पुण्यातील निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ ह. वि. सरदेसाई यांचा जन्म १० एप्रिल १९३३ रोजी झाला.
पुणेकरांचे ‘फॅमिली डॉक्टर’ म्हणून ते ओळखले जात. प्रखर बुद्धिमत्तेच्या जोडीला असलेले संवादकौशल्य, रुग्णांविषयी वाटणारा उमाळा आणि रुग्णांना आदराने वागविण्याच्या स्वभावाच्या बळावर डॉ. सरदेसाई यांनी जवळपास सहा दशकांहून अधिककाळ वैद्यकीय व्यवसाय करत ‘धन्वंतरी’ हे नाव सार्थ केले. त्यांनी केवळ संवाद साधल्यानंतर रुग्णाचा निम्मा आजार बरा होत असे.
हणमंत विद्याधर सरदेसाई हे त्यांचे पुर्ण नाव. डॉक्टर ह. वि. सरदेसाई हे मुंबईत १९५५ साली एमबीबीएस आणि १९५८ मध्ये एमडी (मेडिसिन) झाल्यावर उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. एमबीबीएसला त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयांत डिस्टिंक्शन तर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळालं होतं. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एम.डी. करून १९६० ला ते भारतात परतले. पुण्यात त्यांचे आई-वडील होते. वडिलांना मधुमेह तर आईला ब्लड प्रेशरचा त्रास होता. ते चौघे भाऊ. प्रत्येक जण आपापल्या कामानिमित्ताने बाहेरगावी असल्याने आई-वडिलांची सेवा करण्याच्या उद्देशाने डॉक्टरांनी पुण्यातच स्थायिक व्हायचं ठरवलं. वैद्यकीय विषयांशी निगडित पुण्यातील अनेक संस्थांचं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यपद डॉक्टर ह. वि. सरदेसाई यांनी भूषवलेलं होते. डॉ. ह.वि. सरदेसाई यांना २०११ साली पुण्यातील मानाचा पुण्यभू्षण पुरस्कार २०१६ साली प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार मिळाला होता.
डॉक्टरांनी व्याख्यानांसोबत विपुल लेखनही केले होते. त्यांची २२ पुस्तकं आणि २७ संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’ हे त्यांचं पुस्तक हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अनुवादित झालं. मराठीत त्याच्या सोळा आवृत्त्या निघाल्या. शेवटपर्यत ते वृत्तपत्रांतून लेखन करतच असत. ‘निरामय जीवनाचे पथदर्शक डॉ. ह. वि. सरदेसाई’ हे डॉक्टरांच्या जीवनकार्याचा वेध घेणारं पुस्तक प्रकाशित झालं होते. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असा त्यांचा लौकिक होता. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. डॉ. सरदेसाई यांना वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती जमा करण्याचा छंद होता. त्यांच्याकडे चित्र आणि शिल्प रूपातील गणपतींचा संग्रह होता.
डॉक्टर ह. वि. सरदेसाई यांचे १५ मार्च २०२० रोजी निधन झाले.
Leave a Reply