रेडिओचा आवाज अमीन सयानी यांचे २१ फेब्रुवारी २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यांचा जन्म. दि. २१ डिसेंबर १९३२ रोजी मुंबई येथे झाला.
अमीन सयानी यांचा अल्पपरिचय.
बहनो और भाइयो नमस्कार, आदाब, सतश्री अकाल,
मैं आप का दोस्त अमीन सायानी
आज जो गीत पेश करने जा रहा हूँ
बहनो और भाइयो
वो गीत बिनाका गीतमाला की
पहली पायदान पे पहुँच गया है
तो बहनो और भाइयो
तैयार हो जाये
दिल थाम के बैठिये
,,जिसे लिखा है,हमारे
श्री आनंद बक्शी जी ने
संगीत से सवारा है
लष्मीकांत प्यारे लाल जी ने
,आवाज़ के जादूगर
हमारे प्यारे श्री,,मोहम्मद रफ़ी साहब
तो लीजिये गीत पेश ऐ खिदमत है
पिक्चर का नाम है,,,,,फ़र्ज़,,, गेली कित्येक वर्ष ‘सोनेरी आवाजाचा जादूगार’ म्हणून सुपरिचित असलेले ख्यातनाम रेडिओ निवेदक अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करीत असत.
एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करत असे. अमीन सयानी यांनी रेडिओ सिलोन आणि त्यानंतर विविध भारतीच्या माध्यमातून आपल्या जादुई आवाजानं श्रोत्यांच्या मनावर पाच दशकं अधिराज्य गाजवलं. त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम अगदी घराघरात मोठ्या उत्सुकतेनं ऐकला जायचा. श्रोते ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहायचे. ”बहनों और भाईयों,” ही अमीन सयानी यांच्या खर्जातल्या आवाजातली साद ऐकली की श्रोते अक्षरशः आपल्या रेडिओसमोर सरसावून बसत. अमीन सयानी यांनी संगीतरसिकांच्या चार पिढ्यांमध्ये स्मरणरंजन (nostalgia) जागा ठेवला.रेडिओ निवेदनाला खऱ्या अर्थाने वलय प्राप्त करुन देणाऱ्या अमिन सयानी यांनी आपल्या निवेदनाच्या कलेने देश-विदेशातले स्टेज शोज सुद्धा गाजवले.
अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते. पुढे ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे सभापती झाले. अमीन सायानी यांची आई गांधीजींची शिष्या होती. स्वतंत्र भारताला जो झेंडा भेटरूपाने देण्यात आला होता, त्या झेंडय़ावर स्वातंत्र्य संग्रामात सहभागी शंभर महिलांच्या सहय़ा होत्या. त्यात अमीन सायानी यांच्या आईची सही होती. अमीन सायानी यांचा जन्म गुजराती भाषिक मुस्लिम परिवारात झाला. अमीन सायानी यांचे कच्छी खोजा कुटुंब व्यापार-उद्योगात, समाजकारणात आणि राजकारणातही अग्रेसर होतं. त्यांचे वडील जानू मोहम्मद सायानी व्यवसायानं डॉक्टर होते. त्यांना अमीनसह तीन मुलगे. मुंबईची न्यू इरा शाळा, ग्वाल्हेरचं सिंदिया विद्यालय आणि मुंबईचं सेंट झेव्हियर्स महाविद्यालय, इथं त्यांचं शिक्षण झालं. बंगाली भाषेची आवड असल्यानं तीही ते शिकले. रवींद्र संगीतातली गाणीदेखील ते म्हणायचे. तसंच पंजाबी, पारसी, संस्कृत, उर्दू या भाषादेखील त्यांनी आत्मसात केल्या.अतिशय कमी वयात त्यांनी आपल्या आईच्या ‘रेहबर’ या पाक्षिकात लेख लिहिण्यास सुरुवात केली. देवनागरी, गुजराती आणि उर्दू भाषेत हे पाक्षिक प्रसिध्द होत असे. प्रख्यात दिग्दर्शक विजय आनंद उर्फ गोल्डी हे सायानी यांचे महाविद्यालयीन काळातले मित्र. ते हिंदी नाटकं करायचे. त्यांचं पाहून सायानी यांनीही इंग्रजी आणि उर्दू नाटकं केली. त्यांनी शौकत खानवी या नाटककाराच्या दोन उर्दू नाटकांचं दिग्दर्शन केलं. काही कारणांमुळे त्यांना मुंबईची शाळा सोडून ग्वाल्हेरच्या सिंधीया शाळेत प्रवेश घ्यावा लागला.त्याचवेळी गांधीजींच्या खूनाची बातमी आली आणि त्यांनी राष्ट्रभाषेतच काम करण्याचा निर्णय घेतला.याच वेळी सयानींनी आपला हिंदी उच्चार अजुन चांगला करण्यासाठी सेंट झेवियर येथे प्रशिक्षण सुरु केले होते. एक दिवस ‘ओवलटाईन फुलवारी’ या कार्यक्रमाच्या उद्घोषकाची अचानक तब्येत बिघडल्याने कार्यक्रमासाठी उद्घोषकाची गरज भासली. तेव्हा अमीन सयानी तिथे असताना त्यांना २-३ जाहिराती घोषीत करण्यासाठी विचारले गेले असता कसलाही विचार न करता ते हो म्हटले. यावेळी त्यांनी या जाहिराती अतिशय मोठ्या आवाजात दिल्याने त्यांना हळु आवाजात, न ओरडता घोषणा देण्याचा सल्ला दिला गेला. त्यावेळी रेडिओ सिलोनला असाच कार्यक्रम हिंदी गाण्यांसाठी करण्यात यावा असे अनेक पत्र येत असत. त्यातुनच बिनाका गीतमालेचा जन्म झाला. या कार्यक्रमासाठी उद्घोषक म्हणुन अमीन सयानी यांनी पुढाकार घेतला. आठवड्याला २५ रुपये एवढा पगार त्यावेळी त्यांना दिला जाणार होता.
डिसेंबर १९५२ मध्ये पहिला कार्यक्रम होणार होता. २००-३०० पत्रांची अपेक्षा असताना त्यांना त्यावेळी गाण्याची विनंती करणारे ९००० पत्रं आली. कार्यक्रमाशी निगडीत असलेल्या सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. यातुन काही निवडक पत्रं निवडून बाकी पत्रं पुढच्या भागात घेण्याचा निर्णय घेऊन कार्यक्रम सुरु झाला.
अमीन सायानी यांनी सिनेसंगीताचं सुवर्णयुग रेडिओ सिलोनच्या माईकसमोर बसून अनुभवलं. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सायानी त्याचे अविभाज्य घटक. बिनाका गीतमालाचा इतिहास अमीन सायानी यांना पाठ होता.श्यामसुंदर, खेमचंद प्रकाश, हुस्नलाल भगतराम यांचा जमाना मागे सरला होता. गुलाम हैदर, नूरजहा ही मंडळी पाकिस्तानात निघून गेली होती. नौशाद, सी. रामचंद्र टॉपला येत होते. अमीन सायानी लोकप्रिय गाण्यांचं गणित उलगडून सांगताना म्हणत.
‘‘त्या वेळची परिस्थिती फार वेगळी नव्हती. त्या वेळेस तर गाणी ऐकण्याचे सोर्सेसही खूप कमी होते. गाणी ऐकायची तर सिनेमाला जाऊन बसायचं नाही तर रेडिओ सिलोन ऐकायचं, कारण केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉक्टर बी. व्ही. केसकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सिनेसंगीत वाजवण्यास बंदी घातली होती. त्याचाच फायदा सिलोनला मिळाला. तेव्हा गाणी ऐकण्याकरिता लोक सिनेमाला गेलेच नाहीत तर चांगली गाणी नाहीशी होत. कधी तरी उलटाच प्रकार घडत असे. फिल्मीस्तानचा ‘नागिन’ रिलीज झाला त्याआधी त्याची गाणी बाहेर आली नव्हती; पण गाणी वाजायला सुरुवात झाली आणि लोक ‘नागिन’ पहायला झुंडीने थिएटरवर जाऊ लागले. धीरे धीरे फिल्म हिट हो गयी और गाने भी धूम मचा गये.’’
शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहन पर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना होता. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत अमीन सायानी यांची पर्सनॅलिटी फुलली.‘जी-हाँ बहनो और भाइयो’.. म्हणत सुरुवात करणारी त्यांनी शैली निर्माण केली. नंतर त्यांनी अनेक कार्यक्रम सुध्दा निवेदित केले. ‘मेड फॉर इच ऑदर’ नावाच्या कार्यक्रमात त्यांनी उद्घोषक म्हणुन काम केले. भूत बंगला, बॉक्सर, तीन देविया, कत्ल आणि २०१६ मध्ये रुस्तम सिनेमाच्या उद्घोषकाचे काम त्यांनी केले.अमीन सयानी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी ५४,०००पेक्षाही जास्त रेडिओ कार्यक्रम संबोधीत केले होते.
अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
संकलन.
संजीववेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply