सोय नाही.”
“राजे सूर्यवंशींना दोन पुत्र. थोरले राजे सूर्यकांत आणि धाकटे राजे चंद्रकांत. पण दोघांचे स्वभाव म्हणाल तर राम आणि रावणाची जोडी. सूर्यकांत अत्यंत दिलदार, उमदा तर चंद्रकांत अत्यंत क्रूर आणि कपटी. संस्थानात तो तसा बदनामच होता. अर्थात हे सर्व मला लग्नानंतरच समजले.
“असो, लग्न अत्यंत थाटामाटात झाले. राजा घरचेच लग्न, मग हौसे-मौजेला काय कमी? ऐश्वर्याचे प्रदर्शन, टोलेजंग पार्ष्या, गाव जेवण, उंची कपडेलत्ते, हिऱ्यामोत्यांची, जडजवाहिरांचे दाग-दागिने, देणी-घेणी कशातही काही कमी नव्हते. मी अगदी स्वर्गात असल्यासारखी आनंदात तरंगत होते.”
“लग्नाची धामधूम संपली. पण खऱ्या अर्थाने आम्ही दोघं म्हणजे राजे सूर्यकांत आणि मी एकत्र आलो नव्हतो. सूर्यवंशी घराण्याच्या प्रथेप्रमाणे गर्भदान विधी झाल्याशिवाय पतिपत्नी एकत्र येऊ शकत नव्हते. गर्भादान मुहूर्त सात, आठ दिवसांनी होता. त्यामुळे माझी झोपायची व्यवस्था राजवाड्यात पण वेगळी केली होती. आम्ही दोघे वेगवेगळ्या खोल्यात झोपायचो.
“सात-आठ दिवस काय करायचे? तेव्हा राजे चंद्रकांत यांनी दोन-चार दिवस जंगलात कँप टाकायचा आणि शिकारीचा बेत ठरवला. सगळी मित्रमंडळी खूष झाली. शिकारीची पार्टी रवाना झाली त्याच्या दुसऱ्या दिवसाची गोष्ट. मी रात्री झोपेतून एकदम दचकून जागी झाले! माझ्या शेजारी कुणीतरी मला उठवत होते! मला दरदरून घाम फुटला! तोंडातून आवाज फुटेना! माझ्या तोंडावर हात दाबून ती व्यक्ती म्हणाली, “सुमित्रा, ओरडू नकोस, मी आहे सूर्यकांत!” माझी भीती थोडी कमी झाली. मी म्हणाले, “अहो पण तुम्ही? या वेळी? कुणी पाहिले तर काय होईल?’ ते हसले म्हणाले, “गप्प रहा. काही होत नाही’ आणि त्याच रात्री आम्ही एकत्र आलो!!
क्रमश:
— विनायक अत्रे.
Leave a Reply