वीक एन्ड आला. एक शॉर्ट ट्रिप करण्याचे ठरले. सॅन अँटोनियो.
“किती लांब आहे?” मी विचारले.
“काही नाही, तीन साडेतीन तासाच्या ड्राइव्हवर आहे.” मुलगा म्हणाला. या अमेरिकेत प्रवासाचे अंतर मैल किंवा किलोमीटरवर कधीच मोजत नाहीत. किती वेळ लागेल यावर मोजतात!
हल्लीची मुलं खूप छान ट्रिप मॅनेज करतात, याचे प्रत्यंतर या वेळेसही आले.
मुलाने प्रवासासाठी सात सीटर दांडगी गाडी भाड्याने घेतली होती. पेट्रोल टाकी फुल! गाडी परत करताना टाकी फुल करून द्यावी लागती म्हणे.
दुपारी निघालो.अपेक्षे पेक्षा उशीर झाला होता. ऑन लाईन, दुपारच्या जेवण्यासाठी, वाटेतील एका रेस्टोरेंट मध्ये ऑर्डर देऊन ठेवली होती. दीड तासाच्या अंतरावर ते हॉटेल होते. त्या हॉटेलच्या डिलेव्हरी विंडोतून आमच्या खाण्याचे पार्सल, गाडीतून न उतरता घेतले. येथे हि सोय आहे. आम्हाला अश्या गोष्टी नवीनच! आमच्या हॉटेलात लंच टाईमला दिलेली ऑर्डर डिनरला सर्व्ह होते!
एका भव्य इमारती जवळ मुलाने गाडी उभी केली, तेव्हा संध्याकाळचे साडेपाच झाले होते.
“म्युझियम आहे का?” मी त्या इमारती कडे पहात विचारले.
मुलाने फक्त माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. माझा प्रश्न बावळट्पणाचा होता, मला जाणवले.
काही क्षणात हे सिद्धहि झाले! ते हॉटेल होते, आणि आमचा आजचा मुक्काम तेथेच होता.
आम्ही चार मोठे, अधिक दोन लहान असे एकंदर सहा जण, एक रूम पुरणार नव्हती, दोन घेतल्यात का? उगाच डोक्यात किडा वळवळत होता. सामनासगट आम्ही जेव्हा आमच्या रूम मध्ये आलो त्यावेळेस मला दुसरा धक्का बसला. ती ‘रूम’ म्हणजे, टू बी.यच.के.चा वेल फ़र्निशश्ड फ्लॅट होता! हो किचन पण होत! गॅस, ओव्हन,फ्रीझ आणि भांड्या सगट! जेवण बाहेर करा किंवा घरात शिजवून खा!
आणि संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही ‘रिव्हर वॉक’ साठी बाहेर पडलो. डिसेम्बरचा महिना होता. भन्नाट लाईटिंगने गाव सजल होत. ख्रिसमस ओसंडून वहात होता. येथल्या लाईटिंगची एक गोष्ट मला खूप भावली, ती म्हणजे हि लाइटिंग झगझगाटाची नव्हती, नेत्रसुखद होती!
या गावात एक नदी वाहते. तिच्या दोन्ही तीरावर छान शॉपिंग दुकान आणि खूप हॉटेल्स आहेत. नदीत बोटिंगची सोय आहे. बोटीत एक राऊंड नदीतून मारून आणतात. बोटीत बसून तीरावरल्या हॉटेलातील ‘रंगीत लोकांची’ गर्दी पहाताना माणूस (किमान मी तरी) त्यात हरवून जातो. पट्टेरी छत्री खाली बसून वाईन आणि सॅन्डविचचे आस्वाद घेणारे वृद्ध जोडपे, जग विसरून निग्रो तरुणाच्या खांद्यावर डोके ठेवून विसावलेली गोरी परी, आणि असं खूप सार, त्रयस्थपणे पहात होतो.
येथे ‘लघुशंकेची’ खुलेआम कोठेच सोय नाही. मॉल किंवा हॉलटेलात ती असते. बोटिंग फिटिंग एन्जॉय करून झाले होते. मी मुलाला माझी करंगळीवाली अडचण सांगितली. आता जेवायला जाऊ तेथे करा!(मराठी भाषा म्हणजे कठीण!) म्हणाला. एका रेस्तोरा मध्ये आमच्या कुटूंबाची वरात घुसली.
“बाबा तुम्हाला काय घ्यायचंय?” आमचे चिरंजीव, माझी गोची करण्यात पटाईत आहेत. इतर सगळे गुण सोडून, दोन्ही पोरांनी हा ‘गोची’ गुण आईकडून बरोबबर उचललाय. आता मला त्या रेस्ताराच्या शोकेस मधले सगळे पदार्थ नावाने आणि चवीने अगम्य, अन त्यात मी काय सिलेक्ट करणार? डोम्बल! पण चार चौघात बोलायची सोय नसते. मला माहित असलेला एकमेव पदार्थ- चिकोट्ले -दिला सांगून. चिकोटले म्हणजे एक डाव भात,(या पुढे एक डाव कॉमन!) काळे बीन्स, दही. परतलेले कांद्याचे काप, टमाटो, अन वर फ्रेश क्रीम! अजूनही बरच काही काही घालतात पण मला जेव्हड ओळखीचं होत तेव्हडाच सांगितलं. झाले चेकोटलें! माझी आवड सांगून मी ‘ती’ जागा शोधू लागलो. एका कोपऱ्यात ‘बाथरूम’ दिसले. मागचा पुढचा विचारन करता दाराच्या हॅण्डलला हात घातला. उघडेना! मी समोरच्या इंडिकेटरकडे पहिले. ‘व्ह्याकन्ट’ दाखवत होते. मी हँडलकडे नजर टाकली अन उलघडा झाला! त्या दाराला डिजिटल लॉक होते! आणि खाली सूचना होती ‘या लॉकचा कोड तुमच्या रिसिटच्या मागे आहे!’ फुकट्यांचा वापर टाळण्यासाठी केलेली हि आयडिया मला भन्नाट आवडली. चतुर लोक, फक्त पुण्यातच आहेत असे नाही!
आम्ही बोटिंगची तिकिटे काढली, तेव्हा जेष्टांसाठी असलेला डिस्काउंट घेतला. येथे बरेच ठिकाणी जेष्ठ व्यक्तींसाठी सवलती आहेत. काही कॉफी शॉपमध्ये दहा टक्के, पिझ्झावर पंधरा ते वीस टक्के, असेच फुटकळ डिस्काउंट पहायला मिळाले. पण कोठेही, कोणीही वयाचा दाखला मागितला नाही. आपल्याकडेहि सूट देतात, वयाचा पुरावा देऊनहि संशयानेच पहातात. ‘मी जेष्ठ आहे.’ हे एकदा जाहीर केल्यावर तेथे विश्वास ठेवला जातो. आपल्याकडे ती सोय नाही! अस्तु.
(क्रमशः)
सु र कुलकर्णी.
Leave a Reply