आयुष्य नांवाचा प्रवास – वर्षे आणि दिनदर्शिकेच्या भाषेत लंबाचौडा नक्कीच होत चाललाय, ७०/८०/अगदी नव्वदी पर्यंत !नजीकच्या भूतकाळात मात्र कोरोनाने आयुष्य आखूड, लहानखोरं करून ठेवलंय आणि अधिकच अनाकलनीय. म्हणूनच आजवर जे करावंसं वाटलं होतं, जे करायचे काही ना काही कारणाने राहून गेलंय ते आत्ताच करून टाका (DO IT NOW)
हे कायम लक्षात असू द्यावे- ” जे वेळेचा अपव्यय करतात,तेच वेळ अत्यल्प असल्याबद्दल तक्रार करतात. ”
टीम अर्बन या ब्लॉगरने सुमारे ५-६ वर्षांपूर्वी असा ब्लॉग लिहिलाय – आयुष्यातील आपण आपल्या मुलाबाळांसमवेत, नातवंडांसमवेत घालविलेला सहवासाचा काळ अत्यंत मर्यादित असतो. म्हणजे मुले/नातवंडे महाविद्यालयात असेपर्यंत सहवासाचा एकत्र (त्यांच्या समवेतचा) सुमारे ९० टक्के वेळ संपलेला असतो. नंतर उरलेल्या आयुष्याला बाकीच्या दहा टक्क्यांवर भागवावे लागते.
म्हणूनच कुटुंबियांना आपल्या नव्या पिढीसाठी काहीतरी विशेष करावेसे वाटले तर इतर सारे मागे सारावे आणि मनात आलेले बेधडक करून टाकावे. स्वतःवरचा अतिरिक्त ताण झुगारून द्यावा.असा बाह्य ताण कदाचित चुकीच्या दिशेने,चुकीच्या मार्गाने नेऊ शकतो. कधीकधी आपणच स्वतःकडून बाळगलेल्या नकली,तकलादू अपेक्षा त्याला जबाबदार असू शकतात.
पण अंतिम सत्य एकच – फार कमी माणसे आपल्या हातून घडलेल्या कोणत्याही कृत्याबाबत पश्चात्ताप अथवा खेद जाहीरपणे व्यक्त करतात , पण साधारणतः उर्वरित आयुष्यातील खेद फक्त एकाच गोष्टीबद्दल असू शकतो – जे करायला हवे होते,ते योग्य वेळी किंवा कधीच का केले नाही म्हणून !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply