![p-28602-R-K-Laxman](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2016/10/p-28602-R-K-Laxman.jpg)
‘कॉमन मॅन’चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसूर येथे झाला.
रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. मा.रा. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की कॉमन मॅन पुतळाचा एक पूर्णाकृती पुतळाही पुण्यात “सिंबायोसिस’ कॉलेजमध्ये बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने तसेच ‘मालगुडी डेज’ या कादंबरीसाठी रेखाटलेली अर्कचित्रे लोकप्रिय झाली होती. भारतीय व्यंगचित्रकलेला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक पिढया त्यांनी रेखाटल्या आहेत. एका साध्या रेषेतून या नेत्याचे व्यक्तिवैशिष्ट्य स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस ‘कॉमन मॅन’ देशभर आणि जगभर पोहोचला आहे. त्यांनी १९५० पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केलेल्या या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले.
“यू सेड इट” नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नव्हती. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने १९७१ साली पद्मभूषण आणि २००५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४ मध्ये गौरवण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच मराठावाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली होती. आर. के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याच पुस्तकाचे ’लक्ष्मणरेषा’ नावाने मराठीत अनुवाद करण्यात आला आहे.
आर. के. लक्ष्मण यांचे २६ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके
आयडल अवर्सआर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह) द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र; मराठीत -लक्ष्मणरेषा) अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह) बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
आत्मचरित्र
आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.
Leave a Reply