सदुसष्ट वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये एका सावळ्या परंतु नाकशार मुलीचा जन्म झाला.. तिला पाहताक्षणीच नर्सच्या तोंडून ‘अय्यो, अलाकान!’ हे शब्द बाहेर पडले.. म्हणजेच हिंदीत ‘खुबसूरत!’
जेमिनी गणेशन व पुष्पवल्ली यांची ही सुपुत्री बारा वर्षांची असतानाच बालकलाकार म्हणून पहिल्यांदाच कॅमेऱ्यापुढे धीटपणे उभी राहिली.. ते आजपर्यंत तिचा ‘जलवा’ तसाच राहिला!!
तिला पहिला चित्रपट मिळाला, ‘सावन भादो’. नायक होता नव्यानेच आलेला नवीन निश्चल. चित्रपट तुफान गाजला. त्या पाठोपाठ तिचे एलान, हसीनों का देवता, गोरा और काला, एक बेचारा, रामपूर का लक्ष्मण हे चित्रपट आले व तिचे चित्रपटसृष्टीत बस्तान बसले..
आजपर्यंत १८० चित्रपट करणाऱ्या या रेखा नावाच्या ‘खुबसूरत’ अभिनेत्रीने काही अविस्मरणीय चित्रपटही दिले, ज्या चित्रपटांची निर्मिती जणू काही तिच्यासाठीच केलेली होती.. ‘खुबसूरत’ चित्रपटात तिने अल्लड तरुणीची, हलकीफुलकी भूमिका केली. ‘उत्सव’ मधील तिची वसंतसेना कुणीतरी विसरु शकेल का? ‘उमराव जान’ चित्रपटात तर तिने ‘जान’च ओतली आहे.. ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील जोहराबाईला, खुद्द लंबूही विसरला नाही, मग आपली काय पत्रास? ‘इजाजत’ मधील सुधा, ही रेल्वे स्टेशनवर नाही तर आपल्या हृदयात घर करुन रहाते.. ‘घर’ चित्रपटातील तिचा सशक्त अभिनय मनात ‘घर’ करुन राहतो.. ‘नमक हराम’ मधील कामगार वस्तीतील भोळी भाबडी श्यामा, राजेश खन्नाच्या नव्हे तर आपणच तिच्या प्रेमात पडतो..
तिने अनेक दाक्षिणात्य हिंदी चित्रपटात काम केलेले आहे, त्यामध्ये जितेंद्र सोबतच्या चित्रपटांची संख्या ही सर्वाधिक आहे. दोन भुवयांच्या मध्ये बिंदी लावण्याच्या तिच्या पद्धतीचे असंख्य स्त्रियांनी अनुकरण केलेले आहे..
तिचे नाव पहिल्यांदा विनोद मेहरा बरोबर जोडले गेले. नंतर अमिताभ बच्चन बरोबर ‘सिलसिला’ सुरु झाला.. अमिताभचे चित्रपट पाहताना, त्याच्यासोबत तिने समरसून केलेला अभिनय खूप काही सांगून जातो…
तिला कडक मंगळ असल्यामुळे ‘मंगळसूत्र’ चित्रपटात काम करुनही तिला विवाहसौख्य असे लाभलेच नाही. एकदा वय निघून गेल्यावर तिने लग्नाचा विषयच सोडून दिला आहे..
सर्वसाधारणपणे वयाच्या पन्नाशीनंतर अभिनेत्री मायानगरीच्या या झगमगाटापासून दूर जातात.. हिच्या बाबतीत नेमके उलटे घडलेले आहे, पन्नाशीनंतर हिचे सौंदर्य वाढतच गेलं व प्रत्येक वाढदिवसाला म्हातारपण, तिला चिरतारुण्याचा आशीर्वाद देऊन निघून जाऊ लागलं…
ती सदुसष्ट वर्षांची झालीय. अजूनही तीन तपं तरी ती सेलेब्रिटी म्हणून नक्कीच वावरेल याची खात्री आहे…
भूमिती विषयात, अनेक बिंदू मिळून रेखा (रेष) तयार होते.. हे वाचलेलं होतं.. तशीच ही अनेक भूमिका लिलया साकारणारी, सरळ रेखा अनंत काळ रसिकांच्या स्मरणात नक्कीच राहील…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१०-१०-२१.
Leave a Reply