मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध भूमिका करत असलेले अमोल पालेकर यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती.
खरे तर, पालेकर चित्रकार व्हावयाचे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्टची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या अमोल पालेकरांच्या अप्रतिम चित्रांची सात प्रदर्शनेही झाली आहेत. पण, सत्यदेव दुबेंच्या रूपात गुरू भेटला आणि यथावकाश त्यांच्यातील चित्रकार अभिनेत्याच्या रूपात दृढ होत गेला. समांतर रंगभूमीवरील निष्ठा, नैतिकता या दुबेंच्या गुणांचा मनोहारी संगम पालेकरांमध्येही झालेला दिसतो. छबिलदास थिएटर चळवळीचा, किंबहुना समांतर रंगभूमीचा इतिहास लिहिला जाईल; तेव्हा त्यातील एक सुवर्ण पान अमोल पालेकरांच्या नावाने लिहिलेले असेलच!
अमोल पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर “अनिकेत” नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना “मध्यमवर्गीय” माणसाच्या भूमिका मिळत गेल्या.
गोलमाल चित्रपटासाठी त्यांना १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला. मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही. मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे.
दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो. बादल सरकार यांचा मोठा प्रभाव पालेकर यांच्यावर आहे. त्यामुळेच त्यांना बगीचे, गॅरेज, कॅन्टीन, इमारतीची गच्ची अशा एरवी अशक्यव मानल्या जाणाऱ्या ठिकाणी नाटक सादर करण्याची प्रेरणा मिळाली असावी. समांतर रंगभूमी जगविण्यासाठी जे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये पालेकरांच्या या अजोड भूमिकेचीही दखल घ्यावी लागेल.
विजय तेंडुलकरांच्या “शांतता, कोर्ट चालू आहे‘ चे हिंदी रूपांतर “चूप! कोर्ट चालू है‘, मोहन राकेश यांचे “आधे अधुरे‘, गिरीश कार्नाड यांचे “हयवदन‘ या नाटकांतील संस्मरणीय भूमिकांच्या बरोबरीने पालेकरांनी नाट्यदिग्दर्शक म्हणूनही प्रवास सुरू ठेवला होता. बादल सरकार यांचे “वल्लभपूरची दंतकथा‘, “पगला घोडा‘, “जुलूस‘, चिं. त्र्यं. खानोलकरांचे “अवध्य‘, अच्युत वझेंचे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक‘, महेश एलकुंचवारांचे “वासनाकांड‘ आणि “पार्टी‘, अकिरा कुरोसावा यांचे “राशोमान‘, दिवाकरांच्या नाट्यछटांना त्यांनी दिलेले नाट्यरूप, असे पालेकरांच्या नाट्यसाधनेच्या मार्गातील लक्षणीय टप्पे आहेत. फक्त नाट्यगृहापुरती नाटकाची व्याप्ती न ठेवता नाटक थेट लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी केलेले विविध प्रयोगही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply