आरवाईन जवळ लेकफॉरेस्ट भागात अनुपने-माझ्या मुलाने सुमारे दोन वर्षांपूर्वी घर विकत घेतले. त्याच्या दोन्ही बाजूंना अमेरिकन कुटुंबं होती. त्यापैकी उजवीकडे एक म्हातारे जोडपे. या भागात अनेक बंगल्यांमधून म्हातारी माणसंच राहातात. त्यांची मुलं नोकरीच्या निमित्ताने दुसरीकडे राहायला गेलेली असतात. ती अधून मधून आपल्या आईवडिलांकडे येतात.
म्हाताऱ्या जोडप्यापैकी ग्रहस्थ ७५ वर्षांच्या पुढच्या वयाचे. ते घराच्या पुढच्या किंवा मागच्या भागात काही ना काही काम करीत असायचे. प्रकृतीने ते तसे धट्टेकट्टे होते. उत्साही होते आणि कोणतेही काम ते स्वत: करण्यात आनंद मानीत असत.
आमच्याकडे आलेल्या माळ्याने घराच्या मागच्या भागात असलेल्या झाडांची अवाजवी झालेली वाढ एकदा कापली. तेव्हा काही फांद्या शेजारच्या आजोबांच्या हद्दीत पडल्या. माळ्याच्या नजरेतून ही बाब निसटली. मात्र त्या आजोबांच्या ती लक्षात आली. त्यांनी तो सारा कचरा गुपचूपपणे आमच्या अंगणात टाकला. एरवी ते दिवसभर काही ना काही काम करताना दिसत. क्वचित कारणपरत्वे बोलत असत. आमच्या घराच्या पुढील भागातील लॉनची छाटणी बऱ्याच दिवसात झाली नव्हती. त्यामुळे तिथे गवत वाढले होते. तेव्हा त्यांनी त्यासंबंधी माझ्या मुलाला जाणीव करून दिली होती. एरवी ते कधी दिसले तर अमेरिकनांच्या स्वभावानुसार ‘गूड मॉर्निंग’ म्हणत. मात्र त्यांची पत्नी केव्हाच बाहेर दिसत नसे. वार्धक्याने ती पुरेपूर थकली होती. अलिकडल्या भेटीत मला ते गृहस्थ काही दिसले नाहीत. त्यांच्या मुलांनी त्या दोघांना वृध्दाश्रमात हालवल्याचे आणि बंगला विकल्याचे समजले. त्यांचा आणि आमचा तसा संबंध नव्हता. पण मानवी मन इथूनतिथून सारखेच संवेदनशील असते. ते यापुढे इथे आपल्याला दिसणार नाहीत या विचाराने मनाला मात्र चुटपूट लागून राहिली..
अमेरिकन जीवनशैलीत ते अपरिहार्यच होते.
— डॉ. अनंत देशमुख
(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)
Leave a Reply