आज सर्वत्र कृत्रिम धागे आणि दो-या यांचाच काळ आहे. सर्व कामासाठी नायलॉनच्या दो-यांचा वापर होत आहे,पण एक काळ होता जेंव्हा शेतातील कामासाठी नैसर्गिक धाग्यापासून बनलेल्या दोरीचा वापर व्हायचा.अंबाड्याच्या बट्ट्यापासून दोर वळायचे….गावोगावी वट्यावर म्हातारी माणसे दो-या वळत बसलेले दिसायचे.
अंबाडी सर्वांगाने उपयोगी असणारे आमच्याकडचे हमखास कल्पवृक्षासारखे पीक.कोवळ्या पानांची भाजी,बियांपासून तेल किंवा भाजून तिखट-मीठ टाकून चटणी तर ताटापासून निघालेला अंबाडा दोरीसाठी उपयोगी..शिवाय चूल पेटवायला सनकाडीही मिळायची.अंबाडी दोन प्रकारची…एक लाल बोंड्याची,दुसरी हिरव्या बोंड्याची,उंच वाढणारी ज्यातून अंबाडा निघायचा..फार उपयुक्त..अगदी चटणी-भाजी पासून ते तेलापर्यंत अन् दोरी–दोरखंडापासून ते कुडा-ताटव्या पर्यंत.
घराघरात उपयोगी असणारे पीक आता कुठेच दिसत नाही.काळ बदलला अन् अंबाड्याच्या दोरीची जागा नायलॉन दोरीने घेतली….कळलंच नाही..पूर्वी दररोजच्या स्वयंपाकात अंबाडीचेच तेल वापरायचे.आज नव्या पीढीला ‘बोलणा-याच्या अंबाड्या विकतात पण न बोलणारांचे गहू सुध्दा विकत नाहीत’ या म्हणीचा अर्थ समजावतांना अंबाड्या कशा असतात ? हे दाखवायलाही कुठेच नाहीत मग चव चाखणे लांबंच….अशी आवस्था.… …फार तर कधीतरी बाजारातून आणलेली अंबाड्याची भाजी दिसते…बाकीचेही उपयोग असतात हे फारसे कुणाला माहितच नाही.
खरं तर अंबाडी हे निकृष्ट दर्जाचे पीक समजले जायचे.…तरी शेतक-याला या पिकाचा मोठा आधार होता.. कमी खर्चात येणारे अन् अनेक प्रकारचे उपयोग असणारे एकमेव पीक म्हणजे..अंबाडी…संकरित ज्वारीत…तुरीमध्ये..मिश्र पध्दतीने हे पीक घेतले जायचे…साधारण पाच-सहा फूट उंच सरळ वाढायचे..पिवळसर– पांढ-या रंगाची,मध्यभागी लाल रंग असलेली सुंदर फुलं उंच उभ्या सरळ वाढलेल्या ताटाला गोलाकार यायची..फुले सुकली की छोट्या्-छोट्या् काटेरी बोंडया दिसायच्या…मग त्याला जनावरे फारशी तोंड लावायची नाही..काही दिवसात बोंडया वाळल्या की मग कापणी करायची.अंगाला काटे टोचायचे म्हणून कापणी करणे अवघड होते…पुढे..एकेक काडी लाकडी वखराच्या खोडावर आपटू-आपटू बडवणी करायची…मातीच्याच काळ्या रंगाचे दाणे खाली पडत रहायचे..म्हणून खळं शिपतांना ज्वारीचे पांढरे भुस्कट नाहीतर साळीचे भुस्कट टाकावे लागायचे..खळ्यात गेलं की,सगळे काटे अंगावर उडायचे…काम करतांना हातानं घाम पुसला की मग अंगाची आग उठायची…अंग चुन-चुन करायचे..कधी एकदा पाण्यात डुबकी मारावी असे होऊन जायचे..अंबाडीच्या बोंड्या झडकून राहिलेली ताटं पेंढ्या करून एकत्र भारे बांधून ठेवायचे…उन्हाळ्यात गंगेला पाणी कमी व्हायचे…फक्त ढव्हंच राहिले की मग बैलगाडीत भारे घेऊन ढव्हात भिजत घालायचे…आजूबाजूच्या गावातील बरेच शेतकरी जिथं पाणी असंल तिथं भारे भिजत घालायचे..आपले भारे ओळखू यावेत यासाठी त्यावर खूण ठेवायची…पंधरा दिवसानं जाऊन भिजलेल्या भा-यातील एकेका काडीवरची लांब साल काडीपासून वेगळी करायची…ती साल म्हणजेच अंबाडा असायचा..अंबाड्याचे एटं करायचे. ..म्हणजे गुता होऊ नये यासाठी जोडून खास पध्दतीने पीळा घालून ठेवला जायचा…अंबाडा…वर्षभर दोरखंडासाठी पुरायचा….ताटापासून सनकाडी मिळायची. .सहज पेटणारी… चुलीला पेटवणीसाठी उपयोग..कधी आडोसा करण्यासाठी, कुड घेण्यासाठी उपयोग व्हायचा….अंबाडीला बाजारात फारसे पैसे मिळत नसले तरी घरी मात्र फार उपयोगी होती..अंबाडी…अंबाडीचे घाण्यातून तेल गाळून आणायचे,सोबत पेंड मिळायची..गुरा-वासरांची चांगली सोय व्हायची…दोरीपासून यटन,सोल,कासरे,कान्या,जोते,सरका,सुंभ असे वेगवेगळी नावे असलेले प्रकार बनवत..
आता ना उरली अंबाड्याची दोरी ना दोरखंड..!..
किलोवर नायलॉन दोरी विकत घेतांना आठवते,दोन्ही हाताचा वाव करून भरभर मोजलेली अंबाड्याची दोरी…
— संतोष सेलूकर,परभणी
7709515110
Leave a Reply