अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला.
मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले.
खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. मा.अल्लादिया खाँ यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ होते. परंतु त्यांच्या मातापित्यांच्या अनेक अपत्यांतील हे अपत्य वाचले, म्हणून त्यांना ‘अल्लादियाखाँ ’ (अल्लाने जगविलेले मूल) म्हणू लागले. खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमदखाँ हे उनियारा व टोंक या दरबारचे नामांकित गायक होते. त्यांचे शिक्षण चुलते जहांगीरखाँ यांच्याकडे झाले. अल्लादियाखाँनी प्रथम चार पाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सातआठ वर्षे ख्यालगायकीचे पराकाष्ठेच्या निष्ठेने शिक्षण घेतले.
यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. प्रदेशांत व थेट नेपाळपर्यंत मुशाफिरी केली आणि संगीताच्या विविध रीतींचा अनुभव घेतला. याचा त्यांच्या गायकीला उत्तरकाली उपयोग झाला. पूर्वीची आपली गायनशैली बदलून आपल्या पूर्वीपेक्षा जाड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची एक सर्वस्वी अभिनव व नमुनेदार गायकी त्यांनी निर्माण केली.
१८९१च्या सुमारास खाँसाहेब दक्षिणाभिमुख होऊन प्रथम अहमदबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापुरास शाहूमहाराजांच्या आश्रयाला स्थायिक झाले, ते १९२२ मध्ये महाराजांचा अंतकाल होईपर्यंत.
१९२२ पासून १९४६ पर्यंतची चोवीस वर्षे त्यांनी मुख्यत: शिकविण्यात मुंबईस काढली.
खाँसाहेबांना दहाबारा हजार चिजा मुखोद्गत होत्या. या दृष्टीने ते एक ‘कोठीवाले’ गायक होते. खाँसाहेबांच्या शिष्य म्हणजे त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे यांच्या व्यतिरिक्त केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळिग्राम, नथ्थनखाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला, मोहनराव पालेकर इ. मंडळी आहेत.
अल्लादियाखाँ यांचे १६ मार्च १९४६ रोजी निधन झाले. कोल्हापुरात देवल क्लबसमोरच्या चौकात त्यांचा अर्धपुतळा आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply