आपण गेले कित्येक वर्षे ज्यावर संगीत, माहिती व इतर गोष्टीचा आनंद घेत आहोत, ज्याने आपले बालपण तरुणपण आनंदात गेले त्या आकाशवाणीला आज नव्वद वर्षे पूर्ण होत आहेत.
भारतात दि. २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले.
त्या मुळे दरवर्षी २३ जुलै हा प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
‘नमस्कार! हे आकाशवाणीचे ….. केंद्र. सकाळचे ६ वाजून ३५ मिनिटे झाली आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम…’ बोलणारी व्यक्ती अदृश्य; तरीही परिचयाची. आवाजातील सातत्य आणि न चुकता तो ऐकण्यातील नियमितता… अशावेळी कुठल्याही दृश्याकृतीची गरज भासत नाही. आपोआपच एक अनामिक बंध जुळला जातो. हा मर्मबंध आता नव्वदीत पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’चे स्वातंत्र्योत्तर काळात ‘आकाशवाणी’ (१९५७) असे नामकरण झाले. ‘आकाशवाणी’ हे संयुक्तिक नाव थोर साहित्यिक व नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी सुचविले होते. त्यानंतर सुरु झालेली आकाशवाणीची वाटचाल हा भारतीय संस्कृतीच्या आणि एकूणच भारतीयत्वाच्या सर्वंकषतेचा परिपाकच म्हणावयास हवा. देशभरात आकाशवाणीची ४१० केंद्रे असून २० अवघ्या महाराष्ट्रातच आहेत. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान ते विभिन्न कला-सांस्कृतिक मूल्यांची रुजवात, रोजच्या घडामोडी ते आदर्शवत जीवनपद्धतीचा अवलंब अशा अनेकविध गोष्टी अबालवृद्धांसहित प्रत्येक वयोगटासाठी हाताळण्यातील संवेदनशीलता, जवळपास २३ भाषांतील प्रसारणाचा प्रचंड आवाका आणि मागील ९० वर्षे सातत्याने त्यातील भाषिकस्तर कायम राखण्याचे कसब, या सर्व गोष्टी खरोखरच वाखाणण्याजोग्या आहेत.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे तत्व चालवत आकाशवाणीची अतिशय जोमाने वाटचाल चालू आहे. जागतिकीकरणानंतर आलेल्या खाजगीकरणाच्या लाटेत अनेक व्यावसायिक माध्यमांचा पसारा वाढला.
सुरुवातीला मात्र आकाशवाणी हे मनोरंजन व जनप्रबोधनाचं, सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं सशक्त माध्यम होतं. ‘संगीत सरिता’ ही शास्त्रीय संगीताच्या जलशांची वाहिनी तर ‘विविध भारती’ या आकाशवाणीच्या व्यावसायिक वाहिनीवरुन विविध सिनेसंगीत प्रसारित होतात. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे राज्यांतर्गत येणाऱ्या आकाशवाणी केंद्रावरुन त्या-त्या राज्यभाषेतील सुगम-संगीतांचे कार्यक्रम होतात. नाट्य-संगीत हे सुरुवातीला सुगम-संगीत या प्रकारात समाविष्ट होते. परंतु त्यातील शब्द-स्वरांचा सुरेख समन्वय लक्षात घेऊन त्यास आकाशवाणीतर्फे उपशास्त्रीय संगीताचा दर्जा देण्यात आलामनोरंजनासोबतच बाल, युवा, महिला यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गंमत-जंमत, युवावाणी, वनिता मंडळ असे कार्यक्रम प्रसारित होतात. अशा कार्यक्रमातून त्या-त्या वयोगटाचे भावविश्व व्यक्त होत असते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही जडण-घडण होत असते. त्याचप्रमाणे कामगार सभा, कृषीवाणी, ‘माझं आवार माझं शिवार’ अशा माहितीपर कार्यक्रमांचा कामगार आणि शेतकरी बांधवांनाही फायदा होतो. त्यामुळे आकाशवाणी ही कित्येकांच्या रोजच्या जगण्यातील आधारस्तंभ बनली आहे. येथे पुनर्प्रसारण, ज्याला आपण रिपीट ब्रॉडकास्ट म्हणतो, ते एक-दीड-दोन वर्षांतून कधीतरी होते. कारण येथे सृजनशीलतेला बराच वाव असून श्रोत्यांना उत्तम व सकस खाद्य- ‘कंटेट’- पुरविण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. त्यामुळे आकाशवाणीवरुन प्रसारित होणारी कुठलीही गोष्ट ही संयत असते. त्यात ना ‘ब्रेकींग न्यूज’चा धडाका असतो, ना भावनांचा उद्रेक!
निर्मळ आनंद देताना वास्तवाची जाणीव आणि त्यातूनही चांगलं कसं शोधावं हा विचार आकाशवाणी आपल्या श्रोत्यांना देत असते. यात सतत बदलणाऱ्या सुधारित तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना आकाशवाणीने विकसित केलेले स्वतःचं ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे अॅप असेल, ‘न्यूज ऑन एअर’ अंतर्गत दर तासाला एखादा नंबर फिरवून चालू घडामोडीतील कुठल्याही तीन बातम्या मिळवणे असेल, आपल्या बलस्थानांवर भर देऊन, आपलं मूळ टिकवून नव्या जगाशी- नव्या काळाशी जोडले जाणे हे आकाशवाणीच्या नव्वदाव्या पदार्पणातलं तिच्यासमोरचे ध्येय आहे. कारण ज्यावेळी ‘तुमचा कार्यक्रम ऐकताना जगणं सुसह्य होतं’, अशी प्रतिक्रिया आकाशवाणीतील उमा दीक्षितांसारख्या अनेक कर्मचाऱ्यांना श्रोत्यांकडून मिळते. इतक्या वर्षांचे सहसंबंध दृढ होत असतातच; पण त्याचबरोबर ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही बहुआयामी उद्घोषणा सार्थ ठरत असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. चारुश्री वझे, ‘महान्यूज’
KHUP SUNDER Me Aakashwani cha Shrota aahe Aajhi Mazhya Valve Radio aahe,
Faar Chhan
Nice article sir. Very beautifully written.Thanks for sharing.