अजून निरोपही घेतलेला नाही नीटसा आणि ही व्यक्ती निघून गेली. “मदारी” पाहिलेला नाही, “तोमर” पाहिलेला नाही, “तलवार” पाहिलेला नाही, “मकबूल” पाहिलेला नाही, “करीब करीब सिंगल” पाहिलेला नाही, हॉलीवूडचं काम पाहिलेलं नाही ! हातात फक्त ” बिल्लू, लाईफ ऑफ पाय (अर्धवट ) , लंच बॉक्स , लाईफ इन मेट्रो, स्लमडॉग , न्यूयॉर्क , पीकू , हिंदी मिडीयम आणि मागील आठवड्यात पाहिलेला अंग्रेजी मिडीयम ” बस्स !
कलकत्त्यामध्ये हॉटेलमधून चेक आउट करण्यापूर्वी वेळ होता म्हणून टीव्ही वर “बिल्लू ” पाहिला- तो शाहरुख साठी. या माणसाचं नांवही ऐकलेलं नव्हतं. आणि त्या चित्रपटात शाहरुख शोधावा लागला. लारा पत्नीच्या नॉन ग्लॅमरस भूमिकेत असल्याने लक्षात राहिली. पण चित्रपटावर याची पूर्ण छाप – शाहरुखला झाकोळून टाकणारी , अगदी त्याला शेवटच्या स्वगतामधून एस्टॅब्लिश व्हावं लागलं आणि स्वतःचा शिक्का मारावा लागला.
डोळ्यांनी बोलणारी फक्त दोन माणसं मला या चित्रपटसृष्टीत आवडली – एक तो “निळ्या डोळ्यांचा जादूगार ” (राज कपूर ) आणि दुसरा हा !
मराठीतला आपला चपखल शब्द वापरायचा तर हा “भोकरडोळ्या ” होता. पण इतकी बोलकी नजर अपवादात्मक ! त्याचे सारे संवाद ओठातून नंतर उमटायचे पण ते काम आधी डोळ्यांनी केलेलं असायचं.
हा “सहज ” माणूस होता- हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानोबांच्या ” सहज निटू झाला ” यातलं सहज शब्दाचे जे निरूपण केलं होतं, त्यात फिट्ट बसणारा !
सहज शब्दाला न्याय देणारी दुसरी व्यक्ती ( हृदयनाथांनी वर्णन केलेली ) म्हणजे आमची “लता ”
ती सहज गाते -हातवारे न करता, चेहेरा वेडावाकडा न करता ! अशक्य तानाही ती सहज गाते.
अभिनयातील हा सहज माणूस होता- समोर “बिल्लू ” वाले शाहरुख /लारा असो, वा “पिकू ” वाले अमिताभ /दीपिका असो. त्याला फरक पडायचा नाही. किंबहुना सहकलाकार कोण, हे त्याच्या खिजगणतीतही नसायचे.
स्वतःला ओळखलेल्या माणसालाच फक्त हे शक्य असतं.
संजीवकुमार तसा होता -साक्षात “विधाता ‘मध्ये दिलीप समोर असला तरीही त्याला त्याचे काही नव्हते. नाणं अस्सल आणि खणखणीत ! या दोघांसारखे मराठीतील एकमेव म्हणजे ” निळू भाऊ ! ” सहज कलावंतांची माझी (तरी ) यादी संपली.
एकेकाळी “समांतर” आणि “व्यावसायिक ” अशी भाऊबंदकी असे. १९७५ च्या सुमारास बेनेगल, जब्बार, निहलानी, तेंडुलकर अशा मंडळींनी समांतर व्यवस्थेचे बस्तान बसविले होते. स्मिता,शबाना,नासिर,ओम,गिरीश, अमरापूरकर अशांच्या कर्तृत्वाने ही मोहीम फोफावली. तेथे चेहेरा ,झाडाभोवती घिरट्या असलं pre -requisite नव्हतं. या मंडळींनी सोलीव जीवन दाखवलं, ते पाहण्याचं धाडस प्रेक्षकांमध्ये निर्माण केलं आणि सगळ्यांना हादरून सोडलं. चित्रपट म्हणजे फक्त करमणूक ह्या व्याख्येच्या चिंध्या झाल्या. चित्रपट म्हणजे जीवनाचा तुकडा दाखविणारा आरसा ही चित्रपटांची खरी ओळख त्यांनी अधोरेखित केली. कालांतराने कलावंतांनी उंबरे ओलांडून या दोन्ही प्रवाहांना एक केलं.
यानेही भारतीय आणि अभारतीय चित्रपटांचे प्रवाह एक केले आणि फक्त अभिनय केला – डोळ्यातून , देहबोलीतून ,आवाजातून !
मागील आठवड्यात पाहिलेला “अंग्रेजी मिडीयम ” ही त्याच्या नितांत सुंदर अभिनयाने नटलेला होता – करीनाकडे आणि पिकलेल्या डिम्पलकडे दुर्लक्ष करावा असा. आजाराच्या खुणा ,व्रण शोधूनही सापडल्या नाहीत. तो आणि आनंद देणारा फक्त तो – चित्रपट पाहिल्यावर मन तृप्त झालं.
वर्षांनुवर्षे त्याच्या अभिनयाचे ठसे मनावरून पुसट होणार नाहीत.
अजून खूप काही देण्यासारखं त्याच्या कडे होतं – हे त्यालाही माहीत होतं आणि आपल्यालाही हवं होतं.
लक्षात ठेवा – “अलविदा ” तो म्हणालाय , आपण नाही.
ही exit खूप दुखावणारी आहे, आपल्याला अतृप्त ठेवलं म्हणून त्याचा राग आणणारी आहे.
इथे दंतकथांच्या वदंता होतात. हे पुढच्या पिढ्यांना सप्रमाण सांगायची जबाबदारी आता आपली !
“इरफान” नांवाची दंतकथा प्रत्यक्ष पाहिली याबद्दल स्वतःची पाठ थोपटून मी आता त्याचे न बघितलेले चित्रपट पाहणार आहे – तेवढंच माझ्या हाती आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply