डॉ.देशमुख हे आम्हास Physiology हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध दोन वेगवेगळ्या विषयावर दोन विश्वविद्यालयांत सादर करुन, वेगवेगळ्या डॉक्टरेट पदव्या मिळविल्या होत्या. विषयाचे जरी अथांग ज्ञान मिळाले असले तरी शिक्षकीपेशामध्ये ते अयशस्वी झालेले जाणवले. वर्गांत शिकवण्यासाठी येण्यापूर्वी नोकर १०-१२ पुस्तके टेबलावर ठेऊन जात असे. पुस्तकांत Book-Mark ” ठेवलेले असे. प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत आगदीच वेगळी होती. एखादा विषय, त्याची व्याख्या, प्रस्तावना, संदर्भ, चर्चात्मक टिकाटिपनी, सारे ते निरनिराळी पुस्तके काढून बुकमार्कने पान उघडून चक्क वाचून दाखवित. सोप्या, वेगळ्या भाषेत त्यावरचे भाष्य ते केंव्हाच करीत नव्हते. कुण्या विद्यार्थ्याने एखादी शंका विचारली तर त्याचे उत्तर कोणत्या पुस्तकांत कोणत्या Chapter मध्ये आहे, हे ते सांगत. विद्यार्थाना ते अत्यंत रुक्ष वाटत होते. त्या प्रचंड ज्ञानी प्राध्यापकाकडून तसूभर ज्ञान मुलाना मिळाल्याचे समाधान दिसून आले नाही.
डॉ. मँडम नाडकर्नी मेडीकल कॉलेजमध्ये बालरोग ( Pediatric ) ह्या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून नुकत्याच रुजू झाल्या होत्या. तरुण, तडफदार व्यक्तीमत्व होते. त्या केवळ एका महीन्यांच्या काळांतच विद्यार्थ्यांच्या चहात्या झाल्या. त्यांचे भाषा प्रभूत्व होते. अतिशय सरळ सोप्या आणि साध्या शब्दांत विषय फुलविण्याची विलक्षण कला साध्य असलेली. प्रत्येक विषयाची सुरवात एकदम प्राथमिक स्थरावर जाऊन करीत. विषयच्या मुळापासून समजावण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. कोणताही मुद्दा जोपर्यंत वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षांत येणार नाही, तो पर्यंत सर्व अंगाने त्या तो फुलवित होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी, त्यांची समज, त्यांच्या अंगगुणांची झेप, व तो विषय ग्रहन करतो कां ? ह्यात त्या बारकाइने लक्ष देत होत्या. चित्र, फोटो, ग्राफ, आलेख, प्रोजक्षन, एखाद्या बालरुग्णाला वर्गात आणून प्रात्यक्षिके दाखवित असे. विषय आगदी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आकलन झाला किंवा नाही हे तगमगीने जाणण्याचा त्या प्रयत्न करीत असत.Dr. deshmukh – An Ideal Teacher
प्रत्येक विद्यार्थाचा नावानिशी परिचय करुन घेत होत्या.
त्या इतर वेळीही Extra Classes घेत होत्या. केंव्हाही क्लासेस, केंव्हाही Laboratory, Wards, Out Patient Department, ह्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्याना बालरोगाविषयी मार्गदर्शन करीत असत. विद्यार्थी देखील त्यांच्याबद्दल सतर्क होते. मिळणारय़ा प्रत्येक क्षणाचा ते उपयाग करुन घेत. ज्या ज्या वेळी जमेल, कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी डॉ. नाडकर्णीचे कोठे लेक्चर आहे याची नोंद ठेवत होता. सर्व विद्यार्थी अटेंड करण्याचा प्रयत्न करीत असे.
विद्यार्थ्यावरचे, शिकवण्यावरचे प्रेम, आपलेपणा, तगमग, ध्यास हे त्यांचे गुणधर्म दिसले. कोठेही राग नाही. तिटकारा नाही. कंटाळा नाही. शिक्षकी व्यवसायातील एक आदर्श व सन्मानित व्यक्तीमत्व.
प्रत्येक शिक्षक ज्या स्थरावर शिकवण्याचे कार्य करतो, हे त्याचे ज्ञानदान असते. त्या वेळच्या त्या स्थराच्या विद्यार्थ्यासाठी तो ज्ञानानी परिपूर्ण असतो. विद्यार्थ्याला शिक्षक किती ज्ञानी आहे, ह्याच्याशी कांही घेणे वा देणे नसते. देणारय़ाची क्षमता केवढी ह्यापेक्षा, तो ते ज्ञान विद्यार्थ्यांच्या समज बुद्धीत कसे घालतो, ह्यातच त्या शिक्षकांचे यश असते.
डॉ. देशमुख हे प्रचंड ज्ञानी असले, तरी मला डॉ. मँडम नाडकर्णी खरय़ा ज्ञानदात्री वाटल्या.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply