या प्रपंचाची सुरुवात नक्की कधी झाली ते सांगणे अवघड आहे. कॉलेजमधून घरी जाताना डेक्कनकॉर्नरवरून जाणे व्हायचे. वाटेतला एक ठिय्या म्हणजे श्री. प्रभाकर साळुंखे यांचा लकडीपुलाच्या कोपऱ्यात लागणारा पुस्तकांचा स्टॉल (अजूनही साळुंखे तिथे नेमाने हजेरी लावतात). माझ्या सुदैवाने मला तिथे न. वि. पणशीकर यांनी संपादित केलेली तुकारामगाथा मिळाली आणि तुकाराम समजून घेण्याचे काम सुरु झाले. जेव्हा हे बाड हातात आले तेव्हा प्रस्तावनेत श्रीपाद शास्त्री किंजवडेकर यांचे अभंगगाथेला ‘अभंगोपनिषद’ म्हणून गौरवणे माझ्या आकलनाच्या बाहेर होते. तेव्हा त्या गाथेत पेन्सिलने केलेल्या खुणांवरून इतक्या वर्षांनी बघताना लक्षात येते की तुकारामांच्या अनेक विलक्षण रचना त्या घडीला माझ्या मर्यादित बुद्धीतून सुटल्या नव्हत्या. असो, पुढे अनेकांप्रमाणे सुरेश भटांच्या गारुडामुळे गझलेकडे वळलो आणि ओघाने उर्दू साहित्याची गोडी लागली. पुढे विचारविश्व विस्तारीत झाले, पुस्तकांसोबत अनेक सुज्ञ लोकांचा सहवास लाभला आणि हिन्दी, उर्दू भाषेतले साहित्य वाचनात आले. वाचन गंभीरपणे घेण्यासाठी आग्रह धरणारे एकमेव व्यक्ती म्हणजे स्नेही कवी-समीक्षक अनंत ढवळे. पुस्तकाचे शीर्षकसुद्धा त्यांचे देणे आहे. ‘अखईं तें जालें’ या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण असलेले तीन संदर्भ, ज्यांच्यामुळे तुकाराम हिन्दुस्तानी परिवेशात समजून घेण्याची कल्पना सुचली असावी, इथे नमूद करावेसे वाटतात. पहिला संदर्भ आहे भालचंद्र नेमाडे यांचे ‘तुकाराम’, दुसरा अली सरदार जाफ़री यांचे ‘कबीर बानी’ आणि तिसरा शम्ससुर्रहमान फ़ारुक़ी यांचे ‘शेर-ए-शोरअंगेज’. नेमाडे यांनी तुकारामांच्या साहित्याचा व्याप थोडक्यात पण प्रभावीपणे मांडला आहे आणि तुकारामांच्या अभ्यासाच्या अनेक शक्यता निर्देश केल्या आहेत. जाफ़रींनी कबीर समजून घेताना कबीरांच्या विचारांचा मागोवा घेतला आहे आणि ते घेत ते अगदी मागे सादी शीराजी, रुमी पर्यंत जातात. फ़ारुक़ींच्या ग्रंथाचे प्रयोजन मीर तक़ी मीर यांची कविता आणि भारतीय सौंदर्यबोध आहे. तिन्ही संदर्भांचे वाचन जमेल तसे चालू होते.
साधारणत: २०१५ मध्ये अनंत ढवळे यांनी कवीमित्र विजय पाटील आणि मला घेऊन ‘समकालीन समूह’ याची स्थापना केली. मराठी गझल क्षेत्रामध्ये अभ्यासपूर्ण चर्चा, समीक्षा आणि विचारी लिखाण या गोष्टींना प्रोत्साहन देणे या समूहाचे मुख्य उद्देश्य होते. त्या दिशेने प्रयत्न करीत समकालीनने २०१६ मध्ये ‘समकालीन गझल’ या अनियतकालिकेचा पहिला अंक काढला. त्या अंकासाठी लिहिताना ‘शेर-ए-शोरअंगेज’ या ग्रंथाचे वाचन करताना लक्षात आले की मीर यांच्या शैलीच्या फ़ारुक़ी यांनी उलगडून दाखवलेल्या अनेक ढबी तुकारामगाथेत दिसून येतात. हा योगायोग आहे की त्यामागे अधिक विशेष काही आहे? हे समजून घेण्यासाठी महाकवी समजून घेण्यासाठी त्यांची परंपरा समजून घ्यायला हवी या निष्कर्षाला आलो. तुकाराम समजून घेण्यासाठी कोणत्या परंपरा समजून घ्यायला हव्यात याचे उत्तर भालचंद्र नेमाडे यांच्या ‘तुकाराम’ या पुस्तकात मिळाले. इथे लक्षात घ्यायला हवे की भक्तिआंदोलन आरंभी कदाचित प्रादेशिक स्वरूपाचे असावे पण ते केवळ विशिष्ट प्रदेशापुरते सीमित न राहता त्याचा प्रभाव कालांतराने संपूर्ण हिन्दुस्तानामध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये वरकरणी भिन्न असलेल्या अनेक परंपरांचे योगदान होते. तेव्हा तुकाराम ‘हिंदुस्तानी परिवेशात’ समजून घ्यायला हवे ही धारणा हळूहळू पक्की होत गेली हे स्वाभाविक होते. तुकोबांची परंपरा कोणती होती यापेक्षा तुकोबांचे लागेबांधे कोणत्या परंपरांशी होते हे अधिक निश्चितपणे सांगता येते. या परंपरांमध्ये वैदिक, बौद्ध, नाथ, भागवत आणि सूफी या परंपरा समाविष्ट करता येतील.
सुदैवाने २०१६ मध्ये एक वर्षाची सुट्टी (सबबॅटिकल) घेऊन मी घरापासून दूर अलाहाबाद आणि बंगलोर मध्ये वास्तव्याला होतो. त्यामुळे ग्रंथाचा आराखडा तय्यार करण्यास पुरेसा वेळ मिळाला. पुढे चारेक वर्षे काम चालू होते. लॉकडाउन मुळे कामाला वेग आला आणि २०२० च्या जून पर्यंत काम आटोक्यात आले असे वाटून ग्रंथ लवकर मूर्त स्वरूपात येईल असे मी उत्साहाने जाहीर केले. पुस्तक सहा प्रकरणांत पुढीलप्रमाणे विभागायचे ठरले:
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो (जिज्ञासा)
मी तो आगळा पतित (व्यक्तिमत्त्व)
कलियुगीं हरी बौद्धरूप धरी । तुकोबाशरीरीं प्रवेशला (संतत्व)
अक्षईं ते झालें (कवित्व)
देशकालवस्तु भेद मावळला (दर्शन)
तुकारामांच्या निवडक रचना (चयन)
पहिल्या प्रकरणात तुकाराम समजून घेण्याच्या अडचणींवर सर्वसामान्य वाचकांच्या दृष्टीतून आणि जिज्ञासेपोटी विचार केला गेला आणि तुकारामांवर झालेल्या मौलिक कामांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात तुकारामांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या आणि इतरांच्या दृष्टीतून समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. तिसरे प्रकरण संतत्वावर झाले, ज्यामध्ये डॉ. आ. ह. साळुंखेंच्या कामामुळे तुकाराम आणि बुद्ध यांच्या विचारांमधली साधर्म्ये दिशादर्शक ठरली. पुढची दोन प्रकरणे तुकारामांच्या कवित्व आणि दर्शनावर झाली. कवित्व व व्यक्तिमत्त्व आणि दोन्हींमधील लागेबांधे समजून घेण्यासाठी रा. ग. जाधव यांचे काम अत्यंत उपयुक्त ठरले. दर्शनासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे विवेचन साहाय्यकारी ठरले. शब्दांना चिकटून आणि संदर्भ समजून अर्थनिश्चितीचा विचार सांकृत्यायन यांच्याकडून आला. शेवटच्या भागासाठी चयन करताना उपलब्ध असलेली अनेक संकलने आणि समीक्षात्मक लिखाण पाहून जवळपास तीन-साडेतीनशे रचना निवडल्या. नजरेतून एखादी सर्वोत्तम रचना निसटू नये या भोळसट धारणेला धरून म्हटले की गाथा परत एकदा पहिल्यापासून पाहावी. आणखी काही मिळेल का असे वाटत असताना अचानक माधुर्य, ओज व प्रसाद या गुणांनी संपृक्त अशी एखादी ओळ पुढ्यात ठाकायची. ‘वाती घेउनिया बैसा डोळा’ अश्या जागृत स्थितीत गाथा वाचता वाचता जवळपास बाराशेच्या घरात रचना मिळाल्या आणि दुसऱ्या खंडाची निकड उत्पन्न झाली. दुसरा खंड भावस्थिती किंवा विषयांना धरून तेहतीस भागांमध्ये विभागला आहे आणि हे काम उरकता उरकता दोनेक वर्षे लोटली. पुढे जवळपास वर्ष प्रारूप तपासण्यात गेले आणि हा द्विखंडात्मक ग्रंथ नावारूपाला आला. ही झाली ग्रंथनिर्मितीची रेमटकहाणी.
आता या ग्रंथाचे सारभूत विशेष वेगळेपण काय या प्रश्नाकडे येऊ. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या लिखाणाचे अवलोकन आवश्यक आहे. तुकारामगाथा समजून घेताना भाषेचा विस्तार व सौंदर्य आणि साहित्यिक मूल्ये व साधने यांबद्दल अनेक गोष्टी निदर्शनात आल्या. विशेष म्हणजे यातल्या बऱ्याच गोष्टी समांतरपणे किंवा मागेपुढे हिन्दी, मराठी, पंजाबी, उर्दू इत्यादी भाषांमधल्या महाकवींच्या कलाकृतींमध्ये होत असल्याचे प्रतीत झाले. ग़ालिब यांचा शेर आहे ‘लेता न अगर दिल तुम्हें देता कोई दम चैन । करता जो न मरता कोई दिन आहोफ़ुगाँ और ।’. या शेरावर टीकेचा स्वर उमटला (लेता व देता यांच्या जागा अदलाबदल करायला हव्यात आणि ‘करता जो न मरता’ च्या ऐवजी ‘मरता न तो करता’ हवे हे दोन आक्षेप होत) पण ग़ालिब आपल्या मताला ठाम राहत वक्तव्य करतात की ‘ता’क़ीद लफ़्जी अनुचितच नव्हे तर सुन्दर आणि लावण्ययुक्त मानले जाते.’ अशी असंख्य उदाहरणे आपल्याला तुकारामगाथेत मिळतात. ‘तुका ह्मणे तुज धाक । देता पावसील हाक’ यात हाक आणि धाक जागा जागा बदलून आलेत का हे वाटत राहते. मीर तक़ी मीर आणि तुकाराम यांच्यामध्येही अभिव्यक्ती प्रभावी करणारी अनेक समान साहित्यिक साधने आढळतात. एखाददुसरे साधर्म्य योगायोग म्हणून दुर्लक्षित करता आले असते. पण मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या साधर्म्यांचे मूळ वरकरणी भिन्न असलेल्या अनेक परंपरांच्या समान सूत्रांमध्ये आहे. या सूत्रांचा मागोवा या ग्रंथात घेण्यात आला आहे.
ग्रंथाच्या प्राक्कथनामध्ये म्हटल्याप्रमाणे गाथेमुळे त्या काळच्या समाजजीवनाची व चालीरीतींची कल्पना अधिक चांगली येते. इथे किंचित अधिक विस्ताराने उदाहरणांसह हा मुद्दा समजून घेऊया.
१. ‘सांडोव्यासी घाली देवाची करंडी ।’ या चरणात ‘सांडोवा/सांडवा’ ही संकल्पना येते. इथे ‘देवाची करंडी सांडोव्याला घालणे’ ही सिंदळीची खोड म्हणून तुकाराम उल्लेखतात. ‘तुका ह्मणे आलें मोड्यासी कोंपट । सांडव्याची वाट विसरावी ॥’. सांडवा या शब्दाचे बांध, नदीवरली पायवाट किंवा जास्त पाणी काढून देण्याची वाट असे अनेक अर्थ उद्भवतात. उपरोक्त रचनांशामुळे लक्षात येते की लोकवस्ती या वाटेपासून दूर असावी.
२. ‘बरगासाठी खादले शेण’ या रचनेत शेणातले बीज खाण्याचे दुर्दैवी चलन असल्याचे कळते. पीटर मंडी हे ब्रिटिश व्यापारी १६३० च्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात आल्याचे कळते. त्यांचे प्रवासवर्णन ‘इटिनेरिअम मंडी’ या नावाने शब्दबद्ध आहे. १७ नोव्हेंबर मधील भडवडच्या मुक्कामाचे एक प्रसंग अतिशय दुर्दैवी, अमानुष आणि भयानक आहे. ज्यात तीस-चाळीस आबालवृद्ध प्रवाश्यांच्या घोडे-बैलांच्या विष्ठेपाशी घोटाळताना पाहिल्याचे नोंदवले आहे. यावरून उपरोक्त उल्लेखलेल्या चलनाची खात्री करून घेता येते.
३. ‘घालूनियां मध्यावर्ती’ या रचनेत वर्षासन ही संज्ञा येते. तुकारामांच्या काळात (आणि कदाचित आत्ताही) बायकापोरांना गोवून वर्षासन लावण्याची जुलुमी रीत दिसून येते. वर्षासन म्हणजे दरवर्षी द्यायचे द्रव्य. एकूणच तेव्हाही भोंदू लोकांचा सुळसुळाट होता.
गाथेत येणारे कितीतरी शब्द त्याकाळच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण जीवनाचा पट डोळ्यांपुढे उभा करतात (कबीर आणि बुल्लेशाह यांच्या लिखाणातून आपल्याला उत्तर भारत आणि पंजाब मधले ग्रामीण जीवन परिचित होते). पेव (जमिनीखालची कोठाराची जागा), हेड (जनावरांना पळवणे किंवा घेऊन जाणे), घुळी (सांड), भोत (कातडे काढून त्यात भुसा भरून केलेले किंवा वासराचे शव), सारसुवी (साफसुफी), गव्हाण (चारा ठेवण्याची जागा किंवा घराच्या मागची-पुढची जागा), हिलाल (दिवटी), कोटंबा (दोती किंवा लाकडी भिक्षापात्र), जेंगट (भिक्षेकऱ्यांची वाजवायची थाळी), मोटळा (गाठोडे), वावडी (पतंग), सागळ (पाण्याची कातडी पिशवी), बोळ (एक प्रकारचा औषधी चीक (ऐलिया)), तिसडी (तीनदा साफ केलेले (तांदूळ)), निकण (मळणी झाल्यावरचे धान्याने न भरलेले पोकळ (कणीस)), बांडेले (कणसे न लागलेले (पीक)), करबाड (कडबा, वैरण किंवा कणसे कापून घेऊन जोंधळ्याची वाळलेली ताटे), सोमवल किंवा सोमल (एक विषारी पदार्थ (आर्सेनिक)), केणे (माल), विसार (खरेदी करताना आगाऊ घेतलेला पैसा), बेगड (जस्ताचा रंगवलेला पत्रा), सांत (बाजार), हाट (फिरता बाजार) अशी अनेक उदाहरणे देता येतील.
गाथेचे एक महत्त्वपूर्ण अंग समाजप्रबोधनाच्या उद्देश्याने लिहिले गेले आहे. पण त्यापुढे जाऊन या रचनांमध्ये तेव्हाच्या समाजाचे शब्दचित्र पहायला मिळते. गाथेत आणि तत्सम हिंदुस्तानी साहित्यात त्याकाळच्या अनेक चालीरितींची कल्पना मिळते. उदाहरणार्थ, गाथेत ब्रह्मचर्य, हीनवर-बीजवर, कन्याविक्रय, रांडारोटा, बहुविवाह, कुंटणकी, तमाशा अशा अनेक विषयांवर रचना आढळतात. गुरूशिष्यसंबंधांचे भ्रष्ट स्वरूप मठोमठी पाहण्यात आल्यामुळे कदाचित गुरूभक्तीचे महत्त्व सांगणारे तुकाराम या प्रथेला विरोध करताना दिसून येतात. जबरदस्त गुरूसंस्था खिळखिळी करण्याचा जोरदार प्रयत्न त्यांच्या रचनांतून दिसून येतो. गाथेत अनेक व्यक्तिचित्रे पहायला मिळतात. या संदर्भात बिनकर्तृत्वाचे अभिमान मिरवणारे, अति खाणारे किंवा इंद्रियांवर अंकुश नसणारे, कविताचोर, मर्म न कळलेले गायक, तारुण्याच्या मदाने मुसमुसणारा सांड, चोर पुत्राचे कृतकृत्य मायबाप, शिंदळी, वेडी, संसाराचा मोह न सुटणारी सासू, वऱ्हाड्यांचा मानमरातब राखण्यात मशगूल असलेला वर, नवऱ्याची वाट पाहणारी पोक्त बाई अशी असंख्य उदाहरणे देता येतील. गावगुंड होऊन पुंडांना वठणीवर आणणे अशा आशयाची एक रूपकात्मक रचना गाथेत आहे (गांवगुंड म्हणजे गावातील प्रमुख किंवा जरब बसविणारा माणूस). सौऱ्या या सदराखाली गाथेत अकरा अभंग आहेत (सौरी म्हणजे मुरळी किंवा स्त्रीवेषांतील हिजडा). सौरीला मायिक जगण्यातली खोट दाखवून स्वहिताचा (किंवा मुळीच्या ठायाला जाण्याचा) विचार पटवून देण्याचा प्रयत्न या रचनांमध्ये दिसतो. शाक्तावर या सदराखाली येणाऱ्या अभंगांत तुकारामांनी शाक्तांची कठोर समीक्षा केली आहे. वर्णाभिमानात उन्मादित झालेला उच्चवर्ग आणि धर्मपंडित व व्यापारीवर्ग यांनी वेठीस धरलेला शूद्रवर्ग, या दोन्हींची कथा गाथेत आढळते. वर्णधर्मयाती या भेदांमुळे विभाजित झालेल्या समाजाला एका छत्राखाली आणण्यासाठीचे वैष्णव धर्माचे सर्वसमावेशकतेच्या तत्त्वावर आधारलेले समाधान गाथेत तुकारामांनी अगदी कळवळ्याने मांडले आहे.
‘अखईं तें जालें’ या ग्रंथाचे दोन्ही खंड अनेक वर्षांच्या तुकारामगाथेच्या झाडाझडतीचे फलित आहे. या ग्रंथाचे वेगळेपण काय असा प्रश्न राहतो. या ग्रंथात तसे पाहिले तर गाथेपेक्षा वेगळे असे विशेष काही नाही. हे खरे आहे की गाथेचा विचार महाराष्ट्री लोकजीवनापुरता सीमित न ठेवता हिंदुस्तानी काव्यजीवनाच्या पटावर करण्यात आला आहे. पुस्तक लिहायला घेण्याआधी तुकाराम आणि त्यांची कविता आपल्याला समजली आहे का? या जिज्ञासेने माझा पिच्छा पुरता पुरवला. तेव्हा पुस्तक लिहायला घेताना माझी भूमिका ही सामान्य वाचकाची होती. पुस्तक लिहिता लिहिता ही सामान्य वाचकाची भूमिका केव्हा जिज्ञासूची झाली, जिज्ञासूची भूमिका केव्हा कवीची झाली आणि केव्हा या ग्रंथामध्ये सामाजिक व दार्शनिक तत्त्वांचा रीघ लागला हे कळले नाही. याचे पूर्ण श्रेय तुकारामांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि तुकारामगाथेला जाते. तुकारामांच्या साहित्यातल्या या असंख्य शक्यता या प्रवासात एकामागे एक अशा पुढे येत गेल्या आणि माझी भूमिका केवळ एका आस्वादकाची बनून राहिली. आता मागे वळून बघताना ‘कवतुक वाटे जालिया वेचाचें’ अशी मनोवस्था झाली आहे!
* अक्षरनामावर ग्रंथनामा – झलक या सदरात पूर्वप्रकाशित
Leave a Reply