पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते. नंतरच्या काळात ते हळूहळू एकमेकांपासून वेगळे झाले. अशा प्रकारचं, पृथ्वीवरच्या विविध भूभागांचं एकत्र असणं आणि त्यानंतर त्यांचं वेगळं होणं, हे पृथ्वीच्या इतिहासात एकदा नव्हे तर, किमान तीनवेळा तरी घडलं आहे. सुमारे दीड अब्ज वर्षांपूर्वीचा कोलंबिआ महाखंड, सत्तर-ऐंशी कोटी वर्षांपूर्वीचा रोडिनिआ महाखंड, वीस-तीस कोटी वर्षांपूर्वीचा पँजिआ महाखंड, ही भूतकाळातल्या एकसंध महाखंडांची उदाहरणं आहेत.
भूभागांचं हे एकत्र येणं आणि दूर जाणं, चक्राकार पद्धतीनं घडत आलं आहे. या प्रत्येक चक्राचा कालावधी सुमारे साठ कोटी वर्षांचा आहे. या अगोदर तीस कोटी वर्षांपूर्वी सर्व भूभाग हे जसे पँजिआ महाखंडाच्या स्वरूपात एकत्र आले होते, तसेच सुमारे तीस कोटी वर्षांनंतरही ते पुनः एकत्र येऊन, त्यांचा महाखंड बनण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. हा महाखंड निर्माण होण्याची क्रिया कशी असेल, निर्माण झाल्यानंतर या खंडाचा आकार कसा असेल, हा भूशास्त्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. यासंबंधी वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या गेल्या आहेत. काही संशोधकांनी या भविष्यातल्या महाखंडाला ‘अमेशिआ’ असं नावही दिलं आहे. या महाखंडाची निर्मिती कशी होईल व त्याचा आकार कसा असेल, याचा अंदाज बांधण्याचा एक प्रयत्न, ऑस्ट्रेलिआतल्या कर्टिन विद्यापीठातील चुआन हुआंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. संगणकीय प्रारूपावर आधारलेलं हे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन ‘नॅशनल सायन्स रिव्ह्यू’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
पृथ्वीचा पृष्ठभाग हा विविध भूपट्टांपासून तयार झाला आहे. स्वतंत्र खंडांपासून महाखंडाची निर्मिती होणं, तसंच या महाखंडाचे छोट्या भूभागांत तुकडे होणं, या क्रिया भूपट्टांच्या हालचालींमुळे घडून येत असतात. भूपट्टांच्या हालचालींदरम्यान काही ठिकाणचे भूभाग सरकत असतात, काही ठिकाणचे भूभाग उचलले जातात, तर काही ठिकाणचे भूभाग खचत असतात. महाखंडाची निर्मिती ही भूपट्टांच्या अशा हालचालींमुळेच, परंतु तीन प्रकारे होऊ शकते. पहिला प्रकार हा भूभागांच्या आजच्या हालचालींशी थेट निगडित आहे. आज अमेरिका आणि युरोप हे भूभाग एकमेकांपासून दूर जात आहेत. तसेच ते यापुढेही एकमेकांपासून दूर जात राहतील व त्यामुळे अमेरिका आणि आशिआ या दरम्यान असणारा प्रशांत महासागर हा मात्र आकसत जाईल. अखेर उत्तर अमेरिका आणि आशिआ एकमेकाला भिडतील व एका महाखंडाची निर्मिती होईल. (हा भविष्यातला महाखंड अमेरिका आणि आशिआपासून निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळेच, त्याला अमेशिआ म्हटलं गेलं आहे.) दुसऱ्या एका शक्यतेनुसार अमेरिका आणि युरोप या भूभागांचं, आजचं एकमेकांपासून दूर जाणं काही काळानंतर थांबेल आणि ते पुनः एकत्र येऊ लागतील. या प्रकारात अटलांटिक महासागराचा आकार लहान होत जाईल व त्यानंतर अमेरिका आणि युरोप हे भूभाग एकत्र येऊन एकमेकांना जोडले जातील. तिसऱ्या, अलीकडेच व्यक्त केल्या गेलेल्या आणखी एका शक्यतेनुसार, अमेरिका आणि युरोप-आशिआ खंड उत्तर ध्रुवाच्या दिशेनं सरकत जाऊन, अखेर उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशात ते एकत्र येऊ शकतात. या तीन प्रकारांपैकी कुठला प्रकार प्रत्यक्ष घडून येण्याची शक्यता अधिक आहे, ते भूभागांच्या भविष्यातील हालचालींवर अवलंबून असेल. भूभागांच्या या भविष्यातल्या हालचाली पर्यायानं भूभागांखाली निर्माण होणाऱ्या ताणावर अवलंबून असतील.
भूभागांची भविष्यातील हालचाल जाणून घेण्यासाठी, चुआन हुआंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगणकीय प्रारूपाचा वापर केला आणि विविध घटकांमुळे भूभागांवर निर्माण होणाऱ्या ताणाचा व त्यामुळे होणाऱ्या भूभागांच्या हालचालींचा अभ्यास केला. महासंगणकाद्वारे केलेल्या या अभ्यासात, पृथ्वीच्या शिलावरणाची आणि कवचाची विविध ठिकाणची जाडी, त्यांची घनता, त्यांचा घट्टपणा, त्यांच्या रासायनिक रचनेचं स्वरूप, त्यांतील उष्णतेचं प्रमाण, इत्यादी घटकांचा समावेश होता. या सर्व अभ्यासावरून, या संशोधकांना महाखंडाच्या निर्मितीचं संपूर्ण चक्र समजू शकलं. महाखंडाच्या निर्मितीमागच्या विविध शक्यताही या संशोधनात तपशीलवार अभ्यासल्या गेल्या. त्यांच्या या संशोधनानं, नव्यानं निर्माण झालेल्या समुद्रांपेक्षा प्राचीन समुद्र हे लवकर नष्ट होत असल्याचं दाखवून दिलं. प्रारूपाद्वारे मिळालेल्या या सर्व माहितीची त्यांनी आजच्या परिस्थितीशी सांगड घातली. आणि त्यावरून, अतिप्राचीन असणाऱ्या प्रशांत महासागराचं अस्तित्व हे लवकर संपुष्टात येणार असल्याचं, त्यांना स्पष्टपणे दिसून आलं!
प्रशांत महासागर हा पँथालॅस्सा या अतिविशाल, अतिप्राचीन महासागराचा मागे राहिलेला भाग आहे. सत्तर कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला हा पँथालॅस्सा महासागर, पँजिआ महाखंड फुटू लागल्याच्या सुमारास म्हणजे वीस कोटी वर्षांपूर्वीच्या काळात, विविध भूभागांतील बदलांमुळे आकसू लागला. आज सुमारे दहा हजार किलोमीटर रुंदी असलेला हा समुद्र – म्हणजेच आजचा प्रशांत महासागर – वर्षाला काही सेंटिमीटर या गतीनं आता आकसतो आहे. चुआन हुआंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, हा महासागर यापुढेही असाच आकसत जाऊन, सुमारे तीस कोटी वर्षांनंतर नाहीसा होणार आहे. याच काळात, उत्तर अमेरिका आणि आशिआ हे आजचे खंड एकमेकांच्या दिशेनं सरकत राहून अखेर एकत्र येणार आहेत. याच्याशी संबंधित एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, अमेरिका आणि आशिआ हे खंड एकत्र येण्याच्या अगोदरच ऑस्ट्रेलिआ खंड हा आशिआ खंडाला जाऊन चिकटलेला असेल! तसंच अंटार्क्टिक समद्रसुद्धा नाहीसा झालेला असेल आणि अंटार्क्टिका खंड हा वरच्या बाजूला सरकून, या नव्या महाखंडाचाच भाग झाला असेल. हा नवनिर्मित ‘अमेशिआ’ महाखंड पृथ्वीच्या मध्यभागावर, म्हणजे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असेल.
चुआन हुआंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनानुसार, या महाखंडामुळे पृथ्वीवरील भूभागाचा नकाशा अर्थातच पूर्णपणे बदलेला असेल. पृथ्वीवरची सर्व जमीन ही या महाखंडावरच असेल. या सर्व बदलांदरम्यान सभोवतालच्या समुद्राची पातळीसुद्धा खाली जाणार आहे. या महाखंडाचा अंतर्भाग, म्हणजे किनाऱ्यापासून आतला प्रदेश, हा अत्यंत शुष्क असेल; तसंच या अंतर्भागातील तापमानात दिवसभरात मोठे बदल होतील. अशा वैशिष्ट्यपूर्ण महाखंडावरची, त्यावेळची जीवशास्त्रीय परिस्थिती नक्की कशी असेल, हे सांगणं कठीण आहे. हा नवा महाखंड निर्माण होण्याची शक्यता जरी पूर्वीच वर्तवली गेली असली, तरी संशोधकांना या नव्या महाखंडाच्या निर्मितीबद्दल तपशीलवार स्वरूपाची फारशी माहिती नव्हती. चुआन हुआंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनामुळे मात्र आता, या महाखंडाच्या भविष्यातल्या निर्मितीच्या शक्यतेवर तर शिक्कामोर्तब झालं आहेच, परंतु त्याचबरोबर या ‘अखंड खंडा’च्या निर्मितीतले विविध टप्पेही स्पष्ट झाले आहेत.
(छायाचित्र सौजन्य – Curtin University / Florida Museum)
Leave a Reply