आम्ही जाहिरातींची कामं करायला सुरुवात केली ते साल होतं, १९८५. मराठी चित्रपट सृष्टीतील ‘भीष्म’ अण्णासाहेब देऊळगांवकर यांची ‘लेक चालली सासरला’ची डिझाईन करण्याच्या निमित्तानं, नुकतीच ओळख झाली होती. एके दिवशी दुपारी अण्णांचा निरोप आला, डेक्कनवरील माझ्या ऑफिसवर या..
आम्ही दोघे बंधू गेलो. त्या ‘गंगा लाॅज’च्या छोट्या ऑफिसमध्ये अण्णासाहेब व काही मंडळी बसलेली होती. अण्णांनी आम्हाला ‘धुमधडाका’ चित्रपटाची डिझाईन करण्याचे काम दिले. आम्ही पेपरच्या सिंगल व डबल काॅलमच्या जाहिराती करुन दिल्या. ‘प्रिमिअर शो’ला, सर्व कलाकार व तंत्रज्ञ आलेले होते. त्यावेळी ‘अंबाक्का’च्या भूमिकेतील सिने अभिनेत्री प्रेमा किरणला, मी पहिल्यांदा पाहिलं..
‘धुमधडाका’ या विनोदी चित्रपटाने, मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी दिशा दिली. चित्रपट पुण्यातील ‘विजय’ टाॅकीजला ५२ आठवडे, म्हणजे वर्षभर तो ‘हाऊसफुल्ल’ चालला.. त्याने धुमधडाक्यात, ‘सुवर्णमहोत्सव’ साजरा केला!!
या चित्रपटाचं यश जातं, पटकथा-संवाद लिहिणाऱ्या अण्णा देऊळगावकरांना.. कथानक जरी उत्तम असलं तरी ते चुरचुरीत संवादांनी फुलवणं, हे काम अण्णांनी लीलया केलं. प्रेमा किरणचा हा पहिलाच चित्रपट होता.. तिला त्यांनी ‘अंबाक्का’ हे टिपिकल गावठी नाव दिलं.. तिच्या पहिल्याच एंट्रीला ‘काॅटन स्मिता’ असा लक्ष्याच्या तोंडी संवाद दिला.. सिल्क स्मिता ही दक्षिणेकडील हाॅट नायिका होती, ही महाराष्ट्रातील.. म्हणून ‘काॅटन स्मिता’! पहिल्याच चित्रपटात तिची व लक्ष्याची केमिस्ट्री जुळली व नंतर दोघांनी अनेक चित्रपटांतून धमाल कारकिर्द केली..
‘धुमधडाका’ हा चित्रपट मूळचा हिंदी चित्रपट ‘प्यार किये जा’ वर आधारित आहे.. ‘प्यार किये जा’ हा मूळच्या, एका तेलगु चित्रपटावर आधारित आहे.. तो तेलगु चित्रपट, मूळच्या १९६४ सालातील एका तामिळ चित्रपटावर आधारित आहे… या सर्व चित्रपटांनी उत्तम व्यवसाय केला, कारण कथाच उत्तम आहे!!
‘धुमधडाका’च्या यशानंतर प्रेमा किरण यांनी अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक, पितांबर काळे यांच्या प्रत्येक चित्रपटात, त्यांनी विविध भूमिका साकारलेल्या आहेत.. १९८५ ते २०२० पर्यंत त्यांनी मराठी बरोबरच गुजराती चित्रपटांतूनही काम केले आहे.. प्रेमा किरण यांनी ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे..
‘गांव थोर पुढारी चोर’ या चित्रपटाच्या मुहूर्ताला मी उपस्थित होतो. त्या चित्रपटात त्याची सशक्त भूमिका होती. सातारा येथील निर्मात्यांच्या सर्व कौटुंबिक चित्रपटात, प्रेमा किरण या प्रामुख्याने असायच्याच..
अलीकडच्या काळात त्यांचा एकुलता एक मुलगा गेल्यानंतर, त्या खचलेल्या होत्या. पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने, त्या अनंतात विलीन झाल्या..
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा, जाहिरातींच्या निमित्ताने मी एक साक्षीदार आहे.. ‘धुमधडाका’ सारख्या अनेक चित्रपटांचे सुवर्ण महोत्सव मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत.. मराठी चित्रपटसृष्टीत अनेकदा आलेले चढ-उतार अनुभवलेले आहेत.. अण्णा देऊळगावकर यांची पिढी काळाच्या पडद्याआड कधीची गेलेली आहे.. त्यावेळचे कलाकार, मग तो लक्ष्मीकांत बेर्डे किंवा विजय चव्हाण असेल.. असे एकेक जण जाऊ लागले आहेत.. प्रेमा किरण गेल्या..
कलाकार हा शरीराने गेला तरी आठवणीतून अमर असतो.. ज्यांनी कुणी त्या काळात ‘धुमधडाका’ची पारायणं केली आहेत.. ते ‘अंबाक्का’ला कदापिही विसरु शकणार नाहीत.
ज्येष्ठ सिने अभिनेत्री, प्रेमा किरण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१-५-२२.
Leave a Reply