मध्यंतरी माझ्या मित्राने एक व्हिडीओ पाठविला – पंडीत जितेंद्र अभिषेकींच्या शिष्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचा ! मराठी भाव-नाट्य -शास्त्रीय संगीतातील त्यांचा शिष्य परिवार ( अजित कडकडे, देवकी पंडीत , पुत्र शौनक आणि खाडीलकर अशा तेजकणांचा समावेश असलेला ) गुरुचरणी लीन होत भावविभोर झाला होता. यातील प्रत्येक तारा इतका तेजपुंज मग त्यांना निर्माण करणाऱ्या गुरूंचे वर्णन कसे करणार? सगळ्यांची गानप्रतिभा एकत्रित केली तरी ती अभिषेकी बुवांच्या गानप्रतिभेच्या आसपास पोहोचेल का?
दक्षिणेकडील पद्मविभूषण इलैयाराजा – यांच्या सांगीतिक कर्तृत्वाचे वर्णन करायला कमल हसन, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत सारख्या सुपर स्टार्सना शब्द सापडेनात. काही काळ हिंदी चित्रपट सृष्टीत वादळ निर्माण केलेला ए. आर. रहमान त्यांच्याकडे एकेवेळी पियानो वादक होता. संगीत दिग्दर्शन क्षेत्रातील भारत नव्हे तर जगातील हा माणूस माउंट एवरेस्ट आहे. त्यांच्या कार्यक्रमांची, विविध भाषांमध्ये केलेल्या कामाची , त्यांना मिळालेल्या पारितोषिके आणि सन्मानांची यादी करता करता विकिपीडिया दमला.
सगळ्या दिग्गज गायक,वादक,गीतकारांबरोबर काम केलेली हा माणूस अंतर्बाह्य साधा आणि “निरभ्र ” ही आहे. या वयातही तपश्चर्या करतोय. हिंदीत त्यांनी केलेली एकही रचना मला दुसरीसारखी वाटली नाही पण पटकन त्या रचनेवरची इलैयाराजा यांची नाममुद्रा ओळखू आली. एकाच जन्मातील केवढे हे कर्तृत्व ?
नुकत्याच ” श्रावणातील एका दिवशी ” निवर्तलेल्या पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी यांच्याबद्दल मी ओझरता उल्लेख केला होता.
रंगमंचाची भावुकता त्यांनी आधुनिक भारताच्या उद्गारात मिसळली आणि जगभर सगळे नाट्यप्रेमी त्यांच्या प्रतिभाविष्काराने भांबावून गेले. तुघलक (कर्नाड ), अंधा युग ( धर्मवीर भारती ) आणि अशी असंख्य नाटके त्यांनी आपल्याला चवीने बघायला शिकविले. चित्र, नाट्य, नृत्य, संगीत ( पौर्वात्य आणि पाश्चात्य ) या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट होते आणि त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकच खंत वाटायची- फार उशिरा भेटलो या व्यक्तीला !
भारतीय रंगभूमीचे शिखर असलेले अल्काझी त्यांच्या शिष्य -प्रभावळीमुळे कायम लक्षात राहतील – ओम पुरी, नसीर , सुहास जोशी, विजयाबाई, रोहिणी हट्टंगडी, ज्योती सुभाष आणि अशा अनेक निसर्गदत्त गिरिशिखरांना त्यांनी उंची दिली आणि आपण त्या महान कलावंतांपुढे आदराने झुकतो. मग त्यांना घडविणाऱ्या द्रोणाचार्यांचे कर्तृत्व किती मोठे असेल?
माझ्या दृष्टीने ही विद्यापीठे आहेत. त्यांच्या शिष्यांनी आपलं आभाळ व्यापलंय, पण आभाळात अशा असंख्य आकाशगंगा असतात.
या तीन आकाशगंगांच्या निर्मात्यांबद्दल आज एवढंच !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply