हे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या तणावातून मुक्ती मिळेल. तसं हे सगळं स्पष्ट सांगणं सोपं नाहीय. एका मुलीसाठी, तेही चौदा वर्षाच्या कळीसाठी, तुम्हा सर्वांच्या। तुलनेत काहीच अनुभव नसलेल्या लेकीसाठी तर खरंच सोपं नाहीय.
पण असं ही कसं म्हणता येईल? या दहा बारा वर्षात, समजायला लागल्यापासूनच्या गेल्या सहा सात वर्षात, मला जे भोगावे लागले, सहन करावे लागले, ते सगळं मला मोठं करणारच तर होतं. माझं वय अकाली वाढवणार, जे या वयात अनुभवाला येऊ नये त्याचा धाडसाने सामना करायला लावणारच तर होतं. अन हे सगळं कुणी माझ्या ओंजळीत टाकलं? जन्मदात्या आईवडिलांनीच! त्यातही मुख्यत्वेकरून जिनं नऊ महिने मला पोटात वाढवलं, कळा सहन केल्या, मला जन्म दिला, त्या आईनंच. मला अजूनही विश्वास बसत नाही. एखादी जन्मदात्री आईच अशी कशी वागू शकते? आपल्या पोटच्या पोरीची नाळ तटकन तोडू शकते? पण ममी तू ते केलंस. माझ्याच बाबतीत हे सारं घडलं. फक्त तुझ्यामुळे. तुझ्या हटवादी, जिद्दी स्वभावामुळे. तुझ्या स्वैराचारामुळे. अविचारामुळे. मला ठाऊकाय ममी, माझं हे स्पष्ट बोलणं, लिहिणं, तुला आवडणार नाही.तसाही तुझा राग आहेच माझ्यावर! कारण तुला मी नकोशीच होते आधीपासून. तुझ्यासाठी अॅक्सिडेंटल डॉटर. अपघाताने जन्माला आलेली मुलगी होते मी. पोराबाळाची जबाबदारी, घरची जबाबदारी, कामाची जबाबदारी, हे सारं तुला ओझं वाटायचं पूर्वीपासून. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, ते दिसतच होतं,पपा ना, आजीला, घरच्या सगळ्यांना. तसंही हे घर तू आपलं घर मानलंच नाही कधीही. या घरात एक ओझ्याखाली, परक्यासारखीच राहिलीस तू. नेमकं काय हवं होतं तुला? हे कधीच कळलं नाही कुणाला. मला शंका आहे, तुला स्वतला तरी कळलं होतं का, तुला नेमकं काय हवंय? तुला स्वातंत्र्य हवं होतं. तुला कसली बंधनं मान्य नव्हती. जसं की पपां नी विचारलं, लग्नच का केलंस तू? या लग्नाच्या बंधनात का अडकलीस तू? तुमचा काही प्रेमविवाह नव्हता. तुला विचारून, तुझ्या संमती नेच आईवडिलांनी, म्हणजे आजी आजोबांनी तुझं लग्न ठरवलं. बाबांनी तर नेहमी लाडच केले तुझे. नको तितके लाड. त्यांच्या काळजाचा तुकडा होतीस तू. अजूनही आहेस. माई आजीनही खूप समजावण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी. तिचा स्वभाव गाईसारखा शांत.तुझ्यामुळे टी नेहमीच हतबल झाल्यासारखी, हारून हात टेकल्या सारखीच वागली. कारण कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही, मेरे मुर्गी की एकही टांग, अशा हटवादी पणानं आपलं तेच खरं करायचं, असा तुझा आततायी स्वभाव. त्यापुढे माई आजी, आजोबांनी तर हात टेकलेच, पण पपांनी सुद्धा शेवटी शेवटी शरणागती पत्करली. तसं पाहिलं तर काय कमी होतं गं तुला या घरात? पपा लहान वयातच केवढ्या मोठ्या पदावर.एका मोठ्या कम्पनीचे व्हॉइस प्रेसिडेंट. त्यामुळे त्यांच्यावर कामाचं प्रेशर होतं जबाबदारी होती.त्याच्या मिटिंग्ज, त्याचे कॉल्स, त्यांचे परदेश दौरे, यात तो नको तितका व्यस्त राहायचा हे खरंय. पण जेव्हा केव्हा तो घरी असायचा, तेव्हा तो आपलाच असायचा. आपल्याला महागड्या हॉटेलात न्यायचा, वीकएन्डला रिसॉर्टमध्ये घेऊन जायचा, कधी कधी दूर फिरायला न्यायचा. तो जे काही करत होता ते तुझ्या माझ्यासाठीच ना? की आणखी कुणासाठी? तो म्हणायचा, वयाच्या चाळीशी पर्यंतच उमेद असते, शक्ती असते, कमवायची, स्थिरस्थावर व्हायची. नंतर तुम्ही आपले राजे.एरवी दोन दोन गाड्या, हा आलिशान बंगला, या घरातल्या अत्याधुनिक सुखसोयी, हे सारं काही आकाशातून पडत नाही.
हे सगळं तुला मान्य नव्हतं, समजत नव्हतं असं कसं म्हणता येईल? तू ही शिकली सवरलेली.. आधुनिक जगाच्या व्यवहाराशी, चालीरीतीशी, गरजांशी, परिचित असलेली. तू ही एका आय.टी. कंपनीत काम करीत होतीसच. पण पंपाना जसे जम्पस, प्रमोशन मिळत गेले, तसं तुझ्या बाबतीत घडलं नाही. तुला संघर्ष करावा लागला. वाट बघावी लागली. तुझं म्हणणं असं की तुला डावलून दुसऱयाला संधी मिळाली. तुझ्या परिश्रमाची कुणी किंमत केली नाही. तुला तुझ्या योग्यते प्रमाणे हवं ते हवं तेव्हा मिळालंच नाही काही. पण अशा बाबतीत आपणच जज कसे होऊ शकतो? आपणच उमेदवार अन आपणच निर्णायक, हे कसं शक्य आहे? तूच सांग.
एकूण तुझ्यावर नेहमीच अन्याय झाला, घरच्यांकडून, दारच्यांकडून. तू सारखी तुलना करायचीस पपांशी. त्याचं सरसर वर चढणं, तुझं तिथल्या तिथं फरफटणं. याचा तुला त्रास व्हायचा. खरं तर आपल्याला खूप खूप पैशाची गरज कुठे होती? नोकरीतून मिळणारा पैसा महत्वाचा की समाधान महत्वाचं? पपा कमवतच होते की हवं तेव्हढं. खरं तर आपल्या गरजांपेक्षाही जास्त. पण कधी कधी या जास्तीच्या पैशाच्या नशेची धुंदी देखील बेहोष करते माणसाला. आपल्या योग्यतेपेक्षा, गरजेपेक्षा जास्त मिळत गेलं तर त्यामुळे होणार अजीर्ण देखील घातक ठरतं कधी कधी. तुझं तसच झालं असणार.
गेल्या तीन चार वर्षातील आपल्या घरचं वातावरण.. त्यापेक्षा नरक बरा असं म्हटलं तर वावगं ठरू नये! तू अन पपा सारखे भांडायचे एकमेकांशी. साध्या साध्या गोष्टीतून वाद व्हायचे तुम्हा दोघात. सुरूवातीला तुम्ही दक्षता घेत होता, तुमच्यातली वादावादी माझ्यापर्यंत पोहचू नये याची. पण असल्या गोष्टी फार काळ लपून राहत नाहीत. शिवाय आपले चेहरे बोलतातच की स्पष्ट, कधी ना कधी. तसं पाहिलं तर तुला सासरचा त्रास नव्हताच काही. आपण तिघेच होतो इथे. अधूनमधून जायचो आज्जीकडे, आजोबांकडे सणावाराला किंवा ते यायचे आपल्या कडे. पण हे काही दिवसासाठीच. आश्चर्य म्हणजे त्याच्या सहवासाच तुला दडपण वाटायचं. तू कधीच खुश नसायची ते आले की. कारण तुझं वागणं, तुझं बोलणं, मुख्य म्हणजे अत्याधुनिकतेकडे झुकलेली तुझी कपड्यांची फॅशन त्यांना आवडायची नाही. आज्जी तर तसं स्पष्ट बोलूनही दाखवायची.
तिचंही बरोबर होतं. एकीकडे आजकाल तू मला सारखी टोकायची. हे करू नको, ते करू नको, हे घालू नको, अशी बसू नको.पण तुझं काय? जे नियम गरज नसतांना मला लागू होते, ते गरज असूनही तुला मात्र लागू नव्हते! आज्जी आजोबांसमोर तू चक्क तोकडी हाफ पँट घालून वावरायचीस. कधी कधी त्याच कपड्यात बाहेर जायचीस. मंगळसूत्र न घालणे, कुंकू न लावणे, हे सगळं आजीला आवडत नाही हे माहिती असूनही तू ते सगळं मुद्दाम करायचीस. पपानाही पसंत नव्हती ही नको इतकी टोकाला जाणारी तुझी फॅशन. म्हणजे तू काकुबाई सारखं रहावं अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. काळा बरोबर होणारे बदल प्रत्येकाला मान्य होते. पण तुझं सगळं अतीच होतं. घरात तू मॅक्सी घालून राहायचीस, तीही पारदर्शक! घरच्या नोकराचाकरांसमोर सुद्धा! आज्जीला, पपांना ते बिलकुल आवडायचं नाही. ते काही बोलले की तू हायपर व्हायचीस. डोकं धरून केस ओढायचीस. नाटकं करायचीस. तुझं काहीच घरच्यांना आवडत नाही, तू त्यांना नकोशी झाली आहेस, असा कांगावा करायचीस. पण तसं काही नव्हतं. पपांनी तुला खूप समजावून पाहिलं. आजीने तिच्या पद्धतीने समजावून पाहिलं. पण तू काहीच समजून घेण्याचा मनस्थितीत नव्हतीस. अर्थाचा अनर्थ करायची तुझी सवय. हे सगळं वाचून तू मलाही दोष देशीलच. टोंगळ्या एव्हढी पोरगी मला ज्ञान शिकवते म्हणशील. पण जे कटू सत्य आहे ते आहे. हे नाकारता येत नाही. तुझ्या मानण्याने किंवा न मानण्याने आता काही फरक पडणार नाही. कारण आता तुझा मार्ग वेगळा झालाय, आमचा वेगळा. दोनच आठवड्यापूर्वी तुमच्या लग्नाच्या घटस्फोटावर कोर्टाचे शिक्कामोर्तब झाले.गेली दोन वर्षे एकमेकांवर चाललेली चिखलफेक संपली एकदाची. आपण सगळेच एका संक्रमणाच्या काळातून जात होतो, या गेल्या काही काळात. किर्रर्र घनदाट जंगलातला भयावह प्रवास. तुम्ही सगळे मोठे, समजूतदार. तुमची सहनशीलता तुमच्या वया इतकीच मोठी. पण माझं काय गं? हे सगळं सहन करण्याचं माझं वय आहे की नाही, माझ्या भविष्याच काय, या सगळ्याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा काहीच विचार केला नाही तुम्ही, खास करून तू? कारण पपांनी विचार केला. त्यांनी स्वत पेक्षाही माझाच विचार केला नेहमी. ते समजून चुकले होते शेवटी, की तुला समजावण्यात काही अर्थ नाही आता. यु वेअर बियोन्ड रिपेअर्स! कोर्टात तुमची घटस्फोटाची केस चालू असताना महत्वाचा प्रश्न पुढे आला तो माझा. माझं पझेशन कुणाकडे जाणार? पझेसिव्ह या शब्दाचा अर्थ मला लहानपणीच समजलेला. मी माझ्या प्रत्येक खेळण्याबद्दल, डॉलसबद्दल पझेसिव्ह होते. कारण या सर्व वस्तू पपांनी मला आणून दिल्या होत्या. कामानिमित्त तो खूप भटकायचा, परदेशात जायचा. तेव्हा प्रत्येक वेळी माझ्यासाठी काही ना काही आणायचाच. त्यात नोव्हेलटी असायची. काहीतरी वेगळे पण असायचे. त्या वस्तूचा शोध घेण्यासाठी तो खूप भटकायचा. खरेदीच्या बाबतीत फार चोखंदळ होता तो. ते मला खूप आवडायचं. तुझ्याही साठी तो काही ना काही आणायचाच. पण तू कधी ना त्या आणलेल्या वस्तूच कौतुक केलं ना ती वस्तू आवडीने, अभिमानाने वापरलीस. तुझ्या मनात का कुणास ठाऊक एक प्रकारची अढीच होती पपांबद्दल. त्याचं काहीच तुला आवडायचं नाही. उलट तू त्याच्यावर डॉऊट घ्यायचीस. त्याला खोदून खोदून नको ये प्रश्न विचारायचीस. ते प्रश्न तुझ्या शंकाखोर मनातून निपजलेले. आगापिच्छा नसलेले. त्याच्यावर अविश्वास दाखवणारे. त्याला नेहमी आरोपीच्या पिंजऱयात उभे करणारे. आधीच त्याच्यावर कंपनीच्या कामाचा ताण, मोठी जबाबदारी. अन त्यात तुझं हे असं रोजचं टोचून बोलणं. कुणाच्याही सहनशक्तीला मर्यादा असतेच ना शेवटी? तू त्याला कोर्टात उभं केलंच शेवटी, आरोपीच्या पिंजऱयात. आपल्या सोयीसाठी, सुखासाठी, सुटकेसाठी, तू नको ते आरोप केलेस वकिलाच्या मदतीनं. त्याचं फार दुःख झालं आजी आजोबांना. अन् मला देखील!
मला आश्चर्य वाटलं ते माई आजीचं, आजोबांचं, तुझ्या जन्मदात्यांचं. त्यांनीही तुलाच साथ द्यावी? बरोबर आहे त्याचंही. शेवटी तू त्यांच्या काळजाचा तुकडा. आपलेच दात अन् आपलेच ओठ. तू चुकली आहेस, चुकते आहेस हे माहिती असूनही ते हतबल झालेत तुझ्या हट्टापुढे! शेवटी तूच जिंकलीस. पण मीही तुझ्याच काळजाचा तुकडा होते ना ग? मला वाटतं फक्त बायोलॉजीकली अटॅच होतो आपण. काही रेशिमबंध नव्हतेच आपल्या दोघात. कारण पपांनी माझ्या पझेशनसाठी आग्रह धरला कोर्टात, तेव्हा तू फारसा विरोध केला नाहीस. कारण तुला माझी जबाबदारी नकोच होती. माझ्या जन्मानंतर सुद्धा तू ती पार पाडली नाहीसच नीट. माझ्या स्कूलमध्ये सुद्धा यायची नाहीस तू कधी. वेळच नाही मिळायचा तुला तुझ्या बिझी शेड्युलमधून. पपा मात्र यायचे. ते त्याप्रमाणं आपलं शेड्युल अॅडजस्ट करायचे. कधी कधी आजी आजोबा यायचे पालकाच्या मिटींगला. सर्वांना आश्चर्य वाटायचं. पण कुणा कुणाला काय काय सांगणार गं? तुम्ही काय काय पसरवल माझ्या पझेशनच्या बाबतीत. पपांनी म्हणे माझं ब्रेन वाशिंग केलं. माझ्या मनात तुझ्याबद्दल नाही नाही ते भरवलं. खरं सांगू? त्यांनी काहीच नाही भरवलं, उलट नीट समजावलं. मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं निर्णय घेण्याचं. मला माहिती होतं, माझी परवडच होईल तुझ्याकडे. इथे पपाच नाही तर आजी आजोबा आहेत माझी काळजी घ्यायला. वेळ पडल्यास मी उत्तम रेसिडेंशिअल स्कुलमध्ये राहू शकते. पपा तर बाहेर परदेशात देखील पाठवायला तयार आहेत मला. मी त्याची प्रयोरीटी आहे. तू समजतेस तसं बर्डन नाही. पपाजवळ मी जास्त सुरक्षित आहे. तुझं बिझी शेड्युल, तुझी वरवर चढण्याची धडपड, तुझी फॅशन, तुझा स्वार्थी स्वभाव, तुझ्या मित्र मैत्रिणी बरोबरच्या पार्ट्या, तुझं रात्री बेरात्री बाहेर जाणं, तुझं ड्रिंक घेणं या सर्व चक्रव्यूहात मला कुठे स्थान असणार होत? ते आधीही नव्हतंच. अन् घटस्फोटानंतर तर.. तुला सगळं आकाश मोकळं झालं हवं तसं उडायला, खरं सूत्र उंडारायला! टोचत असेल ना ऐकायला? संतापायला होतं ना? होऊ दे. तुझे कान टोचायलाच हवे कुणीतरी. ते तुझ्या मम्मी पपाचं कर्तव्य होतं. पण ते त्यांनी वेळीच पूर्ण केलं नाही. तू त्यांनाही दुबळे करून टाकलं. इमोशनल ब्लॅक मेलिंग, त्यात तर तू एक्सपर्ट! रडून, आकांत तांडव करून आपलंच म्हणणं खरं करून दाखवण्यात, स्वत:ला हवं तसं इतरांना झुकवण्यात, प्रत्येकाला आपल्या तालावर नाचवण्यात तुझा हात कुणीच धरू शकणार नाही! वयात येणाऱया मुलीच्या किती वेगवेगळ्या गरजा असतात. हे कधी उमजलंच नाही तुला. तुही या कोवळ्या अवस्थेतून गेली असशीलच ना? तेव्हा तुझा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलला गेला असणार. पण माझं काय गं? अशा वेळी मुलीला आईच हवी असते. माझ्या वयात येतांना तू फक्त हे करू नको, ते करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको असा ‘ना’चा पाढाच वाचला फक्त. आश्चर्य म्हणजे जी बंधनं वयात येणारी मुलगी म्हणून माझ्यावर घालीत होतीस, ती तुला स्वतला मात्र मान्य नव्हती. ती तुला लागू नव्हती. तू वाट्टेल तसे कपडे घालायला, वाट्टेल तिथे रात्री बेरात्री भटकायला मोकळी होतीस. पार्ट्या, ड्रिंक्स, मौजमजा हीच तुझी आयुष्य जगण्याची, आनंदाची कल्पना होती. खरं तर पंपानाही जावं लागायचं कंपनीच्या पार्ट्याना. त्याही पार्ट्या विथ ड्रिंक्स असायच्या व त्यांनी कधी हात लावला नाही त्या पेल्याला. त्यांना तर नॉन व्हेज देखील चालत नसे. पण म्हणून कुणी त्यांना आग्रह केला नाही. जबरदस्ती केली नाही. असल्या नकारामुळे त्यांच्या स्टेटसला धक्का पोचला नाही. तुलाच का हे स्टेटस सिम्बॉल म्हणून गरजेचं वाटलं? तूच का हे सोशल सिग्मा म्हणून स्वीकारलं? यू हॅड चॉईस टू से नो! पण तू ते केलं नाहीस, कारण ते सगळं तुलाच हवं होतं. ती बेहोशी, तो दुराचार, ते हसणं खिदळणं, ही तुझीच गरज होती.आधी हौस म्हणून मग सवय म्हणून. तू बघता बघता नादी लागली या वाईट सवयीच्या.
माझी पाळी सुरू झाली तेव्हा आजीने पापाच्या आईनं मला सारं समजावलं. मला सॅनिटरी पॅड पपांनी आणून दिले. हे सगळं तुला करायला हवं होतं ना गं मम्मी?
मला तुझी खरी गरज होती तेव्हाच तू घर सोडून निघून गेलीस! कोर्टातला अनुभव तर न विसरता येण्यासारखा. ते तारीख पे तारीख, ते सवाल जवाब, ते आरोप, प्रत्यारोप, सगळंच तणावाचे. पपाकडून जास्तीत जास्त कॅम्पेनसेशन उकळण्यासाठीची तुझी केविलवाणी धडपड, त्या दिवसात घरात चाललेल्या चर्चा, शेजाऱयांच्या नजरा, सगळंच सगळ्यासाठी असह्य होतं. तुमच्या अलग होण्याला पर्यायच नव्हता. कारण जखमा आतल्या आत चिघळल्या की विष होतं. ते सगळीकडे पसरत जातं. अशावेळी ऑपरेशन शिवाय, तो तुकडा, ते अंग कापून फेकल्याशिवाय पर्याय नसतो. मुलीचा सांभाळ आईच करेल असा घटस्फोटाच्या केसमध्ये गृहीत पर्याय पडतो. इथे तुलाच माझी गरज नव्हती. आपल्यात काही ऋणानुबंधच नव्हते. नाळ तुटली अन तेव्हाच सगळं काही तुटलं. तुझे जीन्स माझ्यात यावे असं मलाही वाटत नव्हतं. तू स्वखुशीने तयार झालीस माझा ताबा पपाना द्यायला. तसं इन कॅमेरा मला स्वतंत्रपणे सारं काही विचारलं, माझं मत जाणून घेतलं. छान होते त्यांचे प्रश्न. जे त्यांना समजलं ते आई असून तुला नाही उमजलं. काही प्रश्नांची उत्तरे देतांना आपली तारांबळ उडते. प्रश्न कितीही साधे सोपे असले तरीही! शाळेत कठीण प्रश्न सहज सोडविणारी मी जज महोदयांसमोर अबोल, निस्तब्ध झाले.
त्यांनीही समजून घेतलं, मलाही समजावलं. त्यांना त्यांचं कर्तव्य बजावायचं असतं. कोर्टात भावनेला थारा नसतो. त्यांची भाषा, त्यांचे निर्णय, हे आर्टिकल नंबर, क्लॉज, सब क्लॉज, एव्हीडन्स, यावरच अवलंबून असतात. इथे कोण जिंकलं कोण हरले हा प्रश्नच नाहीये. तसंही तुला पपा बरोबर राहायचं नव्हतच. इथं मला एक प्रश्न पडतो. तुमचं लव्ह मॅरेज नव्हतं ते सेटल्ड मॅरेज होतं. अशा वेळी जी काही तडजोड करायची असते, समजून घेण्याची प्रक्रिया असते, ती लग्नानंतरच. सगळंच काही सगळ्यांच्या मनासारखे होत नाही. कुठेतरी काहीतरी तडजोड करावीच लागते. मी वयाने मोठी नाहीये. मोठ्यांचं सगळं समजून घेण्या इतकी. पण मला प्रश्न पडलेत. ते वयाला साजेसे नसतील. पण पडलेत. तुला नेमकं काय हवं होतं? आयुष्यात तुझ्या तुझ्यापासून काय अपेक्षा होत्या? तुझं सेन्स ऑफ परपज काय होतं? हे तू पपाना बोलली होतीस का? आपल्या आई वडिलांना तुला नेमकं काय हवं हे तू कधी सांगितले का? लग्नानंतर तुझ्यात पपात संवाद होता का? का फक्त वादच होता? पपाचे कुठे काय चुकले? त्यांनी काय करायला हवं होतं म्हणजे तू सुखी समाधानी, आनंदी झाली असतीस? हे असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं मला माहिती नाहीत. जे काही समजलं त्यातून ती उमजली नाहीत. ना मला, ना पपाला. ती मिळाली असती तर पुढे मला उपयोगी पडली असती, माझ्या लग्नाच्या निर्णयावेळी! ती दिल्ली दूर आहे म्हणा. पण तुझ्याजवळ तरी आहेत का या प्रश्नाची उत्तरं? मला शंका आहे, ती नसणार तुझ्याजवळ. असती तर ही परिस्थिती आलीच नसती! उशीरा का होईना सगळं तुझ्या मनासारखं झालंय. आता तुझी तू स्वतंत्र आहेस. हवे ते करायला, हवं तशी वागायला, हेच तर तुला हवं होतं ना? पण हे स्वातंत्र्य तरी तुला पचेल का,आवडेल का? इथंही मला शंका आहे! एक शंका होती,तुमच्या म्हणजे माई आजी, आजोबाच्या मनात. यानंतर माझं कसं होईल, काय होईल? पपांनी दुसरं लग्न केलं तर? पण तुम्ही कुणीही नका करू काळजी. मला खात्री आहे, ते दुसरं लग्न करणार नाहीत. तो म्हणाल्याच मी ऐकलं आहे, दुधाने तोंड पोळले एकदा, की ताक देखील फुंकून पितो माणूस! त्याच्यासाठी मीच आता सर्वस्व आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.तो मला आईचं प्रेम देऊ शकणार नाही कदाचित. आई ही शेवटी आईच असते. पण ती खरी आई तर मी अनुभवलीच नाही कधी. मला तर पपाच्या डोळ्यातच आई दिसते. त्याच्या स्पर्शात ती भासते. अर्थात त्याला त्याच्या पपा पणाच्या थोडं पुढे जावं लागेल, एक्सट्रा माईल.धावपळ होईल त्याची, तारेवरची कसरत करावी लागेल त्याला. मला खात्री आहे, करेल तो सगळं. शिवाय आज्जी आजोबा आहेतच. ते आहेत तोपर्यंत काही प्रश्नच नाही. त्यानंतर मग मीही मोठी होईनच की माझ्या परीनं.मला जरा लवकर मोठं व्हावं लागणार आहे एव्हढंच.हाथ कंगन को आरसी क्या? मला वाटतं. हे तुला उद्देशून लिहिलेलं वाचूनच तू म्हणशील, माझी बबडी, डॉली केव्हढी मोठी झाली? आजी आजोबा तर निश्चित म्हणतील. माझा असा दावा नाही की सगळं काही तुझंच चुकलं. कुठे ना कुठे, कधी न कधी इतराचंही चुकलं असेल. पपा सुद्धा चुकले असतील. प्रत्येक माणसाच्या हातून चुका होतात. इथे कोण चुकलं हे महत्त्वाचे नसते. काय चुकलं हे महत्वाचं. मुख्य म्हणजे त्या चौकातून काहीतरी शिकून आयुष्य पुढे न्यायचं असतं. तोच तो कोळसा उगाळून, त्याच त्या जुन्या घटनांचे दाखले देऊन, फक्त हात काळे होतात. हाती काही लागत नाही. मन कलुषित होतात. चूक करण्यात चूक नसते. तीच ती चूक पुन्हा करण्यात चूक असते. आपली चूक मान्य न करण्यात चूक असते. तू कधी पुढे जाण्याचा प्रयत्नच केला नाहीस. मला वाटतं तुला आम्हा सगळ्यांबरोबर पुढे जायचंच नव्हतं. तुला एकटीलाच पुढे जायचं होतं. झालं, सगळं काही तुझ्या मनासारखं झालं. आता तरी निदान सुखी, आनंदी रहा. आपल्या बोलण्या वागण्याने कुणाला दुखवू नकोस. आज्जी आजोबा, किंवा पपा ना जसे उलट बोलायचीस, सारखा त्यांचा अपमान करायचीस, तसं करू नकोस. कुणाला दुखवू नकोस. हा लहान तोंडी मोठा घास नाही, ही नम्र विनंती आहे. आणखी एक, सणासुदीला, माझ्या वाढदिवसाला मला फोनबिन करू नकोस. पुन्हा ती भावनिक गुंतागुंत, इमोशनल ब्लॅक मेलिंग असलं काही नको आहे मला. स्वतच नाळ तोडून टाकलीस ना, त्या आपल्या निर्णयाला जाग. मलाही गरज उरली नाही, अशा खोट्या नाटकी लाड कौतुकाची. तुला कळत नसेल पण आम्हा मुलींना कळतो खऱया प्रेमाचा, लळा जिव्हाळ्याचा स्पर्श. आता ते शिकवायला लागले ना शाळेत, गुड टच, बॅड टच! मला तर स्पर्शाची भाषा आधीच कळायला लागली. वयात येण्याआधीच मी तुझ्यामुळे मोठी झाले, वयात आले. त्याबद्दल निश्चितच आभार मानायला हवेत तुझे! अर्थात मी इतकीही मोठी नाही झाले, की तुला काही सूनवावं, सुचवावे. तू मनातल्या मनात म्हणशील ही कालची परकरी, शेम्बडी पोर मला ज्ञान द्यायला निघाली! छे, तो विचारच मनातून काढून टाका. हे सगळं तुझ्यासाठी नव्हतंच ममी. ही माझीच गरज होती. मनात जी भडभड, मळमळ साचली होती, ती सगळी गरळ मला ओकून टाकायलाच हवी होती. त्याशिवाय बरंच वाटलं नसतं मला.हा एनिमा गरजेचा होता माझ्यासाठी. आतली घाण बाहेर फेकुन देण्यासाठी. स्वत स्वच्छ होण्यासाठी. रविवेक परकरी पोर, बरमुडा घालणाऱया मम्मीला काय उपदेश देणार, कशी उपदेश देणार, तूच सांग! आपला ताबा फक्त आपल्या हातातल्या धावत्या क्षणावर असतो. पुढे काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ते पत्रिका, ज्योतिष, खरं मानलं तर गुण, राशी, नक्षत्र, मिळवून ठरवलेली लग्न यशस्वी व्हायला हवी. पण बत्तीस अन छत्तीस गुण जमलेली लग्न व्रायावर उधळल्या गेलेली आपण पाहतो. तुमची घटस्फोटाची केस चालू असताना घरी आज्जी आजोबाच्या चर्चा व्हायच्या.एकेक किस्से कानावर यायचे. प्रत्येक घरी काही ना काही समस्या असणारच. सुखी जोडपे, सुखी संसार, अपवादात्मक, हे असं का? जे एकेक किस्से कानावरून यायचे, त्यावरून वाटे खरंच या जगात प्रेम, लळा जिव्हाळा या भावना शिल्लक उरल्या नाहीत का? कुठे चाललो आहोत आपण? म्हणजे मोठ्यांनी लहानांना उपदेशाचे डोस पाजायचे. पण स्वत मात्र वेगळे वागायला मोकळे! कसला आदर्श, कसले मॉडेल ठेवता आहात तुम्ही आईवडील आपल्या मुलापुढे? आम्ही आमच्या ड्युटीज, जबाबदाऱया समजून शहाणपणाने वागायचं, पण तुमचं काय? तुम्हाला कुणी शिकवायचे? मुळात तुमची इच्छा, तयारी तरी आहे का? मला शंका आहे. म्हणजे तुम्हीच नीट वागणार नसाल तर तुम्ही आम्हाला काय सुधारणार? तो अधिकार तुम्हाला मिळतो कसा? जेव्हा आजूबाजूचे, शाळेतले माझ्याकडे वेगळ्या दयाद्र नजरेने बघतात तेव्हा मला त्यांचीच कीव येते. ‘हिचं कसं होईल’ हा एकच भाव, एकच प्रश्न त्यांच्या नजरेत असतो. मला त्यांना अन तुलाही सांगावंसं वाटतं, सगळं काही ठीक होईल. काहीही अडणार नाही, बिघडणार नाही. कारण वरचा बाप्पा तुमच्याकडून एखादी गोष्ट हिसकावून घेतो, तेव्हा त्या बदल्यात बरंच काही देऊन जातो. त्या गिफ्टची जम्मत त्या व्यक्तीलाच माहिती असते. मी म्हटलं नाही तुला, तू वेळेआधीच मला मोठं केलंस म्हणून? तू फक्त मोठंच केलं असं नाही, तर मला बरंच काही शिकवलं. त्यामुळे आता पुढे मीच माझी काळजी घेईन. सावध राहीन. ज्या चुका तू केल्यास त्या न करण्याची जबाबदारी माझी. त्यामुळे तू जशी पावलोपावली ठेचाळलीस तशी मी नाही ठेचळणार. मी अवतीभवतीच्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करेन. माझ्या परीनं माझा इगो काबूत ठेवेन. लहान तोंडी मोठा घास कधीच घेणार नाही. एक स्त्राr म्हणून माझ्या ज्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत त्या माझ्या मीच पाळेन. माझ्यासाठी कुणा लक्ष्मणाला लक्ष्मण रेषा आखावी लागणार नाही. ती माझी मीच आखलेली असेन. जर कुणी मला विचारलं की मोठं होऊन तुला काय व्हायचंय? तर मी आत्मविश्वासानं, मला एक प्रेमळ पत्नी व्हायचंय समजूतदार अर्धांगिनी व्हायचंय. अन हो एक जबाबदार, प्रेमळ आई देखील व्हायचंय! पपाचं आवडतं गाणं आहे अनारकलीतले- ये जिंदगी उसीकी है.. जो किसिका हो गया.. प्यारही मे खो गया.. मला त्या गाण्यातला शेवट पिळवटून टाकतो.. तुला अलविदा.. अलविदा म्हणतांना!.. अलविदा मम्मा!
— डॉ. विजय पांढरीपांडे.
Leave a Reply