भारतात हजारो वर्षांपासून अनेक प्रकारच्या नैसर्गिक घटकांचा दैनंदिन आहारात वापर होत आला आहे. आहारातील विविधता हा, भारतीय जीवनशैलीचा एक भाग आहे. औषधीतत्वांनी युक्त आहार तयार करून, असाध्य रोगांवरही परिणामकारक ठरेल असे अन्नग्रहण करणे, हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्टय आहे.
अशाच बहुविध घटकांपैकी एक म्हणजे आळींबी होय. आळींबीच्या वापरा संदर्भात प्राचीन आयुर्वेदिक ग्रथांमध्ये विविध उल्लेख आढळतात. आळींबी ”मशरूम” या नावाने सगळीकडे प्रसिद्ध आहे. ग्रामिण भागात सात्या, डुंबरसात्या, केकोळया या नावांनी प्रसिद्ध आहेत. इंग्रजीत ”Mushroom” हे नाव असुन, शास्त्रीय भाषेत ”VolvariellaVolvacea” असे नाव आहे. ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आळींबीचा वापर होतो.
विविध आजारांवर रामबाण औषध असलेले, मशरूम बुरशीजन्य पीक आहे, हे वाळवीच्या वारूळातुन, वाळवीने साठवलेल्या अन्नावर (उदईच्या डुंबरावर) नैसगिकरित्या उगवत असते. वाळवीचे दोन प्रकार (काळी व गव्हाळ रंगाची) असल्याने, दोन प्रकारची मशरूम उगवते. तसेच विविध झाडे व कुजक्या वनस्पतींवरही ही उगवत असते. लांब दांडयाची (Oyster / straw mushroom) व बटनमशरूम (Button mushroom) असे दोन प्रकार पहावयास मिळतात. लांब दांडयाची मशरूम उष्ण प्रदेशात उगवते तर बटन मशरूम थंड प्रदेशात उगवते तर बटन मशरूम थंड प्रदेशात उगवते.
परिपक्व १०० ग्रॅम आळींबीमध्ये २६ कॅलरी उर्जा, स्टार्च (Carbohydrate) ४.३ टक्के प्रथिने (Protine) ३.९ टक्के मिळते. तसेच नाईसीन अॅसीड पॅन्टोथेनिक, अॅसीड एक सुगंधी अमीनो अॅसीड, थायमिन अॅसीड न्युक्लिक, अॅसीड सेलेनिअम, कॉपर झिंक कॅल्शिअम, मॅग्नेशिअमपोटॅशिअम, ,फॉस्फरस, अशी शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक खनीजे असतात. आळींबीमघ्ये अॅन्टीअॅलर्जिक, अॅन्टी कोलेस्टेरॉल, अॅन्टीट्युमर, अॅन्टीकॅन्सर, अॅन्टीपॅरास्टि, अॅन्टीबॅक्टेरीअल, अॅन्टीव्हायरल, अॅन्टीईन्लॅमेटरी, अॅन्टीहॉयपरटेन्शन, हिपॅटोप्रोटेक्टिव, अॅन्टीअ़ॅन्थ्रास्केलेरोसीस, अॅन्टीडायबेटिक, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे व पचनशक्ती वाढविणारे तत्व आहेत.
सन १९८३ साली स्थापन झालेल्या “राष्ट्रीय आळींबी संशोधन केंद्राच्या” माध्यमातुन विविध प्रकारच्या आळींबीच्या जाती संशोधित करण्यात आलेल्या आहेत. तसेच काही जाती पारंपारिक ही आहेत. काबुलभिंगरी/धिंगरी, यु३, एस११, एस७६, एस३१०, एस७९१, एनसीएस१००, एनसीएस१०१, एनसीएच१०२, एनसीबी६, एनसीबी१३ अशा विविध जाती आहेत.
आळींबीच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ संसाधनांचा वापर केला जाऊ शकतो. उदा. ऊसाची वाळलेली पाने, मक्याची व ज्वारीची धाटं, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, धानाची (भात) तनस, गव्हाचा गव्हांडा, सोयाबीनचा कूटार अशा विविध साधनांचा वापर करून आळींबीचे पीक घेता येते.
विशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्या आळींबीचा, देशांतर्गत आणि निर्यातीसाठी ही वापर केला जातो. जम्मुकाश्मिर, हिमाचलप्रदेश, तामीळनाडु, उत्तरप्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांमध्ये आळींबी उगवते. महाराष्ट्राच्या विदर्भातील जंगलांमध्ये नैसर्गिकरित्या उगवणारी आळींबी अत्यंत चवदार असते.
ओली आळींबी ३०० ते ४०० रूपये प्रतीकिलो दराने विकली जाते. ५० ते ६५ अंश सेल्सीअस तापमानात
वाळविलेली आळींबी बाजारात विकली जाते. दिल्ली, मुंबई, चंदीगड, चेन्नई, श्रीनगर अशा विविध शहरांमध्ये आळींबीला मोठी मागणी आहे.
आळींबीची देशा बाहेर इंग्लंड, स्विडन, अमेरिका, रशिया, स्वितझरलँड, इजराईल, नेदरलँड, डेन्मार्क, जर्मनी व अन्य देशांमध्ये निर्यात केली जाते. आळींबीचा वापर करतांना तीची जाणकारांकडुन योग्य ओळख करूनच खाणे सोयीचे ठरू शकते. सोबत मी विविध मशरूमचे छायाचित्र देत आहे.
आळींबीची व्यावसायिक शेती, शेतकर्यांसाठी वरदान ठरू शकते. गरज आहे फक्त प्रयत्नांची, सोबतच अद्यावत तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांच्या अभ्यासाची ही आवश्यकता आहे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply