आजपासून पाचशे वर्षांनंतरही अवकाश क्षेत्रातील एक घटना पृथ्वीवासीयांना निश्चितच आठवेल. ती म्हणजे ‘अपोलो- ११’ या अवकाशयानातून मानवाचे पृथ्वीपल्याडच्या विश्वात पडलेले पहिले पाऊल! केप कॅन्व्हेरलवरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तीन अवकाशवीरांसह ‘अपोलो- ११’ यानाने चंद्राकडे झेप घेतली. तीन दिवसांनंतर १९ जुलै रोजी चंद्राभोवतीच्या १०० कि. मी.च्या कक्षेत ठरल्याप्रमाणे ते फिरू लागले.
भारतीय वेळेनुसार २१ जुलै रोजी तेराव्या प्रदक्षिणेदरम्यान नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन ‘ईगल’मध्ये (चंद्रावर उतरणाऱ्या घटकाचे नाव) बसले आणि ‘ईगल’ संचालक घटकापासून वेगळे झाले. या संचालक घटकाचे नामकरण ‘कोलंबिया’ असे करण्यात आले होते. तिसरा अंतराळवीर कॉलिन्स हा कोलंबियामध्येच थांबून पृथ्वीप्रदक्षिणा करीत राहिला. दोन तास नऊ मिनिटांनी ‘ईगल’ चंद्रावरील ‘सी ऑफ ट्रँक्विलिटी’ या पूर्वनियोजित जागेवर हळुवारपणे उतरले तेव्हा अवघे २५ सेकंदांचे इंधन शिल्लक राहिले होते. म्हणजे चंद्रावर उतरायला अर्ध्या मिनिटाचा जरी उशीर झाला असता तरी ‘ईगल’ चंद्रावर आदळून अंतराळवीरांवर मृत्यूचा प्रसंग ओढवला असता. त्यानंतर सुमारे सहा तासांनी तो ऐतिहासिक क्षण आला- ज्याची सबंध जग श्वास रोखून वाट पाहत होतं. ‘ईगल’चा दरवाजा उघडून शिडीच्या नऊ पायऱ्या उतरून नील आर्मस्ट्राँग या पृथ्वीवासीयाचे पहिले पाऊल चंद्राच्या भूमीवर पडले. त्याचे त्यावेळचे उद्गार होते : ‘माणसाचे एक छोटे पाऊल.. पण मानवजातीची एक प्रचंड झेप!’ हे त्याचे उद्गार अवकाश इतिहासात अमर झाले आहेत.
जगातील लक्षावधी लोकांनी ही घटना टीव्हीवर पाहिली. त्यानंतर ऑल्ड्रिनही आर्मस्ट्राँगला येऊन मिळाला. दोघांनी मिळून २२ तास चंद्रावर घालविले. त्यानंतर ‘ईगल’मधून चंद्रावरून उड्डाण करत त्यांनी कोलंबियाकडे कूच केले. कोलंबियात दोघे परतल्यानंतर ‘ईगल’चा त्याग करण्यात आला आणि तीन अंतराळवीरांसह कोलंबिया पृथ्वीच्या परतीच्या प्रवासाला निघाले. पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करण्याआधी सेवा-घटकाचाही त्याग करून ‘कोलंबिया’ साठ तासांच्या या ऐतिहासिक अवकाश मोहिमेनंतर २४ जुलै १९६९ रोजी हवाई छत्र्यांच्या साह्यने प्रशांत महासागरात सुखरूपपणे उतरले.
आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे तीनच देश चंद्रावर यान उतरविण्यात यशस्वी झाले आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply