संयम
दिनूची ठिगळ लावलेली चड्डी आणि विरलेला शर्ट असला तरी त्याची भेगाळलेली पाटी स्वच्छ असायची. खिशात पेन्सिलचा एक इंचाचा एकच तुकडा. त्याचं अक्षर इतकं छान की त्याची गरिबी या रेखीव सौंदर्याने झाकून जायची. मधल्या सुट्टीत किशोर पेन्सिलच्या पैशात अर्धी लेमनची गोळी विकत होता. तेव्हा दिनू त्याची नजर चुकवून खिशातली पेन्सिल घट्ट धरत परत वर्गात जाऊन बसला.
रुपाया
हायस्कूलच्या दारात सायकलवरून उतरताना भोळे सरांच्या खिशातून सुटे पैसे पडले. तीन नाणी सापडली पण अजून एक रुपायाचे नाणे सापडत नव्हते. प्रार्थना सुरू झाली तरी सर नाणे शोधत होते. हताश होऊन शाळेच्या कार्यालयात गेले, आजची रजा काढली. शाळा सुटली तरी अजून सर तिथेच तो रुपया शोधत होते. सहाव्या आयोगाच्या शालेय सभेत त्यांनी हा किस्सा सांगितला तेव्हा; नवा स्टाफ खो खो हसत होता.
अंध
कॉलेजला जाताना रमेशला पैसे सापडले. आई म्हणायची, ‘जे आपल्या कष्टाचं नाही ते आपलं नाही.’ रमेशने ते पैसे न मोजता एका अंध भिकाऱ्याच्या थाळीत ठेवले. नोटांचा आवाज अंधाने पाहिला, ऐकला नाही. त्याने डोळे उघडले आणि गर्दीत पसार झाला. जाता जाता एकाचे पाकीटही मारले. रमेश नेहमीच्या हॉटेलात चहा-नाश्ता करायला बसला तेव्हा, आपलं पाकीट गेल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि समोर तो भिकारी फूल राईसप्लेट हादडत होता.
मिठी
आनंदची किडनी बदलायला सांगितल्यावर सारे कुटुंब हवालदिल झाले. कोणीच डोनर मिळेना. एक तयार झाला पण; दहा ते पंधरा लाख घेईन म्हणाला. शिवाय इतर अवाढव्य खर्च. शेवटी आनंदचा घरगडी नामदेव तयार झाला. आनंदला आनंद झाला पण; नामदेव किती पैसे मागेल? पुन्हा चिंता. ही स्मशान शांतता पाहून शेवटी नामदेव म्हणाला, ‘जीवाला जीव देण्याच्या मंदी पैसा कश्याला आणताय, तिथं फकुस्त किडनीच लागतीय खुशाल घ्या..’ आणि आनंदने श्रीमंत नामदेवला मिठी मारली.
बिनचूक
गेली अनेक वर्षे दिनू बँकेत कॅशिअर म्हणून बिनचूक सेवा देतो आहे पण; आज फरक लागला 50,000 रुपये कमी. संपूर्ण स्टाफ मदतीला आला पुनःपुन्हा कॅश मोजली. पैसे गेले कुठे? दिनूला घाम फुटला, सारे हवालदिल झाले. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला स्टेट बँकेचा फोन, ‘आम्हाला पन्नास हजार एक्सेस लागलेत. तुमची कॅश टॅली झाली का?’ सर्वांना आनंद झाला. दिनूने सुटकेचा श्वास सोडला आणि तो आम्हाला तितकीच कॅश लेस आहे असे सांगणार इतक्यात; 50 हजाराचे पाचशेचे एक बंडल कॅश काऊंटिंग मशिनच्या मागे पडलेले दिसले. आपली कॅश जुळवून दिनू स्टेट बँकेच्या मदतीला गेला.
बेशुद्ध
महागाईला वैतागलेले वसंतराव दुकानात, मंडईत, बँकेत हुज्जत घालू लागले. आमच्यावेळी असं होतं, तसं होतं. सारखे पेन्शनचे पैसे मोजायचे. दरमहा मिळणारे व्याजही निम्मे झाले या विवंचनेत ते आजारी पडले. आता कसे होणार रे देवा ..! त्यांची शुद्ध हरपली. त्यांची मुले आली उपचार केले शुद्धीवर येताच त्यांना व्याजदर आणि पेन्शन वाढल्याची खोटी बातमी सांगितली. आपल्याला चांगले पैसे मिळणार या आनंदात वसंतराव पुन्हा बेशुद्ध झाले.
दरोडा
श्रीमंत रामलालशेठ धनाढ्य पण कवडीचुंबक माणूस. उशाला पैसे घेऊन झोपायचे. रात्री त्यांना तीन ते चार वेळा जाग यायची तेव्हा ते उशाचे पैसे पुनःपुन्हा मोजायचे. बायकोची दरवेळी झोपमोड व्हायची. एके रात्री अचानक दरोडा पडला. चोरांनी रामलालला खांबाला बांधून पैसे पळवले. दुसऱ्या दिवशी रामलालची बायको दरोडेखोरांनी परत दिलेले पैसे बरोबर आहेत का म्हणून मोजत होती.
भ्रमभंग
अहोरात्र शंकराचा धावा करणाऱ्या राघवला अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले. राघवने देवाला चक्क पैशांचे झाड मागितले. तथास्तु । अंगणभर पैसेच पैसे. राघव पैसे भरायला पोते घेऊन गेला पण; अंगण मोकळे. फक्त चार-दोन नाणी सापडली. पहाटेपूर्वीच सरकारी माणूस झाडाला ईडीची नोटीस ठोकून जीएसटीची रक्कम घेऊन गेला.
-लक्ष्मीकांत रांजणे
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply