नवीन लेखन...

अमृत ऊर्जा – डॉ. अमृता नवरंगे – जोशी

डॉ. अमृता नवरंगे – जोशी Ph.D. टोलेडो (ओहायो ) यु.एस. ए.

२ जानेवारी १९९६ ला ज्येष्ठ लेखक विजय तेंडूलकर यांच्या हस्ते आणि नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत बाल कवयित्री मनस्विनी लता रविन्द्र हिच्या ‘आभाळाचे गाणे’ काव्य संग्रह प्रकाशनाचा कार्यक्रम तुडुंब गर्दीत संपन्न झाला. कार्यक्रम संपायला त्यामुळे एकंदरीतच खुप उशिर झाला होता. हा कार्यक्रम जिज्ञासा ट्रस्टच्या शालेय जिज्ञासा या मुलांचा, मुलांनी, मुलांसाठी प्रकाशित होत असलेल्या नियतकालिकातर्फे आयोजित केलेला होता. कार्यक्रमाची सुत्रे शालेय जिज्ञासा संपादक मंडळाकडे म्हणजेच पर्यायाने विद्यार्थ्यांकडे होती. कार्यक्रम संपल्यावर वेळ आली होती ती कार्यक्रमाचा वृत्तांत वृत्तपत्रांकडे पाठवण्याची. कार्यक्रमाचे स्वरूप बघता ही बातमी दुसऱया दिवशी प्रसिध्द होणे आवश्यक होती. ही जबाबदारी अंगावर घेतली ती नुकतीच जिज्ञासा संपादक मंडळात सहभागी झालेली सरस्वती सेकंडरी स्कूलची इ. ८ वीच्या विद्यार्थिनीने. दुसऱया दिवशी लेट सिटी एडिशनमध्ये कार्यक्रमाची बातमी प्रसिध्द झाली होती. सकाळी १०.०० वा. निघणाऱया महानगर या सांय वृत्तपत्राने तर दोन पानी वृत्तांत छापले होते. वृत्तांताच्या खाली नाव होते अमृता नवरंगे, सह संपादक, शालेय जिज्ञासा.

आज अठरा वर्षांनी अमृता नवरंगे डॉ. अमृता नवरंगे – जोशी Ph.D. या नावाने ओळखली जाते. जिद्द-ज्ञान आणि साहस या त्रिसुत्रावर जिज्ञासाची उभारणी झाली असल्याने सहाजिकच इ. ९ वी मध्ये शालेय जिज्ञासाच्या संपादकाची जबाबदारी स्विकारली. पण त्याअगोदर तिने मे महिन्यात जिज्ञासाचे हिमालयन साहस शिबीर ‘अ’ श्रेणी घेऊन पूर्ण केले होता.

१९९६ – १९९७ सालच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत अमृताने सहभाग घेतला होता. परिषदेचा मुख्य विषय होता ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या मुख्य विषय अंतर्गत ‘चलता है नही चलेगा’ या उपविषयावर अमृताने संशोधन प्रकल्प करण्याचे ठरविले. या प्रकल्पात तिच्या सहकारी होत्या अमृता पोंक्षे,पल्लवी गलगले आणि पुनम शिंदे. त्यांच्या प्रकल्पाचा विषय, बेशिस्त पध्दतीने व नियम तोडणाऱया रहदारी करणाऱया वाहन चालकांच्यावर होता. यासाठी त्यांनी कोपरी पूल ते टेलिफोन जंक्शन हा महात्मा गांधी रोडचा भाग निवडला. हा रस्ता निवडण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची शाळा सरस्वती सेकंडरी स्कूल याच रत्यावर होती. बेशिस्त आणि नियमाचे उल्लंघन करणाऱया वाहनांचा त्रास प्रामुख्याने शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना होत होता. तोपर्यंत ठाण्यातील वाहतुकीचा शास्त्राsक्त अभ्यास कोणीच केला नव्हता. या गटाने प्रथमच या साधारण ४०० मीटर रस्त्यावर होणाऱया वाहतुकीची नोंद, वाहन प्रकार, वेळ, वाहनातील प्रवासी इत्यादी घटकांना लक्षात घेऊन केली. त्याचप्रमाणे पादचारी व फूटपथाची लांबी, रूंदीची पण नोंद केली. टेलिफोन जंक्शनवर सिग्नल तोडणाऱया वाहनांची पण नोंद केली होती. या निरीक्षणातून त्यांच्या लक्षात आले की सकाळी सात व संध्याकाळी सात वाजेपर्यंत बस व ट्रक्स यांना या रस्त्यावरून जाण्यास बंदी होती. तरी ही वाहने नियमबाह्य या वेळेत रस्त्यावरून धावत होती. त्याकाळात हायवेवर फ्लायओव्हर व सर्व्हिस रोड नसल्याने वागळे इस्टेट व पोखरण येथील कंपन्याच्या बसेस वेळ वाचवण्यासाठी महात्मा गांधी रोडचा वापर करीत असत. अमृता आणि तिच्या सहकारी मैत्रिणींनी या कंपनी बसेसची नोंद वाहतूक पोलिसांना दिली. संबंधित कंपनीना पत्र लिहून सुद्धा परिस्थिती बदलत नाही हे लक्षात आल्यावर पोलांच्याच परवानगीने त्यांनी कोपरी पूलावर सर्व वाहतुक अडवली व सर्व बस चालकांना उलट फिरून पूर्व दृतगतीचा वापर करण्यास भाग पाडले. ‘चलता हे नही चलेगाचे’ प्रत्यक्ष आचरण त्यांनी केले. त्यांच्या या कृतीची वृत्तपत्रातून कौतुक व प्रशंसा झाली. मुख्य म्हणजे वाहतुक पोलिसांना कोपरी पुलावर एक पोलिस वाहतूक नियंत्रणासाठी सकाळी सात पासून ठेवणे प्राप्त झाले. हे सर्व झाले ते बाल वैज्ञानिकांनी केलेल्या वाहतूकीच्या शास्त्राsक्त अभ्यासावर आधारित लिहलेल्या संशोधन प्रबंधामुळे.

शालांत परिक्षा झाल्यावर तिच्या सहकारी मैत्रिणींनी इतर सर्वसाधारण हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. त्या काळात CET नव्हती. बारावीच्या गुणांवर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळत असे. रूपारेल, केळकर, रूईया महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी हुशार विद्यार्थी धडपडत. दरवर्षी बारावीच्या परिक्षेतील गुणांच्या उच्यांकाचे आकडे मोडीत निघत. अशा वेळीस या रॅटरेसमध्ये भाग न घेता अमृतानी कनिष्ठ महाविद्यालयापासून प्रवेश घेतला तो मुलभूत विज्ञानाचा अभ्यास करण्याचा एक निर्धार करून एकदम मुंबई शहरातील सेंट झेविअर्स महाविद्यालयात. मराठी माध्यमातल्या ठाणे शहरातील मध्यमवर्गानी सेंट झेविअर्समध्ये प्रवेश घेणे हे निश्चितच धाडसाचे होते. कॉलेजमधील वातावरण व संस्कृतीत रूळत तिने पदार्थ विज्ञान हा प्रमुख विषय घेऊन B.Sc ऑनर्स पदवी प्राप्त केली. महाविद्यालयातील प्रा. अजय पटवर्धन यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि आज सुद्धा ती त्यांचे मार्गदर्शन घेत आहे.

महाविद्यालयात असताना केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येण्याऱया एनजीए परिक्षेत महाराष्ट्रातील एक टक्का यशस्वी विद्यार्थ्यांत तिचा समावेश होता. मुंबई विद्यापिठाची बीएससी ऑनर्स पदवी २००३ साली प्राप्त केल्यावर तिने २००४ वर्षी टाटा मुलभूत संशोधन केंद्रात क्रायजोनिक तंत्रज्ञानाचा फ्रीजमध्ये होणारा वापर या प्रकल्पावर काम केले २००७ ला अमृताने ओहायो राज्यातील टोलेडो विद्यापिठात इंटीग्रेटेड Ph.D. साठी प्रवेश घेतला. पी.एचडीचा अभ्यास करताना तिला प्रयोग शाळेत सौर सेलमध्ये उपयोगात येणाऱया पातळ Thin फिल्मवर काम करण्याची संधी मिळाली. सौर घटक बनवताना म्हणून साधारणपणे तांबे वापरले जाते. कॉपरच्या गुणधर्मामुळे काही काळाने सौर सेलची क्षमता कमी होत जाते. या प्रक्रियेवर निर्बंध घालण्यासाठी प्रयोगशाळेत संशोधन अंतर्गत तिने कॅडमियम टेल्युराइड या स्थिर पदार्थांचा वापर करून सौर सेलची क्षमता वाढवण्यावर भर दिला. या संशोधनातून अमृताच्या टिमला सौर घटकाचे वापरण्याचा काळ १३ टक्क्यांनी वाढवता आला.

डॉक्टरेटचा अभ्यास करताना तिने एव्हिपस २००८ या स्पर्धेत पोस्टर सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकावला होता. २०१० वर्षी ती डेव्हीड टर्नबॉल शिष्यवृत्ती मानकरी होती. त्याचबरोबर पाय सिग्मा पाय ची मानद सभासदत्वपण तिला मिळाले.

अमृताने पी.एचडी च्या संशोधनाचा विषय पातळ (Thin) फिल्मशी निगडित असलेला निवडला. सौर उर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत महत्वाचा घटक असलेल्या सौर सेलच्या वापरात थीन फिल्म वापरण्याची पध्दत आता रूढ झाली आहे. या थीन फिल्म बनवण्याच्या प्रक्रियेत प्लाझमा [Plasma] तयार होतो. राफ मॅग्नेटारन स्पटरींग स्पटिंग [RF Magnetron Sputtering] ही वैज्ञानिक पध्दत प्लाझमाच्या निर्मितीसाठी वापरली जाते.

प्लाझमाच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी ऑप्टिकल इमिशन स्पेक्टोरकोपीचा वापर तीने केला. यासाठी अमृताला संगणकावर सिम्युलेशन [simulation] प्रोग्राम बनवावे लागेल. प्रत्यक्ष प्रयोगांनी काढलेले निष्कर्ष,

संगणकावरील आलेल्या सिम्युलेशन निष्कर्षाशी तुलना करून तिने प्लाझमाचा सखोल अभ्यास केला. हा निर्माण केलेला प्लाझमा प्रत्यक्ष सौर सेलमध्ये वापरणाऱया थीन फिल्म वापरण्यात आली.

२०१२ साली भारतात परतल्यावर तिने मुंबई आय.आय.टी. मधील नॅशनल सेंटर फॉर फोटोव्होल्टीक रिसर्च अॅन्ड एज्यूकेशन मध्ये सहाय्यक संशोधक पदावर काम केले. सध्या अमृता आबुधाबी येथे वास्तव्य करीत आहे. आबुधाबी येथील हॉटेल्स मधील वायाजाणाऱया खाद्यतेलापासून बायो डिझेल निर्मितीवर ती सध्या काम करित आहे.

जगभर ऊर्जेची गरज आणि मागणी वाढतच आहे. ऊर्जेचे जे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी, कोळसा, जंगल, खनिज तेल आणि वायू यांचा साठा मानवाच्या उथळपट्टीने संपत आलेला आहे. या परिस्थितील तमाम मानव जातीला अपारंपारिक उर्जा स्त्राsतांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. आपल्या देशापूरते बोलायचे झाल्यास देशातील उर्जेची गरज पुढील वीस वर्षात आपली तीन पटीने वाढणार आहे. उर्जा निर्मिती तिपटीने वाढवण्यासाठी अपारंपारिक उर्जेचा वापर प्रामुख्याने असणार आहे. अमृता सारख्या उर्जा क्षेत्रात काम करणाऱया तरूण संशोधकांना हे मोठे आव्हान आहे. मला खात्री आहे की हे आव्हान आपले तरूण संशोधक नक्कीच स्विकारतील.

सुरेन्द दिघे
कार्यकारी विश्वस्त
जिज्ञासा ट्रस्ट ठाणे

सुरेंद्र दिघे
About सुरेंद्र दिघे 11 Articles
श्री सुरेंद्र दिघे हे ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या जिज्ञासा या संस्थेचेही विश्वस्त आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..