
लेखिका : नीलिमा क्षत्रिय
सिअँटल एक मोठं शहर..समुद्रकिना-यावरचं…बेलेव्ह्यु सिअँटलचंच उपनगर…पण दोन्ही ठिकाणच्या चलनवलनात बराच फरक…अगदी पुण्याच्या गंज पेठेत आणि बाणेर -औंध मधे आहे तसाच…
हिरव्यागार टेकड्या टेकड्यांवर वसलेलं…हे एक नितांत सुंदर टुमदार शहर….मोकळे ढाकळे रस्ते.. विकएंडमुळे रस्त्यांवर रहदारी कमी..सुट्टीच्या दिवशी मुंबईच्या फोर्ट भागात असतं तसं…देखण्या इमारती, आणि शांत शांत वातावरण… गार वारं अंगावर झेलत झेलत,छत्र्या जर्कीन्स सावरत, रस्त्या ने तुरूतुरू करत निघालेले अमेरिकन्स…उन सावलीचा लपंडाव चाललेला.. …
वेगवेगळ्या टप्प्यांवर सगळं शहर वसलेलं असल्यानं एखाद्या बिल्डींग मधल्या लिफ्टने सगळ्यात वरच्या मजल्यावर गेलं की रस्ता लागतो..त्या टप्प्यावर फिरून झालं की पुन्हा लिफ्टनं टेरेस गाठायचीे की पुढचा टप्पा..आपल्याकडच्या कुलू मनाली सारखंच.. पण आपल्या शहरांना जागोजागी गरिबी आणि अगतिकतेची एक किनार असते, इथे सगळीकडे सुबत्तेची साय..
दुपारी चांगलं उन होतं म्हणून गेलो, पण पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे ढग हजर..सोबतचं गार वारं लागलं लगेच ढगांना पिंजायला.. दूरदूरपर्यंत काळे पांढरे ढग समुद्रावर झेपावत होते…इथे असं वातावरण असलं की ह्या एप्रिलच्या दिवसांत पण आपल्याला एस्किमोसारखाच अवतार करून फिरावं लागतं. थर्मल, जर्कीन, हातमोजे , पायमोजे, शक्य असेल तर गुडघ्यापर्यंत बूट…गोठलेल्या उत्तर धृवावरून येणारी गार हवा समुद्रकिना-यावर अक्षरश: टोचते.. थंडीत काय परिस्थिती होत असेल..
समुद्रावरच लाकडी खांब रोवून उंचावर एक लाकडी फळ्यांचं मैदान बनवलेलं, तिथे मग हॉटेल्स, आईस्क्रीमची दुकानं, मुलांची खेळण्याची साधने…थोडक्यात जत्राच..आपल्याकडे जसं एखाद्या ठिकाणी पाण्यातल्या दगडावर पैसा पडला की मनातली इच्छा पूर्ण होत असं मानतात, तसं पण एक ठिकाण होतं. बरेच लोक नेम धरून सेंट्स फेकत होते.. पाण्यात बरेच सेंट्स पडलेले दिसत होते.. लोकांच्या श्रद्धा सगळीकडे सारख्याच.
एक मोठं मत्स्यालय… आपण काचांच्या आत आणि मासे आपल्याभोवती फिरताहेत.. त्यानिमित्ताने पिंज-यातल्या प्राण्यांना आपण पहातो तेव्हा त्यांना काय फील येत असेल ते कळतं.
”स्टारबक” इथली जग प्रसिद्ध कॉफी…शंभरएक वर्षांपूर्वी सिअँटलला ‘स्टारबक’ कॉफीची एका दुकानात प्रथम विक्री सुरू झाली….ते दुकान हेरिटेज सारखं जपलेलं..आपल्याकडच्या इराण्याच्या हॉटेल्स सारखं, जुनं फर्निचर, जुनाट बिल्डींग, पिवळ्या बल्बचा उजेड आणि बाहेर कॉफीसाठी रांग लावून उभे असलेले अमेरिकन कॉफी प्रेमी..
इथे जागोजागी कॉफीचा सुगंध दरवळत असतो.. लोक कॉफिचे मोठमोठे मग्ज सोबत घेऊन फिरत असतात… म्हणून एकदा टेस्ट केली , पण दोन घोटांवर पिऊ नाही शकत, अगदी कडवट्ट चव, त्यात न साखर न दूध…नुसतं काळं कडू पाणी… पण वास मात्र एकदम मोहात पाडणारा…
पुढे लगेचच फार्मर्स मार्केट… सगळी अमेरिकन शेतकरी मंडळी, त्यांची मुले, स्टॉल्स लावून शेतातला भाजीपाला फळफळावळे विकत असलेली.. बुढ्ढीके बाल, पॉपकॉर्न, बर्फ गोळ्याचे स्टॉल्स.. कोणी हौशी अमेरिकन गळ्यात गिटार अडकवून वाजवत असलेला..त्याच्या जोडीला एखादी निग्रो मुलगी त्याला गाऊन साथ द्यायला, बाकीच्या हौशी जोड्या त्यांच्यासमोर जागीच अंग घुसळल्यासारखं नाचत असलेल्या..ह्या लोकांचं नाच गाणं म्हणजे उगीच फॉर्मँलिटी म्हणून नाचणं..आपल्यासारखं नागिन डान्स, सैराट डांस… ह्यांचा विषयच नाही.. त्या बाबतीत आपलं नाचकाम जगात भारी.
पुण्यातल्या तुळशी बागेसारखंच एक मार्केट.. ‘पाईक स्पेस’…इथे कानातले, गळ्यातले, चपला, पर्सेस, कपडे, पाकवलेली फळं..आवळा कँडीसारखी, खारवलेले मांसाचे प्रकार, आणि तिथे भिनभिनणा-या अमेरिकन बायका, त्यांच्याबरोबर पाय ओढत निघालेली नवरा किंवा बॉयफ्रेंड्सची जमात… एका स्टॉलवर साध्या आपल्याकडे शंभर शंभर रूपयाला मिळतात तशा माळा टांगलेल्या होत्या. इथे ‘सौ का एक..देढसौ का दो’असं कोणी ओरडत नव्हतं. पेक्षा कोणी गि-हाईकाला भावच देत नव्हतं. शांतचित्ताने आपापल्या ठिकाणी बसून होते. पण कोणी एक अमेरिकन मावशी ती माळ घेत होती… तेव्हा कोहिनूर हिरा मढलेला असल्यासारखं, ती आणि स्टॉलवाला त्या माळेकडे बघून माळेच्या कौतुकाचा पोवाडा गात होते. आधी मला वाटलं, मावशी म्हणताहेत “हमेशा तुम्हारे पाससेच लेती ना भैया, ठीक ठीक बोलो..” त्यावर भैय्या, “तुम्हारे वास्तेच इत्ता कम लगाया, मेरेको खरेदीके भाव मे भी नही पड रहा”.. असं काही तरी चाललेलं असेल. पण ते तसं नव्हतं..
त्या माळेतले दगडं कुठल्या देशाच्या कुठल्या प्रदेशातल्या खाणीतले आहेत, आणि ती माळ किती दुर्मीळ आहे हे तो त्या अमेरीकन मावशींना प्रचंड हातवारे करून समजावून सांगत होता, आणि मावशी पण कोहीनूर हि-याची चमक डोळ्यात आणून माहिती घेत होत्या…मनात म्हटलं, चालू द्या…आमच्याकडे तर आम्ही गरज नसल्यासारखे पुढे जातो ,माळ वाला ‘चलो पिचत्तर मे ले लो’ म्हणत मागे मागे येतो…
मार्केटच्या बाहेर पण गर्दीच गर्दी…पण गर्दी जरी असली तरी त्यामानाने खूप कलकलाट नव्हता…थंडीमुळे शब्द तोंडातच गोठतात की काय देव जाणे इथे. मार्केट मधून बाहेर पडताच, बाहेर गिटार वाजवून पैसे मागणारे गरीब निग्रो मुलं, लोकांचं लक्ष वेधून घेणारे जडीबुटीवाले कोरियन लोक, प्राण्यांची हाडं, पिसं..तोडगे म्हणून विकणा-या चिनी बायका.. बेघर ( homeless people) लोक, ह्यात मेक्सिकन,निग्रो, चायनिज, अमेरिकन सगळेच…चेह-यावर हास्य पण डोळ्यात केविलवाणी छटा , हातात बोर्ड्स धरून बसलेले…त्यावर लिहिलेलं ”थंडीपासून संरक्षणासाठी.. ब्रेड साठी..मुलांच्या डायपर साठी मदत करा”..(मुलांचे डायपर्स ही इथली जीवनावश्यक गोष्ट).
दिव्या खालचा अंधार तिथे दाटलेला दिसला…..
शब्दांकन : नीलिमा क्षत्रिय
Leave a Reply