चार दिवसांची “दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत” किंवा “रथसप्तमीपर्यंत संक्रांत” साजरी करणारा “उत्सवप्रिय” असा मनुष्य प्राणी .. आणि या सणांच्या मंदियाळीतला बरेच दिवस म्हणजे साधारण दोन-अडीच महीने चालणारा सण म्हणजे “आंब्यांचा सण”. आंबे खाणं ही गोष्ट सुद्धा सोहळ्यासारखी साजरी करतो आपण .. म्हणून आंब्यांचा सुद्धा “सण” !!!……. हां ss .. आता त्याची सुरुवात ही प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, आवडी-निवडी प्रमाणे वेगवेगळ्या वेळेस होते .. म्हणजे काही जणांचा असा आग्रह असतो की बाजारात आंबा दाखल झाला की ताबडतोब पहिली पेटी आपल्याकडे आलीच पाहिजे .. मग त्यासाठी कितीही पैसे मोजावे लागले तरी चालतील .. पण “पाहिजे म्हणजे पाहिजे “ !!.. काहींच्या घरी ; “पाडव्यानंतरच आंब्याला खरी चव येते त्यामुळे गुढीपाडवा झाल्याशिवाय आंबा आणायचा नाही !!..” अशा ठाम तत्वानुसार वर्षानुवर्ष आंबा खरेदी होते .. तर काही जण “यथाशक्ती” सारासार विचार करत “थोडा भाव उतरल्यावर घेऊ” किंवा “पगार झाल्यावर घेऊ” असा निर्णय घेतात .. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे “आंब्याची पेटी” घरी यायचा प्रत्येकाचा मुहूर्त वेगळा ss !! ..
“आंब्याची पेटी” घ्यायची ……पण ती कुठून ?? …यावर सुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा !!. काही जणांचं ; सोनं घेण्यासाठी ठरलेल्या पेढीसारखं असतं .. वर्षानुवर्ष कायम त्याच त्या आंबेवाल्याकडून खरेदी करणार .. अगदी सोन्याएव्हढा भाव असला तरीही .. एकदम “लॉयल आणि रॉयल” काम .. दर्जा आणि विश्वास याला जास्त प्राधान्य .. .. त्याउलट बरेच जण चिमणीसारखे .. .. पंचक्रोशीतल्या सगळ्या आंब्यांच्या स्टॉलवर जाऊन चोच मारून येणार .. आंब्या ऐवजी विक्रेत्यालाच पार “पिळून” काढतात हे …… , काहीना लांब जाऊन आंबा घेतला की काहीतरी स्पेशल वाटतं .. म्हणून “मार्केट यार्ड , APMC मार्केट” किंवा अशा कुठल्यातरी होलसेल विक्रेत्याकडून आंबे घेण्याकडे त्यांचा कल असतो .. सेटिंग असतं .. .. , तर, वर्षातून एकदाच हा सीझन असतो म्हणून हा व्यवसाय करणाऱ्या आपल्या सगळ्या मित्रमंडळींना शक्य ती मदत करण्याच्या उदात्त हेतुने प्रत्येकाकडून थोडे थोडे आंबे मागवणारे सुद्धा अनेक असतात … काहींचे वर्षभर बासनात गुंडाळलेले कोकणातले नातेवाईक आणि त्यांचे संपर्क “अचानक” सक्रिय होतात .. तर काहींची खरंच घरं असतात कोकणात त्यामुळे तिथून येते “आंब्याची पेटी”..
“कुठले आंबे मागवायचे??” हा अजून एक विषय त्यापुढे ओघाने येतो.. “ आम्ही बाई हापूस शिवाय दुसऱ्या कश्याला हात लावत नाही बरं !!” .. ही एक राजेशाही तऱ्हा .. काही जण मात्र एक एक “पायरी” पार करत , त्याचा आस्वाद घेत “हापूस” वर येतात .. हापूस मध्ये सुद्धा “देवगड सुपर किंग्स” आणि “रत्नागिरी नाईट रायडर्स” या दोन टीम्सचे फॅन्स परत वेगळे असतातच ………….. अशा अनेक पार्श्वभूमी , परिस्थिती .. वेगवेगळी तत्व , विचारधारा .. आणि शिवाय “व्यक्ती तितक्या प्रकृती” असल्या तरीही या समस्त आंबाप्रेमींमध्ये एक “किमान समान भावना ” असते ती म्हणजे .. सिझनची पहिली वहिली “आंब्याची पेटी” घरी आल्यावर होणारा “परमानंद” !!! .. आता रंगीबेरंगी बॉक्स असले तरीही पट्ट्या-पट्ट्याची “लाकडी आंब्याची पेटीच” खरी.. ती लाकडी पेटी बघण्याची मजाच न्यारी !!.. लहान मुलं स्वाभाविकच तो आनंद ,उत्साह त्यांच्या कृतीतून निरागस पणे व्यक्त करतात .. त्यांच्या चेहऱ्यावर आपसूक झळकतोच तो !!……. , मोठी माणसं मात्र आपलं “प्रौढत्व” गोंजारत शांत बसली ;तरी ती “आंब्याची पेटी” बघून मनातल्या मनात गुदगुल्या होतातच !!!..
यानंतर येतो तो “आंब्याची पेटी” उघडण्याचा समारंभ .. हातोडी किंवा पकडीने खिळे काढून वरच्या पट्ट्या काढायच्या आणि मग अलगद थोडासा पेंढा दूर सारला की दिसतात ..अगदी वरचे बऱ्यापैकी “परिपक्व Opening Batsman” …. मग “मधल्या फळीतले” अर्धवट पिवळे आंबे .. आणि “तळाला हिरवेकच्च गोलंदाज ” .. ह्या संपूर्ण आंबा दर्शनानी डोळे दिपले की त्यातला गरजेपुरता पेंढा काढून घरीच आंबे पसरून ठेवायचे .. एकदा ही “आंबेमोहीम” फत्ते झाली की त्या पेटीची रवानगी कचऱ्याच्या बादली जवळ किंवा चपलांच्या बाजूला होते …… काल पर्यंत ज्या पेटीची सगळे आतुरतेने वाट बघत होते , जिच्या नुसत्या दिसण्याने मन प्रसन्न झालं होतं तीच “आंब्याची पेटी” काही मिनिटात “अडगळ” होऊन गेलेली असते …. जाता येता वाटेत कोणाला तरी कोपरा लागतो म्हणून चार-दोन शिव्याही खाते .. मग शेवटी घराबाहेर कुठल्याश्या कोपऱ्यात किंवा जिन्याखाली वगैरे वर्णी लागते .. त्या आंब्याच्या पेटीचा प्रवास तिथेच संपलेला असतो …… अर्थात या चक्रातून “पानं, फुलं, फळं, निसर्गच” काय तर अगदी माणूसही सुटू शकला नाही तिथे या पेटीचं काय ???? ..
पण …. आपल्या दृष्टीने हा प्रवास संपला असला तरी आंब्याच्या पेटीचा “कार्यभाग”अजून संपलेला नसतो .. उलट सगळ्यात महत्वाचं असं आवश्यक “कर्म” अजूनही बाकी असतं .., आपल्याला अडगळ झालेल्या या आंब्याच्या पेट्यांच्या शोधात कुणीतरी कचरा वेचक किंवा गरजू व्यक्ती सगळ्या बिल्डिंगच्या वाऱ्या करत फिरत असतात .. आणि या रिकाम्या पेट्या भंगारात किंवा अशा लाकडी पेट्या तयार करणाऱ्यांकडे नेऊन विकतात .. एका पेटीचे ५-१० रुपये मिळत असतील-नसतील कदाचित पण .. त्यातून त्यांच्या त्या दिवसाच्या जेवणाची सोय होते .. म्हणूनच आपल्याला ती “आंब्यांनी “भरलेली पेटी” घरी आल्यावर “भरल्या पोटी“ जितका आनंद होतो ना ss .. कदाचित त्याही पेक्षा कैक पटीनी जास्त आनंद त्यांना “रिकाम्या पोटी” ती “रिकामी पेटी” पाहून होतो… “आंबे” खाणं ही आपली “लक्झरी” असली तरी “अन्न” ही मात्र त्यांची “मूलभूत गरज” असते .. आपण आपल्या हौसेखातर आंब्याच्या पेट्या आणत राहतो .. पण प्रत्येक “आंब्याची पेटी” नेहमीच याची जाणीव करून देते की .. “समाजात एक स्तर असाही आहे ; ज्यांच्यासाठी आंबे खाणं तर फारच दूर पण त्यांना साधं दोन वेळेस पोटभर जेवणही मिळत नाही” ……. .. आणि आपण काही सगळ्यांना पुरे पडू शकत नसलो तरी दरवेळी आंबे ,आमरस खाताना ; त्याचा मनमुराद आनंद उपभोगताना , मनाच्या एका कोपऱ्यात निदान “ती जाणीव” नक्कीच असते …. असायलाच हवी !!!!!!
— क्षितिज दाते , ठाणे
Leave a Reply