नवीन लेखन...

सेन्सेक्स विषयी सर्व काही

सेन्सेक्स विषयी सर्व काही…. (शेअर मार्केटशी मैत्री – लेख २)

“बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” ची स्थापना  १८७५ मध्ये दलाल स्ट्रीट मुंबई याठिकाणी झाली, भारतातील हे सर्वात जुने व प्रसिद्ध मार्केट आहे.राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) अस्तित्वात येण्यापूर्वी बॉम्बे स्टोक एक्स्चेंज मार्फत शेअर चे सर्व व्यवहार होत असत. १९९५ पर्यंत BSE वर होणारे सौदे “इलेक्ट्रॉनिक सिस्टीम” ने होत नव्हते. मात्र १९९५ पासून सर्व सौदे “इलेक्ट्रॉनिक सिस्टीम”ने होतात. BSE वर  आज साधरण पणे ५००० पेक्षा ज्यास्त कंपन्या नोंदल्या गेल्या असून साधरण पणे सर्व दिग्गज कंपन्यांचे व्यवहार  “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” वर नियमितपणे होत असतात.

आपण सहज ऐकतो किंवा वाचतो की “आज सेन्सेक्स ३०० अंकानी वाढला”, “आज सेन्सेक्सने नवे शिखर गाठले” “आज सेन्सेक्स कोसळला” “लोकांचे एवढे करोडो रुपये बुडाले” शेअर मार्केटशी संबध नसणार्यांना पण याचा अंदाज येतो की आज शेअर मार्केट मध्ये शेअरचे भाव वाढले किंवा कोसळले आहेत. आपल्या रोजच्या सहज बोलल्या जाणारया “सेन्सेक्स” या शब्दाचा नेमका अर्थ किती लोकांना माहिती आहे ? जेव्हा सेन्सेक्स वाढतो तेव्हा सर्व शेअर्सचे भाव वाढतात का ? माझ्या पाहण्यात असे अनेक जण आहेत की त्यांची तक्रार असते की आज सेन्सेक्स नवीन उंचीवर पोचला पण मी घेतलेल्या शेअरचा भाव मात्र वाढला नाहीये तर तो कमी झालाय. त्यांच्या या वाक्यातूनच समजत की त्यांना सेन्सेक्स म्हणजे काय तो कसा मोजतात हे माहित नाहीये. “सेन्सेक्स” हा मुंबई शेअर मार्केटची प्रगती दाखवणारा इंडेक्स आहे. त्यामध्ये काही ठराविक कंपन्या समविष्ट आहेत.  या कंपन्यांच्या भावात होणारी वाढ किंवा घट म्हणजेच सेन्सेक्सची वाढ किंवा घट. मात्र सेन्सेक्स वाढला की त्यात समविष्ट असणऱ्या सर्व कंपन्यांचे भाव वाढतीलच असे नाही. शेअर मधे नियमित गुंतवणुक करणाऱ्यांना काही जणांना देखील याबाबत पूर्ण माहिती नसेल. सेन्सेक्स कसा मोजायचा , सेन्सेक्स कोसळला किंवा वाढला म्हणजे नेमके काय झाले असे प्रश्न अनेकांना पडत असतील. म्हणून आपण सोप्या भाषेत थोडक्यात जाणून घेऊया सेन्सेक्स म्हणजे काय आणि तो कसा मोजतात.

आज शेअर मार्केट हे देशाची अर्थ व्यवस्था व प्रगती याचा दिशा दर्शक मानले जाते. आज भारतातील शेअर मार्केट मध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढतोय याचे कारण शेअर बाजारातून मिळणारे आकर्षक उत्पन्न. मार्केटचा परफॉर्मन्स कसा चालला आहे हे ठरवण्यासाठी इंडेक्सची आवश्यकता असते. “सेन्सेक्स” हा BSE चा इंडेक्स असून BSE चा perfomance कसा आहे याची कल्पना सेन्सेक्स वरून येऊ शकते. सेन्सेक्स ही इंडेक्सची संकल्पना जानेवारी १९८६ पासून अस्तित्वात आली. त्यासाठी १९७९ हे base year मानले गेले.  “सेन्सेक्स” मध्ये BSE वर नोंद झालेल्या मोठी उलाढाल असणाऱ्या, आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या विवध क्षेत्रातील अग्रगण्य अशा ३०  निवडक “लार्ज कॅप” कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश केला गेला. सेन्सेक्स मध्ये सुरवातीला समाविष्ट असणाऱ्या कंपन्या या मध्ये काळानुसार बदल होत गेले. कारण सेन्सेक्स मध्ये समविष्ट कंपन्यांचा नियमितपणे BSE सेन्सेक्स विषयीच्या समिती कडून आढावा घेतला जातो. सेन्सेक्स मध्ये सामील करताना काही आवश्यक मापदंड आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. सेन्सेक्स आपल्या देशाच्या आर्थिक प्रगती दाखवत असल्याने सेन्सेक्स मध्ये इकॉनॉमी मधील सर्व क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जातो. सेन्सेक्स मध्ये सामील करण्यात येणाऱ्या कंपनी साठी खालील बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे.

  • सेन्सेक्स मध्ये समवेश असणारी कंपनी BSE वरील लिस्टेड “लार्ज कॅप” कंपनी असली पाहिजे. (साधारणपणे मार्केट कॅपिटलायझेशन नुसार पहिल्या १०० कंपन्या मध्ये समवेश असणारी).
  • कंपनीचे शेअर्सचे सौदे रोज होत असले पाहिजेत.
  • कंपनी तिच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असली पाहिजे.
  • कंपनीला चांगली लिस्टिंग हिस्टरी पाहिजे.
  • कंपनी नफा कमावणारी, नियमित लाभांश देणारी, आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि गुंतवणूकदारांचे हित जपणारी असली पाहिजे.

अर्थात हे मापदंड आहेत सेन्सेक्स विषयीची समिती याबाबतीत योग्य ते निर्णय घेत असते आणि ग्राहकांना त्याची माहिती दिली जाते.

  • सेन्सेक्स कसा काढला जातो

आता हा इंडेक्स काढण्याची पद्धत पाहूया. या सेन्सेक्स मोजणीसाठी मुलभूत साल (base year) हे १९७८-७९ मानले आहे व निर्देशांक १०० अंक मानला गेला, म्हणजेच  सेन्सेक्स मध्ये सुरवातीला समाविष्ट केलेल्या ३० कंपन्यांच्या “फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन” (बाजारात  विक्री साठी उपलब्ध असणाऱ्या  शेअर्सची बाजारातील एकूण मूल्य) नुसार त्यांचे निर्देशांक मधले वेटेज ठरवले गेले. ज्या कंपन्यांचे  “फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन”  ज्यास्त अर्थातच त्यांचे सेन्सेक्स मध्ये वेटेज पण ज्यास्त. या ३० कंपन्यांच्या “फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन”  जस जशी वाढ किंवा घट  होत गेली त्यानुसार सेन्सेक्स मध्ये वाढ किंवा घट झाली. सुरवातीला “फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन” ही संकल्पना सेन्सेक्सच्या मोजणी साठी नव्हती. फक्त “टोटल मार्केट कॅपिटलायझेशन” हे सेन्सेक्स मोजणीसाठी धरले जात असे. २००३ पासून “फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन” सेन्सेक्स मोजणीसाठी धरले जाऊ लागले.

आता थोडक्यात “फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन”, “टोटल मार्केट कॅपिटलायझेशन” म्हणजे काय ते पाहुया.

टोटल मार्केट कॅपिटलायझेशन कंपनीचे शेअरची संख्या  x कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव
फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन कंपनीच्या ट्रेडेबल शेअर ची संख्या x कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव
नॉन ट्रेडेबल शेअर कंपनीच्या प्रमोटर कडील, विक्रीला उपलब्ध नसणारे.

 

उदा. समजा एखाद्या कंपनीने १० रुपये दर्शनी मूल्याचे आहे १००००० शेअर्स जारी केले आहेत. या कंपनीच्या शेअरचा बाजारातील आजचा भाव जर ६० रुपये असेल तर कंपनीचे आजचे “मार्केट कॅपिटलायझेशन” १००००० x ६० म्हणजे ६०००००० (साठ लाख) एवढे होईल.

आता  १००००० शेअर्स पैकी ४०००० शेअर्स जर प्रमोटर म्हणजे कंपनीचे प्रवर्तक यांचे कडे किंवा विक्रीला उपलब्ध नसणारे तर बाजारात  ६०००० समभाग असतील जे बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध राहतील त्यामुळे  “फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन” ६०००० x ६० म्हणजे ३६ लाख.

अशा पद्धतीने सेन्सेक्स साठी निवडल्या गेलेल्या निवडक ३० कंपन्याचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन काढले जाते.या सेन्सेक्स मोजणीसाठी मुलभूत साल (base year) हे १९७८-७९ मानले आहे. म्हणजे या साली सेन्सेक्स १०० अंक मानला आहे.

 

सेन्सेक्स = १०० ÷ बेस सालचे “मार्केट कॅपिटलायझेशन” × आजचे मार्केट कॅपिटलायझेशन.

 

आता समजा त्यावेळी  “फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन” जर १००००० (एक लाख) होते ते आज १५००००० (पंधरा लाख) झाले, तर आजचा सेन्सेक्स

१०० ÷ १००००० × १५०००००० = १५०० असेल.

याप्रमाणे सेन्सेक्स कंपन्यांचे शेअरचे भाव जस जसे वाढतात किंवा कमी होतात तसा सेन्सेक्स मधे बदल होत असतो. आज सेन्सेक्स ३९००० अंकांच्या पुढे पोचला आहे. आता आपण पाहिले की सेन्सेक्स आपण कसा मोजला जातो त्यावरून आपल्या लक्षात येईल की सेन्सेक्सची वाढ व घट ही प्रामुख्याने बाजारची दिशा दाखवणारी आहे.सेन्सेक्सच्या बाहेर असणऱ्या अनेक कंपन्या आहेत त्यांचे भाव तसेच वाढतील असे नाही.साधारणपणे सेन्सेक्सची चाल मार्केट मधील इतर शेअर्स वर परिणाम करतेच कारण शेअर मार्केट मुळात सेंटी मेंटल असत.                                                                               

सेन्सेक्स मध्ये समाविष्ट असणारे शेअर काळानुसार बदलत असतात. ह्यासाठी शेअर बाजाराची तज्ञ लोकांची समिती असते, ती या सेन्सेक्स  मधील शेअर्स चा नियमितपणे आढावा घेत असते. आवश्यकतेनुसार एखादी कंपनी सेन्सेक्स मधून बाहेर जाते आणि त्याबदल्यात नवीन कंपनी समविष्ट केली जाते. साधरण पणे सर्व क्षेत्रातील अग्रगण्य नामवंत व आर्थिक दृष्ट्या सक्षम कंपन्याचा समावेश करून समतोल साधला जातो. सेन्सेक्स मध्ये सुरवातीला असणारे ३० शेअर कायम नाही राहिले तर काळानुसार त्यात बदल होत गेले, नवीन शेअर समविष्ट झाले. जुने बाहेर निघाले.

  • सेन्सेक्स मध्ये समविष्ट कंपन्यांची नावे व वेटेज खाली माहितीसाठी दिली आहेत.
अनु क्र कंपनीचे नाव क्षेत्र (सेक्टर) निर्देशांकामधे मधे weightage
 रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरी व इतर १२.४६
 टाटा कन्सलटनसी (टी सी एस) सोफ्ट वेअर ११.४४
एच डी एफ सी बँक बँकिंग ८.८७
हिंदुस्थान युनिलिवर एफ एम सी जी ५.३५
आय टी सी सीगारेट ५.३०
एच डी एफ सी हौसिंग फायनान्स ४.९०
इंफोसिसीस सोफ्ट वेअर ४.४५
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिंग ३.९४
कोटक महिंद्र बँक बँकिंग ३.७४
१० आय सी आय सी आय बँक बँकिंग ३.७१
११ मारुती सुझुकी वहान निर्मिती ३.२०
१२ ओ एन जी सी तेल २.८६
१३ एक्सिस बँक बँकिंग २.८२
१४ लार्सन अंड टुब्रो इंजीनीअरिंग २.७१
१५ बजाज फिन सर्विसेस finance २.४८
१६ कोल इंडिया खाण २.२१
१७ एच सी एल टेक कॉम्पुटर २.१२
१८ एशियन पेंट रंग २.००
१९ भारती ऐअर टेल टेलीकॉम १.९७
२० एन टी पी सी वीज निर्मिती १.९०
२१ सन फार्मा फार्मा १.५८
२२ इंड स इंड बँक बँकिंग १.५१
२३ पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन वीज निर्मिती १.४४
२४ बजाज ऑटो वाहन १.२६
२५ महिंद्र अंड महिंद्र वाहन १.२१
२६ टाटा मोटर्स वाहन १.०५
२७ वेदान्ता धातू ०.९४
२८ टाटा स्टील्स स्टील ०.८७
२९ हिरो मोटर वहान ०.८४
३० येस बँक बँकिंग ०.७८
३१ टाटा मोटर्स डी व्ही आर वाहन ०.०८

टीप – पूर्वी यात ३० कंपन्या होत्या पण टाटा मोटर्स च्या दोन कंपन्या झाल्याने ही संख्या आता ३१ झाली आहे. दिनांक १८ एप्रिल २०१९ चे बाजारभावानुसार उपरोक्त weightage आहे. सेन्सेक्स चे बेस year १९७९ असले तरी सेन्सेक्स  १९८६  सालापासून मोजला जाऊ लागला.

या वेटेज वरून आपल्या हे लक्षात येईल की “रिलायन्स इंडस्ट्रीज” “टाटा कन्सलटनसी (टी सी एस)” “एच डी एफ सी बँक” या तीन कंपन्यांचे सेन्सेक्स मधील वेटेज ३२ % पेक्षा ज्यास्त असल्याने या तीन कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजार भावात होणारी वाढ किंवा घट ही सेन्सेक्स मध्ये  ज्यास्त परिणामकारक ठरते. त्यामुळे सेन्सेक्स वाढला तो नेमका कोणत्या शेअरमुळे हे पाहणे आवश्यक आहे. काही ठराविक शेअर्स मुळेच जर सेन्सेक्स वाढत असेल तर ते योग्य नव्हे. खर्या अर्थाने मार्केट मधील तेजीचे ते काही लक्षण नव्हे हे लक्षात ठेवावे.

माहिती साठी १९७९ पासून २०१९ पर्यंतचा सेन्सेक्सची वाटचाल दिलीय.सदर आकडे मार्च वर्ष अखेरचे आहेत.

मार्च वर्ष अखेर सेन्सेक्स मार्च वर्ष अखेर सेन्सेक्स
१९७९ १०० २००० ५००१.२८
१९८० १२८.५७ २००१ ३६०४.३८
१९८१ १७३.४४ २००२ ३४६९.३५
१९८२ २१७.७१ २००३ ३०४८.७२
१९८३ २११.५१ २००४ ५५९०.६०
१९८४ २४५.३३ २००५ ६४९२.८२
१९८५ ३५३.८६ २००६ ११२७९.९६
१९८६ ५७४.११ २००७ १३०७२.१०
१९८७ ५१०.८६ २००८ १५६४४.४४
१९८८ ३९८.८७ २००९ ९७०८.५०
१९८९ ७१३.६० २०१० १७५२७.७७
१९९० ७८१.०६ २०११ १९४४५.२२
१९९१ ११६७.९७ २०१२ १७४०४.२०
१९९२ ४२८५.०० २०१३ १८८३५.७७
१९९३ २२८०.५२ २०१४ २२३८६.२७
१९९४ ३७७८.९९ २०१५ २७९५७.४९
१९९५ ३२६०.९६ २०१६ २५३४१.८६
१९९६ ३३६६.६१ २०१७ २९५७५.७४
१९९७ ३३६०.८९ २०१८ ३३०१९.०७
१९९८ ३८९२.७५ २०१९ ३८६७२.९१
१९९९ ३७३९.९६ १८ एप्रिल २०१९ ३९१४०.२८

टीप- ज्या वर्षी सेन्सेक्स खाली आलाय ते साल लाल रंगात दाखवलंय.

१९७९ मध्ये १०० अंक असणारा सेन्सेक्स आज ३९००० च्यावर वर पोचलाय. त्यामुळे जर एखाद्याने फक्त सेन्सेक्स मधील निवडक कंपन्यामध्ये गुंतवणूक केली असती तर किती फायदेशीर गुंतवणुक ठरली असती याचा अंदाज येऊ शकतो.. गेल्या ४० वर्षात मार्च वर्ष अखेर तुलना करता फक्त ११ वर्ष सेन्सेक्सने negative ग्रोथ दाखवलीय. बाकी सर्व वर्षात सेन्सेक्स  वाढलेला दिसतेय, विशेषतः २००९ नंतर सेन्सेक्स मध्ये जबरदस्त वाढ झालीय. तसेच २०१२ नंतर सेन्सेक्स ने  yearly बसिस वर negative ग्रोथ दाखवली नाहीये. आतापर्यंत सेन्सेक्सचा प्रवास पाहता सेन्सेक्स मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते मात्र ही गुंतवणुक दीर्घकालीन असावी तरच लाभदायक होईल. त्याचप्रमाणे हे लक्षात ठेवावे की मार्केट मध्ये आता बर्यापैकी वाढ झालीय त्यामुळे कोणतीही negative गोष्ट मार्केट खाली येण्यास कारण ठरू शकते. ज्याना शेअर मध्ये गुंतवणुक करण्याचा अनुभव नाही त्यांनी सेन्सेक्स मुच्युअल फुंड किंवा ETF मध्ये SIP करावी मात्र तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा………..

(वरील लेखासाठी विविध शेअर विषयीच्या वेबसाईटचा आधार घेतला आहे).

— विलास गोरे

 

 

 

Avatar
About विलास गोरे 22 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..