नवीन लेखन...

अलौकिक अडाणा

असेच काही द्यावे….  घ्यावे….
         दिला एकदा ताजा मरवा;
देता घेता त्यात मिसळला
         गंध मनातील त्याहून हिरवा.
कवियत्री इंदिरा संत यांच्या “मरवा” कवितेतील या ओळी, “अडाणा” राग ऐकताना, बरेचवेळा माझ्या मनात येतात. वास्तविक पाहता, दरबारी रागाच्या कुटुंबातील, हा महत्वाचा सदस्य पण जातकुळी मात्र फार वेगळी आहे. एकाच कुटुंबातील भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्वे असावीत आणि तरीही रक्ताचे नाते असावे, त्यातला हा प्रकार आहे. दरबारी गंभीरतेकडे झुकणारा तर अडाणा थोडा अवखळता दर्शविणारा!! राग अडाणा शक्यतो मध्य आणि तार सप्तकात रमत असल्याने, रागातील भावना देखील काहीशा तीव्र असतात.
रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, आरोही सप्तकात “गंधार” स्वराला प्रवेश नाही तर अवरोही सप्तक, सगळ्या सुरांना सामावून घेते. त्यामुळे रागाची जाती ही “षाडव/संपूर्ण” अशी होते. त्यापुढे बघायचे झाल्यास, “गंधार”,”धैवत”आणि “रिषभ” स्वर कोमल आहेत आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध. असे असले तरी “कोमल निषाद” स्वर या रागात फार महत्वाची भूमिका बजावतो. अर्थात, नेहमीप्रमाणे, “षडज-पंचम” वादी – संवादी असल्याने, कोमल निषाद स्वराचे नाते, या स्वरांबरोबर जुळून येते. रागच समय, रात्रीचा दुसरा प्रहर दिला असल्याने, आपसूक कोमल स्वरांना प्राधान्य मिळणे क्रमप्राप्त होते.
आता आपण, या रागाची बंदिश ऐकायला घेऊ. “माता कालिका” ही अत्यंत सुप्रसिद्ध चीज म्हणजे, पंडित जसराज यांच्या गायनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे, इतक्या जवळची आहे. ही बंदिश ऐकताना, आपल्याला रागदारी गायन, लालित्यपूर्ण पद्धतीने कसे मांडता येऊ शकते, याचा अप्रतिम अंदाज घेत येतो.  किंचित अनुनासिक स्वर, तिन्ही सप्तकात सहज विहार, तारता पल्ला अतिशय विस्तृत असल्याने, ताना, बोल ताना तसेच मुर्घ्नी स्वर, इत्यादी अलंकार सहजपणे गळ्यातून दृष्टीस पडतात. वास्तविक, नेमका मुर्घ्नी स्वर, ही फार कौशल्याची बाब मानली जाते पण, पंडितजी, अतिशय सहजपणे, हा अलंकार गळ्यातून साकार करतात.
प्रस्तुत रचनेत, या सगळ्या गुणांचा आढळ तर दिसतोच पण, त्यापेक्षा वेगळी बाब म्हणजे शब्दोच्चार. बंदिशीत स्पष्टपणे, काली मातेची पूजा आहे तेंव्हा स्वरांत समर्पण वृत्ती आढळणे, सहज शक्य आहे. भावनेच्या अंगाने सादरीकरण,हे पंडित जसराज यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
“ऐ दिल मुझे ऐसी जगह” हे “आरझू” चित्रपटातील,अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेले गाणे, म्हटले तर “अडाणा” रागावर आहे. याचे मुख्य कारण, गाण्याची सुरवात, “दरबारी” रागाच्या काठाने होते पण, अस्ताईच्या दुसऱ्या ओळीत आपल्याला “अडाणा” रागाची खूण सापडते. मी वरती म्हटल्याप्रमाणे, दरबारी आणि अडाणा, हे दोन राग एकाच कुटुंबातले पण, वेगळ्या स्वभावाचे. त्यामुळे एखादा सूर जरा वेगळ्या प्रकारे लागला की लगेच रागाची अदलाबदल होते आणि हेच भारतीय रागदारी संगीताचे फार मोठे वैशिष्ट्य मानावेच लागेल. केरवा तालात, ही रचना बांधली आहे. अनिल दा, आपली रचना कधी “आक्रोशी”, “अनघड” स्वरुपाची करीत नाहीत परंतु रचना गाताना, त्यातील गायकी अंग आपल्याला दिसून येते. खरतर असे म्हणता येईल, “अनिल दा” म्हणजे हिंदी चित्रपट गीतातील एक असामान्य “स्कूल” होते आणि त्यांच्या रचनेचा प्रभाव, अगदी राहुल देव बर्मन पर्यंत अव्याहतपणे पडलेला होता. शास्त्रीय संगीताचा सांगोपांग व्यासंग आणि चित्रपटासाठी गाणे कसे बांधायचे, याची नेमकी जाण असलेला हा संगीतकार. तलत मेहमूद आणि मुकेश, या गायकांना प्रकाशात आणणारा संगीतकार, म्हणून या रचनाकाराची ओळख दीर्घकाळ स्मरणात राहील.
“ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो,
अपना पराया मेहरबां ना मेहरबां कोई न हो”.
लखनौ सारख्या संगीताने प्रभावित असलेल्या शहरात वावरल्याने, आवाजात खास “लखनवी तहजीब” बाळगून असलेला गायक म्हणजे तलत मेहमूद. तसे बघितले तर तलतच्या आवाजाला काही प्रमाणात मर्यादा होत्या, चित्रपटात अनेक प्रसंग असतात आणि त्यानुरूप गायन करणे, ही गायकाची गरज असते. तलतने आपल्या गळ्याची “जात” ओळखली होती आणि त्यानुरूप गाणी स्वीकारली. परिणाम असा झाला, संख्येच्या दृष्टीने, तलतची गाणी फारच तुरळक झाली.वरील गाणे जे आपण ऐकले, तोच या गायकाचा खरा पिंड!! लखनौच्या संपन्न, शिष्ट,सुसंस्कृत आणि संयमित वातावरणाचा हा अपरिहार्य परिणाम म्हणावा लागेल. थोडक्यात, बेगम अख्तर यांनी गझल गायनात जो आदर्श निर्माण केला, त्याच्या जवळपास फक्त तलत जाऊ शकतात. १९६० नंतर या गायकाची पीछेहाट झाली कारण, नंतरच्या संगीत शैलीत, सुरावट, संथ गती व नाजूक प्रक्षेपणास जागा नव्हती. आपण कुठली गीते गायची त्यांच्या संहितेबाबत ते चोखंदळ होते. अर्थात लखनौचा वारसा म्हटल्यावर, उर्दूचे स्वच्छ, शुद्ध उच्चारण आणि कोणत्या रचनेस गाण्याच्या योग्यतेचे काव्य समजायचे याबाबतची उच्च अभिरुची!! शक्यतो, मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात, गायनाची पातळी ठेवायची. गाताना, शायरीचे नितांत महत्व जाणून, गायकी दाखवायची तसेच ताना घेताना देखील कधीही आशयाच्या अभिव्यक्तीला धक्का पोहोचणार नाही, हीच वृत्ती ठेवायची. परिणाम असा झाला, गायनात, कधीही संपूर्ण सप्तक आवाक्यात घेतले आहे, असे ऐकायला मिळत नाही. अर्थात, हा मुद्दा सुगम संगीताच्या बाबतीत गैरलागू आहे.
“मन मोहन मन मे हो तुम्ही” हे “कैसे कहू” चित्रपटातील असेच एक अतिशय सुश्राव्य चालीचे गाणे, या रागाच्या सावलीत वाढते. संगीतकार  एस.डी.बर्मन,याच्या चतुरस्त्र प्रतिभेचे आणखी अप्रतिम उदाहरण, म्हणून या गाण्याचा निर्देश करता येईल. गाण्याच्या सुरवातीच्या आलापीपासून, आपल्याला “अडाणा” रागाची ओळख करून घेता येते पण, हा संगीतकार, नेहमीप्रमाणे, रागाच्या आधार स्वरांना हाताशी घेतो आणि पुढील वाटचाल, स्वतंत्र करतो, जणू या संगीतकाराचा हा स्वभाव असावा, असेच वाटते. त्रिताल वापरलेला आहे आणि तो देखील सरळ, स्पष्ट वापरला आहे. रफी/सुमन कल्याणपूर/एस.डी. बातीश, या त्रयींनी हे गाणे गायले आहे. गाणे जरा बारकाईने ऐकले तर आपल्याला सहज समजून घेता येईल, या रागाचे जे वादी/संवादी स्वर आहेत, (षडज/पंचम) ते ज्या वजनाने, या रागात वावरतात, त्याच वजनाने, या रचनेत वावरत आहेत. “मन मोहन मन मे” ही ओळ ऐकताना(च) आपल्याला या रागाची ओळख होते. असे असून देखील, आपण, पुढील अंतरा ऐकला तर, रागाच्या सावलीतून ही रचना बाहेर पडते आणि आपले “स्वतंत्र” अस्तित्व प्रगट करते. अशा खेळात, हा संगीतकार फार वाकबगार होता.
“मन मोहन मन में हो तुम ही,
मोरे अंग अंग तुम ही समाये,
जानो या जानो ना हो तुम ही”.
आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, सुरेल आणि लहान स्वरांशांचे सफाईदार द्रुतगती गायन, हे गुण, रफी यांच्या बाबतीत मांडता येतील. सुरवातीच्या काळात, ढाल्या स्वरात आणि नंतर अवतरलेल्या नाटकी प्रत्ययाशिवाय गायलेली आढळतात. आवाज आणि गायनशैली या बाबतीतल्या, नव्या युगाच्या मागण्या त्यांनी विनासायास पूर्ण केल्या. आपल्या आवाजात “गोलाई” आहे, याची त्यांना यथार्थ जाणीव होती आणि प्रसंगी त्या विशेषाचा त्यांनी वापर केल्याचे आढळून येते. अर्थात इथे एक प्रश्न उपस्थित होतो. प्रचलित म्युझिक व्हिडियोसाठी गायन करणे, त्यांना कितपत भावले असते? खरतर चित्रपटीय आविष्कारांच्या गतीमानतेस लवचिक प्रतिसाद देण्याचे रफी यांचे कौशल्य अतुलनीय होते पण, कलाविचारांत अशा “जर-तर” या बाबींना तसा फारच कमी वाव असतो.
सुमन कल्याणपूर हे असेच काहीसे दुर्लक्षित गेलेले नाव. सुरेल आवाज, हलका पल्लेदार आणि पारदर्शक आवाज, भडक नसलेले स्वनरंग आणि त्यांच्या छत विपुलतेने ऐकायला मिळतात. परिणाम असा, त्यांच्या गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. या गायिकेला रागदारी संगीत अवगत होते, का नव्हते, याची प्रचीती देणाऱ्या रचना फारशा मिळाल्या नाहीत पण, जिथे शक्यता होती, तिथे त्या रचनेनुरुप पडताळा घेता येतो. लताबाईंनी आवाज आणि लगाव, याबाबत जे कौशल्य ज्या प्रकारे आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दाखवले त्याच्या जवळपास, केवळ हीच गायिका पोहोचू शकली असती, असे ठामपणे मांडता येते. तितकी या गायिकेच्या गळ्याची क्षमता आणि ताकद नक्कीच होती. अर्थात, त्यांना जर का संधी लीलाल्या असत्या, अधिक टिकाऊ चित्रपट मिळाले असते तर लताबाईंच्या कर्तृत्वास पर्यायी केंद्र म्हणून उभी राहण्याची क्षमता, त्यांच्या गायकीत निश्चित आढळत होती पण दुर्दैवाने तसे घडले नाही!!
हिंदी चित्रपट “अनपढ” मध्ये कितीतरी मधुर, सुश्राव्य गाणी आहेत. त्यातील “”आप कि नजरो ने समझा” हे गाणे आजही संगीतकार मदन मोहन यांच्या सर्वोत्तम रचनांपैकी एक रचना मानली जाते. गाण्याची तर्ज अतिशय अवघड आहे, क्षणात चाल वरच्या स्वरांत जाते तर पुढल्या क्षणी चाल, मंद्र सप्तकात प्रवेश करते. परिणाम असा होतो, गळ्याची परीक्षा सतत घेतली जाते. त्यातून, गाण्यात तालवाद्य म्हणून पारंपारिक वाद्ये नसून, अतिशय खालच्या स्वरांत गिटार वाजत असते आणि त्या वाद्याचा सूर, हीच समेची मात्रा गृहीत धरली आहे. त्यामुळे, गाणे लयीला फार कठीण होऊन बसले.
“आप कि नजरो ने समझा प्यार के काबिल मुझे,
दिल कि ऐ धडकन ठेहर जा, मिल गयी मंझील मुझे”.
गाण्यात सुरवातीलाच “अडाणा” रागाचे स्वर ऐकायला मिळतात पण नेहमीप्रमाणे संगीतकार मदन मोहन रागाची “कास” सोडतात आणि चालीला, शब्दानुरूप वेगळे वळण देतात. त्याबाबतीत या संगीतकाराची शैली ही गीतधर्मी आहे. आपण सादर करीत आहोत, तो आविष्कार चित्रपट गीताचा आहे आणि याची वाजवी जाणीव मदन मोहन यांच्या प्रत्येक रचनेत ठळकपणे उठून दिसते.
प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही, शांताराम यांच्या “झनक झनक पायल बाजे” या चित्रपटाचे शीर्षक गीत याच, अडाणा रागावर आधारलेले आहे. संगीतकार वसंत देसायांनी याची चाल बांधली आहे. वास्तविक, या शब्दांची चीज देखील प्रसिद्ध आहे. परंतु चित्रपटाचे शिषक गीत कसे असावे, याचा हे गाणे म्हणजे उत्तम उदाहरण ठरावे. तीन मिनिटांच्या अवकाशात रागाची सगळी लक्षणे दाखवायची पण रचना म्हणजे “राग” नव्हे ही जाणीव यथार्थपणे जाणवून द्यायची, अशी दुहेरी कसरत या गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळते. गायक उस्ताद अमीर खान साहेब म्हणजे रागदारी संगीतातील स्वतंत्र प्रकरण!! त्यांच्या गायकीचा अंदाज घेऊन, रचनेत ताना, हरकती, सरगम इत्यादी अलंकारांचा व्यवस्थित उपयोग केला आहे.
“झनक झनक पायल बाजे,
पायलिया की रूनक झुनक पर,
छम छम मनवा नाचे”.
वर उल्लेख केल्याप्रमाणे, गाण्यात रागाचे स्वरूप प्रथमक्षणी ऐकायला मिळते आणि संपूर्ण चाल ही याचा रागाभोवती फिरत आहे. या बाबत एक किस्सा ऐकायला मिळाला आहे. सुरवातीला संगीतकार वसंत देसायांनी “दरबारी” रागात चाल बांधली होती पण चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही, शांताराम, यांना ती चाल फारशी पसंत पडली नाही. त्यामुळे वसंत देसाई काहीसे चक्रावले पण लगेच त्यांनी दरबारी रागातील स्वरांना अडाणा रागाच्या अंगाने घेतले आणि चालीचे स्वरूपच बदलून गेले. भारतीय रागादारी संगीताच्या श्रीमंतीचे हे सुरेख उदाहरण!!
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..