नुकताच घडलेला हा किस्सा आहे. अमेरिकेतून परत येताना मला सेओलच्या विमानतळावर एक मराठी गृहस्थ भेटले. त्यांनी आपणहून माझी ओळख करून घेतली. चांगले ‘कोकणस्थ ब्राह्मण’ होते. सहा महीने अमेरिकेतील मुलीकडे राहून परत निघाले होते. ते कोणत्यातरी खासगी बँकेत नोकरीला होते व ती बँक आर्थिक संकटात सापडल्यामूळे त्या बँकेचे एका सार्वजनीक बँकेत विलिनीकरण झाले होते. त्यांच्या पत्नीचा टि. व्ही. वर जे ‘रिऍलिटी शोज’ चालतात त्याच्याशी काहीतरी संबंध होता. त्यांनी ही माहीती मी विचारलेले नसताना सुद्धा सांगून टाकली. कदाचीत मला इम्प्रेस करण्याचा त्यांचा विचार असावा. एका मराठी टी.व्ही. च्यानलवर लहान मुलांच्या गाण्याचा एक रिऍलिटी शो दाखवला होता तो बराच लोकप्रीय झाला होता. या शोशी त्यांच्या पत्नीचा कांहीतरी संबंध होता. त्या शोमध्ये ज्या मुलीला प्रथम पारितोषीक मिळाले ते कसे वशील्याने व पैसे चारून मिळाले, परिक्षक पण कसे भ्रष्ट निघाले. (खरे म्हणजे हा रिऍलिटी शो मी बघीतला होता व जिला प्रथम पारितोषीक मिळाले ती मुलगी माझ्या मते यासाठी योग्य होती) त्यांच्या बँकेतल्या अधिकार्यांमनी भ्रष्टाचार करून कर्जे कशी दिली व बँकेला कसे बुडवले या गोष्टी ते सेओलच्या विमानतळावर मला अगदी साग्रसंगीतपणे सांगत होते. सांगताना त्यांचा चेहेरा असा काही आनंदाने फुलला होता व ‘आपण काहीतरी फार मोठे गुपीत सांगत आहोत’ असा जो भाव त्यांच्या चेहेर्या वर उमटला होता तो खरोखरच पहाण्यासारखा होता. सेओलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर( सेओल दक्षीण कोरियाची राजधानी. त्याला ‘इंचियॉन (Inchion) पण म्हणतात) सांगायच्या या गोष्टी होत्या का? पण त्यांनी मला पाऊण तास तरी पिळलेच. मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की सहा महीने अमेरिकेत राहून त्यांना अमेरिकेतले काहीच कसे आठवत नाही? बरे ही त्यांची अमेरिकेतली तिसरी ट्रीप होती. याचा अर्थ असा की ते शरीराने अमेरिकेला आले असले तरी मनाने मात्र भारतातील भ्रष्टाचाराच्या चिखलात व दलदलीतच अडकलेले होते. ते जेव्हा भारतात परत जातील तेव्हा त्यांना अमेरिकेतल्या आठवणी येतील. मला अमेरिकेत भेटलेल्या बहुतेक मराठी लोकांचा हाच अनुभव आहे. ते शरीराने व मनाने अमेरिकेत कधीच येत नाहीत. अमेरिकेत येताना मन भारतात ठेवतात व भारतात परत आल्यावर मन मात्र अमेरिकेत ठेऊन येतात. ते शरीर आणि मन एकत्र घेऊन कधीच फिरत नाहीत.
फार पूर्वी माझे एक जवळचे नातेवाईक दत्तोपंत पहिल्यांदा अमेरिकेला त्यांच्या मुलाकडे जाऊन आले तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी अमेरिकेचे फारच वेगळे चित्र माझ्यासमोर उभे केले होते. ‘अहो! अमेरिका म्हणजे प्रचंड महाग!’
दत्तोपंत सांगत होते , ‘अहो नुसत्या चहा किंवा कॉफीच्या कपाला 70 रुपये लागतात.(त्यावेळी आपल्याकडे 1 रुपयात चहा व 5 रुपयात उत्तम कॉफी मिळत होती), बाहेर जेवायला गेलात तर कमीत कमी 300 ते 400 रुपये लागतात (त्यावेळी पुण्यात 20 रुपयांमध्ये पोटभर राईस प्लेट मिळत होती). कंटींगला 400 रुपये लागतात (त्यावेळी 10 रुपयांत कटींग व्हायची). काय चाटायचय त्या अमेरिकेला? नुसता चकचकाट व भगभगाट. बोलायला एक माणूस मिळत नाही. अमेरिका म्हणजे तुरुंग आहे तुरुंग! तुम्ही शहाणे असाल तर अमेरिकेत पाऊल टाकू नका!’ पण हेच दत्तोपंत पुढे अनेक वेळा अमेरिकेला जाऊन आले ही गोष्ट वेगळी.
अमेरिकेत येणारी मंडळी 1 डॉलर म्हणजे 60 रुपये असा हिशोब डोक्यात ठेऊनच येतात व अमेरिकेत आल्यावर डॉलरमधल्या किंमतींचे भारतीय रुपयात रुपांतर करत बसतात. त्याला मी ‘कन्व्हर्जन फोबीया’ म्हणतो. आता 1 डॉलर म्हणजे 1 रुपया असा हिशोब धरला तर काय फरक पडतो ते बघूया
अमेरिकेत 1 डॉलरला (म्हणजे 1 रुपयाला) जेवढा ब्रेड मिळतो त्यांच्या निम्यापेक्षा कमीच व निकृष्ट प्रतीचा ब्रेड आपल्याकडे कमीत कमी 20 रुपयात मिळतो.
अमेरिकेत साधारणपणे 2.5 ते 3 डॉलर (म्हणजे 2.5 ते 3 रुपये) 1 गॅलन, म्हणजे 4.5 लिटर पेट्रोल (ज्याला अमेरिकेत ‘गॅस’ म्हणतात) मिळते. आपल्याकडे पेट्रोलचा भाव 65 रुपये लिटर आहे.
अमेरिकेत साधारणपणे 3 ते 4 डॉलरला (म्हणजे 3 ते 4 रुपयात) 1 गॅलन (म्हणजे 4.5 लिटर) दूध मिळते. आपल्याकडे अर्धा लिटर गाईच्या दूधाला 20 रुपये पडतात.
अमेरिकेत साधारणपणे 10 डॉलरमध्ये (म्हणजे 10 रुपयात) उत्तम भारतीय जेवण मिळते. याच जेवणाला आपल्याकडे कमीत कमी 200 ते 300 रुपये लागतात.
अमेरिकेत कटिंगला सर्वसाधारणपणे 8 ते 10 डॉलर्स (म्हणजे 8 ते 10 रुपये) लागतात. आपल्याकडे कटींगचा दर 70 रुपये आहे.
त्यामूळे 1 डॉलर म्हणजे 1 रुपया हा हिशोब डोक्यात ठेऊन वावरले तर अमेरिका फार महाग वाटत नाही.
एक काळ असा होता की त्या वेळी अमेरिकेत जाणे हे अप्रुप वाटायचे. पण आता तशी परिस्थिती राहीलेली नाही. अनेक मराठी मंडळी हल्ली अमेरेकेत येऊ लागली आहेत व ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमेरिकेत येणारे तीन प्रकारचे लोक असतात असे मला आढळून आले आहे. पहिला प्रकार म्हणजे विद्यार्थी किंवा स्टुडन्ट्स. दुसरा प्रकार म्हणजे लग्न होऊन अमेरिकेत आलेल्या मुली व तिसरा प्रकार म्हणजे या मुलांचे किंवा मुलींचे आईबाप किंवा सासु सासरे. यामध्ये जी तरूण मुले अमेरिकेत येतात ते तेथील वातावरणाशी जुळवून घेतात. खरी पंचाईत होते ती तेथे येणार्यात सिनिअर सिटिझन्सची किंवा ज्येष्ठ नागरीकांची!
भारतात हिन्दु, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, मारवाडी, गुजराथी, मराठी, कानडी, तेलगू, मल्याळम, तामीळ, बंगाली, जाट, शिख, उत्तर भारतीय लोक रहातात पण एकही भारतीय रहात नाही असे ज्युझीलंडहून आलेल्या एका टुरिस्टने नमुद करून ठेवलेले आहे. येत्या 15 ऑगस्ट 2016 रोजी भारताला स्वातंत्र मिळून 70 वर्षै होतील. पण अजुनही खर्याा अर्थाने भारतीय लोक अजुन पैदा झालेले नाहीत. अमेरिकेत पण याचे प्रत्यंतर दिसते. अमेरिकेत जरी अनेक भारतीय एकत्र जमत असले व ‘मिनी इंडीया’ चे रुप दिसत असले तरी यात भाषेप्रमाणे ग्रूप पडतातच य यामध्ये मराठी लोक आघाडीवर असतात. तसेच भारताला नावे ठेवणे हा या लोकांचा आवडता उद्योग असतो. भारतामध्ये ज्याप्रमाणे मराठी माणूस ‘आधी मराठी व मग भारतीय’ असतो तसाच तो अमेरिकेतही असतो. अमेरिकेमध्ये सुद्धा टेक्सासमधला माणूस स्वतःला ‘टेक्सॅसियन’ म्हणतो, न्युयॉर्कमधला माणूस ‘न्युयॉर्कर’ म्हणतो, कॅलिफोर्निया मधला माणूस ‘कॉलिफोर्नियन’ म्हणतो. पण ते आधी ‘अमेरिकन’ असतात व मग ‘टेक्सासन, न्युयॉर्कर, कॅलिफोर्नियन’ असतात. तसेच अमेरिकेत स्वतःच्या देशाला नांवे ठेवणे म्हणजे स्वतःच्या आईला नावे ठेवण्यासारखे समजतात. आपल्याकडील लोक भारताला नांवे ठेऊन भारताला वाईट देश ठरवायला मागे पुढे पहात नाहीत. पण अमेरिकेमध्ये सुद्धा अनेक अमस्या असुनही कोणी अमेरिकन अमेरिकेला वाईट देश ठरवत नाही. अमेरेकेत जाणार्यास मराठी लोकांनी एक लक्षात ठेवावे की आपण जेव्हा अमेरिकेत किंवा परदेशात जातो तेव्हा आपण भारताचे ‘अँबॅसॅडर’ असतो. भारताची प्रतिमा बिघडवणे किंवा सुधारणे आपल्या वागणूकीवर अवलंबून असते. भारताची प्रतीमा सुधारण्याचे काम फक्त भारत सरकारचे किंवा नरेन्द्र मोदी यांचे नाही. पण बर्यासच मंडळींना हे भान रहात नाही.
मी अजून एक प्रकार बघीतला तो म्हणजे नावे ठेवण्याचा. येथे येणारी बहुतेक सिनियर सिटिझन मराठी मंडळी भारताला नावे ठेवण्यात तरबेज असतात. त्यात त्यांना काही कमीपणा वाटत नाही. कारण भारताना नावे ठेवण्यासाठी प्रवृत्त करणारी अनेक दृष्ये त्यांना डोळ्यांनी दिसत असतात. भारतात रस्त्याच्या कडेला उभे राहून लघवी करणारे, रस्त्यात थुंकणारे, कचरा टाकणारे, वाहतुकीचे नियम मोडून भरघाव व बोदरकारपणे वाहने चालवणारे जागोजागी दिसतात. भ्रष्टाचार, बलात्कार, फसवाफसवी, खून अशा बातम्यांचे पेव फुटलेले असते. पण अमेरिकेत तसे काहीच आढळून येत नाही. तेथे रस्त्याच्या कडेला उभे राहुन लघवी करणारा माणूस दिसत नाही. रस्त्यात थुंकणारा व कचरा टाकणारा माणूस सापडत नाही. सगळेजण वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळत गाड्या चालवत असतात. भ्रष्टाचार, बलात्कार, फसावाफसवी, खून अशा सारख्या बातम्यांचे फारसे पेव फुटलेले दिसत नाही. थोडक्यात अमेरिकेला नावे ठेवावी असे काही दिसत नाही किंवा आढळत नाही. मग या लोकांची पंचाईत होते. त्यामूळे हे लोक अमेरिकन संस्कृतीवर घसरतात. अमेरिकन संसकृती कशी वाईट आहे, कुटुंब संस्था कशी मोडकळीला आली आहे, डायव्होर्सेस कसे होत असतात, एका बाईची तीन तीन लग्ने कशी होतात तर पुरुषांना चार चार गर्ल फ्रेन्ड्स कशा असतात, लैंगीक स्वैराचार कसा बोकाळलेला आहे हे सांगत बसतात व अमेरिका म्हणजे वाह्यात बायकांचा व लिंगपीसाट पुरुषांचा देश आहे असे विकृत चित्र निर्माण करण्यामध्ये धन्यता मानत बसत1त. खरे म्हणजे लग्न, मुले हा प्रत्येक व्यक्तीचा अत्यंत खासगी व वैय्यक्तीक प्रश्न असतो. यामध्ये इतरांनी बुचकायचे काहीच कारण नसते. तसेच अपण आपल्या संस्कृतीबद्दल अभीमान बाळगणे ही गोष्ट जरी चांगली असली तरी इतर देशांमधीला, विशेषतः अमेरिकेमधील संस्कृती वाईट ठरवण्याचा अधीकार आपल्याला कोणी दिला?
अता भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे हेणार आहेत. याचा भारत आता सिनियर सिटिझन कॅटेगरीत आला आहे. सिनियर सिटिझन्स हे जास्त मॅच्युअर असतात असे समजले जाते. ही मॅच्युरिटी आता अमेरिकेत येणार्यास मराठी सिनियर सिटिझन्सनी दाखवणे आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी आता तरी त्यांनी ओळखायला हवी.
या 15 ऑगस्टच्या निमित्ताने ‘मी आधी भारतीय आहे व मग मराठी आहे’ ही भावना जरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ठासवली गेली तरी सार्थक झाले असे म्हणता येईल.
तुम्हाला काय वाटते?
— उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
Leave a Reply