अफगाणिस्तानात अलीकडे सापडलेल्या काही मुर्तीपैकी ही एक मूर्ती आहे. काही वर्षापूर्वी ही गार्देझ येथे सापडली होती व पुढे हीच मूर्ती काबुल येथे नेण्यात आली. काबुलचे रहिवाशी पामीर सिनेमाजवळ दर्गा पीर रतननाथ येथे तिची पूजा करीत असतात. मूर्तीचे शिल्पकाम हे हिंद-अफगाण कब शैलीचा वैशिष्ट्यपूर्ण परिपाक आहे. मूर्ती उभी असून तिच्या चौथर्यावर संस्कृतमध्ये पूढील प्रमाणे वाक्य कोरलेले आहे. महान सुंदर विनायकाची प्रतिष्ठापना ख्यातनाम परमभठ्ठारक महाराजाधिराज खिंगला यांनी आपल्या ८० व्या वर्षी महा जेष्ठ मासी त्रयोदशीला विशाखा सिंह लग्नाच्या शुभ मुहूर्तावर केली होती” ह्या उल्लेखामुळे ही मूर्ती ५ व्या शतकाच्या उत्तरार्धात व ६ व्या शतकाच्या पूर्वार्धातील असावी असे वाटते.
अलीधासना स्वरुपात दिसणारी ही मूर्ती उभी असून तिचे हात, पाय व छाती पुष्ट दिसतात. ह्यावरून शिल्प कामावर प्राचीन ग्रीक संस्कृतीचा दाट प्रभाव पडलेला दिसतो. मस्तकावर घट्ट बसलेला मुकुट व गळ्यात घट्ट बसलेला कंठा हे गुप्तकाळाच्या शिल्पकलेप्रमाणे वाटतात पण त्यावरील नक्षीकाम मात्र इजिप्तसंस्कृती प्रमाणे केले आहे. (त्या सर्वांचा रोम शिल्पकलेमध्ये समावेश आहे) त्यामुळे हे शिल्प रोम शिल्पकलेप्रमाणे आहे असे सुद्धा वाटते. मूर्तीला चार हात असून अज्ञोपवीत सर्पाचे आहे. त्याचे धोतर, एक लहान धोतर (असाधक) असून त्यावर सिंहाचे मुखवटे (कीर्तिमुख) कमळाच्या पाकळ्या आणि पावशापक्षाच्या झुबेदार शेपटीची झालर असे नक्षीकाम आहे.
भरदार हात, पोट, नाक, यज्ञोपवीत, उर्ध्वमेघ व त्याच्या घोतरावरील वेगवेगळी नक्षीकामे ही सर्व मगध देशाच्या कलेतून प्रेरणा घेतल्याचे दर्शवितात. परंतू स्नायुबद्ध असलेले शरीर पाहता या मूर्तीवर उर्वरित ग्रीक कलेचा प्रभाव पडलेला दिसतो. मुकुट व कंठा ह्याच्यावर इजिप्त व रोम संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो.
मूर्तीचे हात सेवेकरी गणाच्या डोक्यावर विसावलेले आहेत व गण भक्तीभावाने गणेशाकडे बघत आहेत. वरवर पाहता हे गण ग्रीक डॉल्फिन माशासारखे वाटतात व त्यांना गुप्तकाळांतील शिल्पाप्रमाणे कुरळे केस, कर्ण कुंडले, कंठ आहेत ह्यावरून ही मूर्ती कुशान व गुप्तकाळाच्या मधल्या संक्रमण काळातील (४ थ्या शतकातील) असावी असेही म्हणता येईल.
अत्यंत दुर्मिळ व एकमेव महाविनायक म्हणून अफगाणिस्तानातील हा गणेश जगात फार प्रसिद्ध आहे.
— जगदीश पटवर्धन
नमस्कार.
अफगाणिस्तानातील गणेश मूर्तीवरील लेख माहितीपूर्ण आहे. जरी सर्वांना हें माहीत असते की अफगाणिस्तान ( गाइधार) हा पूर्वी भारतीय संस्कृतीचा भाग होता, तरी तेथील बामियन येथील बुद्धमूर्तौव्यतिक्त अन्य मूर्तींबद्दल माहिती नसते. त्या दृष्टीनें हा लेख उपयुक्त आहे. लेखामध्ये त्या गणैशमूर्तीचा फोटे बघतां आला असता तर अधिक आनंद झाला असता.
– सुभाष स. नाईक