रविवार, दि. २१ एप्रिल २०१३
लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत. त्यामुळेच एकीकडे दहशतवादी हल्ले वाढत आहेत आणि दुसरीकडे दहशतवाद्यांच्या विचारांना पूरक आणि प्रेरक ठरेल असे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न देशातील कथित बुद्धिवाद्यांकडून होत आहेत.
हैदराबाद बॉम्बस्फोटाचे कुठलेही धागेदोरे आपल्या तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नसताना परवा बेंगळुर बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटांची मालिका इथे सुरूच आहे. दर चार-सहा महिन्यांनी बॉम्बस्फोट होतात, अनेक निरपराध लोक मारले जातात. सरकार तेवढ्यापुरते दहशतवाद समूळ नष्ट करू, अशा वल्गना करते आणि नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू राहते. बहुतेक सरकारच्याही हे आता लक्षात आले असावे, की अशी एखादी दहशतवादी घटना घडल्यानंतर चार-सहा दिवस लोक चर्चा करतात, सरकारची निंदानालस्ती वगैरे केली जाते आणि लगेच ती घटना विस्मरणात जाते. त्यामुळे लोकांच्या बोलण्याचे आणि एकूणच दहशतवादी कारवायांचे आता सरकारला काही वाटेनासे झाले आहे.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे अशा दहशतवादी कारवाया आता लोकांच्या अंगवळणी पडू लागल्या आहेत. पूर्वी रेल्वेचा वगैरे अपघात झाला, तर त्याची मोठी चर्चा व्हायची, रेल्वे खात्याला अशा अपघाताची लाज वाटायची. एकदा तर लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तेव्हा त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देऊ केला होता. आता अशा अपघातांसाठी, आपल्या खात्यातील घोटाळे आणि भ्रष्टाचारासाठी मंत्र्यांनी राजीनामे द्यायचे ठरविले, तर मंत्रिमंडळात कोण राहील, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय लोकही आता या सगळ्या प्रकारांना इतके सरावले आहेत, की घोटाळा उघडकीस आला म्हणून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा आग्रह सामान्य जनता धरत नाही आणि मंत्रीदेखील असे घोटाळे नियमित कार्यक्रमाचाच भाग समजतात.
सांगायचे तात्पर्य दिवसेंदिवस राजकारण्यांची, उच्च पदावरील सनदी नोकरशहांची, महत्त्वाच्या पदावरील बड्या लोकांची एकूण समज इतकी संकुचित होत चालली आहे, की आपण जे काही बोलतो किंवा करतो त्यातून देशाचे अहित होऊ शकते, याचीही जाणीव त्यांना होत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिला. त्यात टाडा न्यायालयाने दोषी ठरविलेल्या बहुतेक गुन्हेगारांवरील आरोप योग्यच असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला, फक्त या आरोपींना टाडा न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या स्वरूपात काही बदल केले. या प्रकरणातील अनेक आरोपींपैकी एक आरोपी संजय दत्त हादेखील आहे. टाडा न्यायालयाने त्याला सहा वर्षे कैदेची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती एक वर्षाने कमी करून पाच वर्षांची शिक्षा त्याला सुनावली. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याने तो स्वीकारणे भाग आहे, हे लक्षात येताच संजूबाबाच्या सर्वपक्षीय सग्यासोयर्यांनी त्याच्यावर अन्याय झाल्याचा गलका करायला सुरुवात केली. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की सर्वोच्च न्यायालयात जेव्हा एखाद्याला शिक्षा सुनावण्यात येते, तेव्हा त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यापूर्वी त्याच्यावरील आरोपांची अगदी सखोल शहानिशा केली गेली असते, सगळे साक्षी-पुरावे, आरोपीचे म्हणणे अशा सगळ्या बाजूने विचार करूनच सर्वोच्च न्यायालय अंतिम निकषावर पोहचत असते. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला चुकीचे किंवा अन्यायकारक ठरविणे हा एक प्रकारे केवळ सर्वोच्च न्यायालयच नव्हे, तर इथल्या एकूण व्यवस्थेवरचा अविश्वास ठरतो. म्हणजे तुमच्या मनासारखा कौल मिळत असेल, तर ही व्यवस्था अगदी उत्तम आणि मनाविरुद्ध निकाल येत असेल, तर व्यवस्थेने तो तुमच्यावर केलेला अन्याय, हा कोणता तर्क आहे? या तर्काच्या आधारे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एखाद्या आरोपीची भलावण करीत असतील, तर त्यांची कीवच करावी लागेल. सध्या प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष असलेले मार्कंडेय काटजू हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. याचा अर्थ त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते, हे चांगल्याप्रकारे माहीत आहे, ते त्या व्यवस्थेचा एक भाग होते, त्यांनीही असे अनेक निकाल दिले असतील. पक्षपातीपणाचा आरोप किमान सर्वोच्च न्यायालयावर करता येणार नाही, हे देखील त्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे, असे असताना संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याला माफी मिळावी म्हणून राष्ट्रपतींना, राज्यपालांना, पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची, प्रसारमाध्यमांद्वारे संजय दत्तची भलावण करण्याची त्यांना काय गरज आहे? आज या देशात जमानतदार मिळाला नाही किंवा चांगला वकील मिळाला नाही म्हणून अनेक वर्षे कच्चे कैदी म्हणून तुरुंगात खितपत पडलेल्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी जी कमाल शिक्षा त्यांना होऊ शकते त्यापेक्षा अधिक वर्षे कच्चे कैदी म्हणून तुरुंगवास सहन करणार्यांची संख्यादेखील खूप मोठी आहे. त्यांच्या संदर्भात काटजूंनी असे काही प्रयत्न केले असते, तर ते समजून घेता आले असते; परंतु काटजूंच्या मनातील दयाभाव, त्यांची करुणा, त्यांच्यातली माणुसकी ही सगळी केवळ संजय दत्त पुरतीच उतू जात असल्याचे दिसते. त्यामागचे कारण स्पष्ट आहे. संजय दत्तसाठी काही केले किंवा त्याच्या बद्दल काही बोलले, की लगेच प्रसिद्धी मिळते, चर्चा होते, त्या माध्यमातून आपली असली नसली विद्वत्ता लोकांपुढे प्रदर्शित करता येते. प्रसिद्धीपिसाट असणे हा एक मानसिक रोग आहे आणि तो अनेकांना असतो; परंतु इतक्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने या रोगाला बळी पडून नको त्या गोष्टीची वकिली केली, तर त्यातून अतिशय चुकीचा संदेश जातो. संजय दत्तला का सोडायचे, तर त्याने आधी खूप भोगले आहे, आता तो सुधारला आहे, त्याला मुलेबाळे आहेत, त्याच्या वडिलांनी देशासाठी खूप काही केले, असे काटजू महाशय म्हणतात. देशातील प्रत्येक गुन्हेगाराला याच आधारावर सोडायचे ठरविले, तर या देशात तुरुंगाची गरजच उरणार नाही. एखाद्याने खून करायचा आणि नंतर मला मुलेबाळे आहेत, मी आता सुधारलो आहे, आतापर्यंत खूप भोगले आहे, हा तर्क समोर करीत माफी मिळवायची. प्रत्येक गुन्हेगाराने हा तर्क समोर मांडायला पाहिजे, कारण सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिलेली एक व्यक्ती हा तर्क एखाद्या गुन्हेगारासाठी देऊ शकते, तर शेवटी कायदा सगळ्यांना सारखा आहे, त्यामुळे या तर्काचा लाभ इतर गुन्हेगारांनाही व्हायला हवा. आपण कोणत्या पदावरून निवृत्त झालो आणि सध्या कोणते पद भूषवित आहोत, याचे भान काटजू महोदयांनी बाळगायला हवे होते. बोलायची सवय आहे म्हणून काहीही बोलता येत नसते, हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीला कळू नये, यापेक्षा दुर्दैव ते कोणते! परंतु बरेचदा प्रसिद्धीचा सोस आपल्या विवेकबुद्धीवर मात करून जातो, काटजूंच्या बाबतीत कदाचित तेच झाले असावे. मागेही एकदा त्यांनी नरेंद्र मोदींच्या संदर्भात असाच वादग्रस्त लेख लिहिला होता आणि तो पाकिस्तानातील वर्तमानपत्रात छापून आणला होता. अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करतानाच हिंदुत्ववाद्यांना झोडपणे, ही अलीकडील काळात एक फॅशन झाली आहे. आपली विद्वत्ता, आपली तथाकथित धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी असे करावेच लागते, हा समज अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या अनेक कथित विद्वांनामध्ये प्रचलित आहे. त्यातूनच एकीकडे नरेंद्र मोदींना झोडपायचे आणि दुसरीकडे संजय दत्तसाठी छाती पिटून रडायचे, असा प्रकार केला जात असावा.
वास्तविक गुजरात दंगलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने खास स्वत:च्या देखरेखीखाली नेमलेल्या विशेष तपास पथकाने नरेंद्र मोदींना `क्लीन चीट’ दिली आहे. काटजूंना हे माहीत नसण्याचे कारण नाही; परंतु त्यानंतरही गुजरात दंगलीसाठी मोदीच जबाबदार आहेत, असा थेट आरोप ते करतात कारण त्यांना कुणाला तरी खूश करायचे असते. मोदींवर हल्ला चढविणे, संजय दत्तसाठी जीवाचा आटापिटा करणे, राष्ट्रपतींनी ज्याचा दया अर्ज फेटाळला आहे, त्या भुल्लरला सोडून देण्याची मागणी करणे, मिर्झा गालिबला `भारतरत्न’ देण्याची मागणी करणे, हे सगळे उपद्व्याप काटजू केवळ प्रसिद्धीसाठी आणि सेवानिवृत्तीनंतर आपली सोय लावणार्यांचे उपकार फेडण्याच्या भावनेतून करीत असावेत, कदाचित सध्या आहे त्या पदापेक्षा मोठ्या पदावर आपली वर्णी लावून घेण्याच्या प्रयत्नातूनही हे उपद्व्याप सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, हे मान्य असले तरी, आपण ज्या पदावर काम करीत आहोत, त्या पदाच्या अनुषंगाने येणारी बंधने पाळणे आपले कर्तव्य ठरते, हा साधा नियम किंवा संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाला कळू नये म्हणजे अतिच झाले. त्यांनी आधी प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर कुणासाठी काय धावपळ करायची, कुणाला काय शिव्या घालायच्या ते सगळे करावे. कोणताही शासकीय अधिकारी जाहीररित्या राजकीय भूमिका घेऊ शकत नाही, तसे बंधनच त्याच्यावर असते. प्रेस कौन्सिलचे अध्यक्षपद हे सुद्धा एक पक्षनिरपेक्ष, जात, धर्म, पंथ निरपेक्ष पद आहे; परंतु काटजू साहेबांनी तर हे सगळे संकेत धुडकावून सरळ सरळ काँग्रेसची भाटगिरी करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते उघडपणे जे बोलू शकत नाही, ते त्यांच्यावतीने काटजू बोलतात, असेच चित्र समोर येत आहे. लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत. त्यामुळेच एकीकडे दहशतवादी हल्ले वाढत आहेत आणि दुसरीकडे दहशतवाद्यांच्या विचारांना पूरक आणि प्रेरक ठरेल असे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न देशातील कथित बुद्धिवाद्यांकडून होत आहेत.
जे कोणी डोळ्यासमोर स्वत:चा स्वार्थ ठेवून बोलत आहेत, त्यांचे समजण्यासारखे आहे; मात्र ज्यांना या बाबींशी काही देणे-घेणे नाही अशीही माणसे जेव्हा यासंदर्भात चुप्पी साधतात, ते पाहून मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला कुणीच तयार नाही, हे स्पष्ट होते आणि हेच फार गंभीर आहे.
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:
Prahar by Prakash Pohare टाईप करा
प्रतिक्रियांकरिता:
Email: prakash.pgp@gmail.com
Mobile No. +९१-९८२२५९३९२१
— प्रकाश पोहरे
Leave a Reply