अमेरिकन लेखिका पर्ल बक यांचा जन्म २६ जून १८९२ रोजी हिल्सबोरो, वेस्ट व्हर्जिनिया येथे झाला.
पर्ल बक यांचे पर्ल सिडेनस्ट्रिकर बक हे पूर्ण नाव व त्यांचे साई झेंझू हे चायनीज नाव.
पर्ल बक यांचे वडील चीनमध्ये धर्मोपदेशक असल्यामुळे त्यांचे बालपण चीनमध्ये गेले. पर्ल बक यांनीआरंभीचे शिक्षण शांघाय येथे घेतल्यानंतर अमेरिकेत येऊन लिंचबर्ग, वेस्ट व्हर्जिनिया येथील ‘रँडॉल्फ-मॅकन वुमन्स कॉलेज’ मधून १९१४ साली त्या पदवीधर झाली. त्यानंतर त्या चीनला परतल्या व १९१७ मध्ये जॉन लॉसिंग बक ह्या धर्मोपदेशाकाशी त्यांनी विवाह केला. १९२१ ते १९३१ ह्या काळात नानकिंग विद्यापीठात शिक्षिका म्हणूनही त्यांनी काम केले.
ईस्ट विंड, वेस्ट विंड ही पर्ल बक यांची पहिली कादंबरी १९३० मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या द गुड अर्थ (१९३१) ह्या कादंबरीने पर्ल बक यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. भूमीवर प्रेम करणारा वांग लुंग हा कष्टाळू चिनी शेतकरी आणि त्याची बायको ह्यांची ही वास्तववादी कहाणी बायबलसारख्या साध्या, सोप्या शब्दात बक यांनी मांडली होती. १९३२ मध्ये या कादंबरीला ‘पुलिट्झर पारितोषिक’ मिळाले. १९३४ मध्ये त्या अमेरिकला आल्या व त्यांनी आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि १९३५ मध्ये रिचर्ड जे. वॉल्श. ह्या प्रकाशकाशी त्या विवाहबध्द झाली. १९३२ ते १९३५ ह्या काळात सन्स आणि ए हाऊस डिव्हाय्डेड अशा दोन कादंबऱ्या तिने लिहिल्या. द गुड अर्थचेच कथासूत्र ह्या कादंबऱ्यांत पुढे चालविलेले आहे तथापि ह्या कादंबऱ्यांत द गुड अर्थचा जोम आणि प्रभावीपणा दिसून आला नाही. अमेरिकन पार्श्वभूमीवरही पर्ल बक यांनी कथा-कादंबऱ्या लिहिल्या परंतु त्या फारशा यशस्वी ठरल्या नाहीत.
बक यांनी आपल्या वडिलांचे (द फाय्टिंग एंजल, १९३६) आणि आईचे (द एक्झाइल, १९३६) चरित्रही लिहिले आहे. माय सेव्हरल वर्ल्ड्स (१९५४) आणि ब्रिज फॉर पासिंग (१९६२) ही पर्ल बक यांची आत्मचरित्रात्मक पुस्तके होत. १९३८ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक तिला देण्यात आले.
पर्ल बक यांचे ६ मार्च १९७३ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply