पावसाळा नुकता संपलेला. चार महिने अधूनमधून ढगाआड जाणारा चंद्रमा अश्विनातल्या पौर्णिमेला पूर्ण तेजानं उजळून आलेला. या पौर्णिमेचं स्वतःचं खास स्थान आहे. ही ‘कोजागिरी पौर्णिमा’ । रसिकांना कवींना, लक्ष्मीच्या पूजकांना आणि वैद्यांनाही महत्त्वाची वाटते.
निसर्गातल्या प्रत्येक घटनेचं भारतीय संस्कृतीनं कौतुक केलं. प्रत्येक ऋतूचं स्वागत केलं. माणसाला निसर्गाकडे, सृष्टीच्या सौंदर्याकडे पाहायला शिकवलं. पौर्णिमेचं चांदणं हा तर सौंदर्याचा, शीतलतेचा केवढा रम्य आविष्कार ! आजकाल शहरातल्या 6
नवलाख विजेच्या तळपत्या दिव्यामुळं’ चांदणं हरवत चाललंय. पण खरोखरच ‘चांदणं’ ही अनुभवण्याची गोष्ट आहे. चांदण्याला स्वतःची भाषा असते. निस्तब्ध शांततेत, संवेदनाक्षम मनाला ती ऐकता येते. सोसायटीच्या टेरेसवर गाण्याच्या भेंड्या लावत किंवा संगीत – खुर्ची खेळत वर्गणीचा आणि मिळालेल्या दुधाचा हिशेब करत चांदणं भोगता येत नाही. जाऊ दे.
कोजागिरीतल्या दुधाचं महत्त्व असण्यामागेही निसर्गच आहे. श्रावण-भाद्रपदात दुधाची कमतरता असते. गाई- म्हशी पुरेसं दूध देत नाहीत. त्यानंतर अश्विनात मात्र दूध-दुभतं भरपूर असतं तसंच चांगलंही असतं. या नव्या दुधाचा परमेश्वराला हा नैवेद्य असतो. खरं तर हे दूध चांदण्यात अर्धी रात्र होईपर्यंत ठेवतात. कारण चांदणं औषधी असतं. चांदण्यात राहिलेलं हे थंड दूध आरोग्यावर चांगला परिणाम करतं. या पौर्णिमेला चांदण्यात ठेवून दम्यावरती एक औषध दिलं जातं. यावरून या चांदण्याचा संबंध आरोग्याशी आहे हे कळतं. चंद्राच्या चांदण्यामुळंच औषधी वनस्पतींची वाढ होत असते असं म्हणतात.
ही ओळ पुरेशी बोलकी आहे.
गीततेल्या पंधराव्या अध्यायातील तेराव्या श्लोकाची
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ ‘
( अमृतमय चंद्रमा होऊन मी सर्व औषधींना म्हणजेच वनस्पतींना पुष्ट करतो). पण चंद्राचा संबंध नुसताच शारीरिक आरोग्याशी नाही. चंद्र मनावर परिणाम करतो. चंद्राचा जन्मच मुळी ब्रह्मदेवाच्या मनापासून झाला. असं मानतात (चंद्रमा मनसो जात:). इंग्रजीत चंद्राला Luna हा शब्द आहे आणि ‘वेड’, डोकं फिरलेला’ याला Lunatic हा शब्द आहे. हेही चंद्राचा मनाशी असणारा संबंध दाखवायला पुरेसं आहे.
स्वतःचा विकास साधायचा तर मनाची साथ आवश्यक. मनाच्या वाईट प्रवृत्ती विकासाला अडथळा आणतात. म्हणून कधी मनाला शिक्षा द्यावी लागते.
म्हणूनच मनाचं प्रतिक असलेल्या या चंद्राला गणेशचतुर्थीच्या दिवशी पहायचंही नाही. पण चांगलं वागायचा संकल्प करणारंही शेवटी मनच. म्हणून या चंद्राची पूजा करायची. त्याची साथ मिळवायची. चांदण्याचा आणि चंद्राचा केवढा विचार आपल्या संस्कृतीनं केला. नुसताच विचार नाही तर ते चांदणं जगायला/ भोगायला शिकवलं. निसर्ग, शारीरिक-मानसिक आरोग्य आणि धर्मकल्पना यामध्ये चांदण्याचं काव्य असं बेमालूम मिसळलं, जसं आटवलेल्या दुधात केशर.
या रात्री जागायचं, ते खरं या चांदण्यासाठी, अर्ध्या रात्रीचं त्याचं पूर्ण तेज पाहण्यासाठी. पण या रात्री लक्ष्मीची पूजाही केली जाते. या रात्री जो जागा असेल त्याला ‘लक्ष्मी’ मिळते म्हणतात. खरंच आहे व्यवहारात जो जागरूक सावध असतो त्यालाच ‘लक्ष्मी’ मिळणार. आळसानं झोपा काढणाऱ्याला ‘लक्ष्मी’ कशी मिळेल? खूप लोक या दिवशी जुगार, सोंगट्या वगैरे चक्क श्रद्धेनं जागून खेळतात. मला मात्र वाटतं, ‘को जागर्ति?’ या लक्ष्मीच्या प्रश्नामध्ये या एका रात्रीचं जागरण नाही तर व्यावहारिक जागरूकता अभिप्रेत असावी.
कोजागिरीच्या पौर्णिमेत असा अर्थ आहे. यात विज्ञान आहे, धर्म आहे, रसिकता काव्य आहे आणि निसर्गाशी संवाद साधण्याची शिकवण आहे. निरभ्र आकाश आणि पूर्ण चंद्रमा आपलं चांदणं जेव्हा साया सृष्टीवर, आपल्या अंगावरही पसरतो तेव्हा आपल्या शीतलतेचा, शांत तेजाचा अनुभव आपल्याला देत असतो. हा अनुभव घेण्याइतकी उसंत आपल्याजवळ असते का?
त्याहीपेक्षा मन तितकं सजग, चित्तवृत्ती तितक्या जाग्या असतात का?
Leave a Reply