|| हरि ओम ||
आज जगातील बहुतेक राष्ट्रात समाजिक स्थरावर व कायद्याने स्त्रीला बऱ्याच बाबतीती पुर्षांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. परंतू देशातील व जगातील स्त्रियांवरील अत्याचार होताना प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियातून वाचले आणि
बघितले की वाटते, कुठल्याही गोष्टी कायदे केल्याने किंवा त्याची कठोर अंमलबजावणी केल्याने उद्देश साध्य होतातच असे नाही. त्यासाठी स्त्रीच्या प्रती पुरुषातील पुरुषी अहंकार जावा लागतो, मानसिकता सकारात्मक असावी लागते. “स्त्रीही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता आहे.” हे कालातीत सत्य लक्षात ठेऊन ते कृतीत आणले तरच आज स्त्रियांवर सर्वत्र होणारे अत्याचार थांबतील आणि समाजात ती सन्मानाने व ताठ मानेने जगायला शिकेल. स्त्रीने जर का चंडिकेचे रौद्र रुप धारण केले तर ती कुठलेही संकट सहज परतवू शकते.
भारतीय स्त्रियांचे समाजातील स्थान व दर्जा यांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी मनु व मासा या पासून काही संदर्भ तपासणे उचित ठरेल. वैदिक म्हणजे ऋग्वेदाचा कालखंड ज्यात रामायण, महाभारत व अन्य ग्रंथात आलेल्या उल्लेखाने स्पष्ट होते की स्त्रियांचा सामाजिक दर्जा समान होता व मानाचे स्थान होते. महाभारत याला कदाचित अपवाद असेल किंवा महाभारतातील काही षंढ पुरुषांचा अपवाद सोडता स्त्रियांचा सामाजिक दर्जा समान व समाजात मानाचे स्थान होते. स्वयंवराची प्रथा रूढ होती. ‘उपनयन’ व ‘नियोग’ हे क्रमश: शिक्षण व संततीचे अधिकार स्वातंत्र दर्शवतात. नंतरच्या वैदिक कालखंडात स्त्रियांवर अनेक निर्बंध लादले गेले. उपनयनाची जागा बालाविवाहा ने घेतल्यामुळे बालविधवा व विधवा स्त्रियांची स्थिती दयनीय झाली. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. पुरुष प्रधान संस्कृतीत बंधने लादली, बहुपत्नीत्व विवाह पद्धत रूढ झाली. स्त्रियांच्या विषमतेचे व गौणत्वाचे समर्थन मनुस्मृती व अन्य धर्मशास्त्रात करण्यात आले.
मध्ययुगात बाल, जरठ-कुमारी विवाह, देवदासी, सती, विधवांना पुनर्विवाह बंदी, शिक्षण व आर्थिक परावलंबन दृढ झाले. स्त्री-पुरुषातील लिंगभेदामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया शारीरिक, बौद्धिकदृष्ट्या क्रमश: कमकुवत व कमी क्षमतेच्या असल्याचा समज झाला. शिक्षण व आर्थिक स्वावलंबनाचा अभाव त्यात अंधश्रद्धा व रुढींचा पगड्यामुळे स्त्रियांनी गौणत्व बिनातक्रार स्वीकारले. मोगल, ब्रिटीश व स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांचे सामाजिक स्थान उंचावण्याचे प्रयत्न झाले तरी सामाजिक मानसिकता, यातील सर्वात मोठा अडथळा होता. आत्ताच्या काळात महिला कल्याण व सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वत:च्या अधिकारांबाबत जाणीव व जागृती उदयास येत आहे.
लीगंभेदामुळे प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांची पीछेहाट झाली व दूरगामी परिणाम समाज व्यवस्थेवर झाले. स्त्रियांना अनेक समस्यांना दैनंदिन जीवनात तोंड द्यावे लागते. मुलीचे लग्न झाले की ती स्वत:चे, वडिलांचे व आडनाव त्यागून संसारात गुंतते. मग कुटुंबाची सुरवात स्त्री व पुरुष या दोन बिंदुना जोडून झालेल्या सरळ रेषेने होते. त्यात एक, तर कधी दोन बिंदू सामील झाल्याने त्याचे क्रमश: त्रिकोन व चौकोनात किंवा जास्त बिंदू जोडले गेल्यास अधिक कोनात कधी रुपांतर होते ते कळत सुद्धा नाही. जवढे बिंदू जास्त तेवढी त्या कुटुंबातील स्त्रीची जबाबदारी कळत न कळत वाढत जाते. सर्व बिंदू एकमेकांशी सरळ रेषेने घट्ट जोडले असतील, तसेच रेषा समान व समांतर असतील, तर त्यांचे समभूज आकार भूमितीतले न राहता प्रेमाच्या व आपुलकीच्या सामाजिक बांधिलकीने व बंधनाने एकत्र नांदतात परंतू यात एक बिंदू व रेषा जर वरील सूत्रात नसेल तर त्या कुटुंबातील स्त्रीची अवस्था अबले सारखी होते.
स्त्री हे मानवतेचे प्रतिक असून, आज्ञापालन, एकता, प्रेम, दया व आकर्षण हे गुण निसर्गत:च आढळतात. ऑफिसमध्ये साहेबाची, घरात नावरोबांची, मुलांची, सासरच्या माणसांची व शेजार्यांची मर्जी सांभाळा. संसारातील गरिबी व बिंदूत (मुल/मुलं) झालेल्या अनिर्बंध वाढीने तसेच कुपोषणामुळे शरीराची झालेली हेळसांड त्यात स्वत:च्या तब्बेतीकडे बघायला वेळ नसणे. दुखणी अंगावर काढल्याने सोसाव्या लागणाऱ्या यातना. शारीरिक बळ कमी असून देखील संसाराची सर्व जबाबदारी प्रेम व आपुलकीच्या सामाजिक बांधिलकीने स्वत:कडे घेते. एवढे करूनही तिला घालून पाडून घरातील व सासरची मंडळी बोलत असतात. स्त्री स्वत:च्या शीलाला व इज्जतीला फार जपते. याचाच गैर फायदा समाजातील तथाकथित डूढढाचारी व दादा लोक घेतात. समाजाच्या शारीरिक, लैंगिक व मानसिक शोषणाला तर कधी भृणहत्या, हुंडा सारख्या जाचाला कंटाळून ती घटस्पोट, आत्महत्या व व्यसनाकडे वळते किंवा आणिक वेगळ्या वाटा शोधते. समाज प्रत्येक वेळी व बाबतीत स्त्रीला गृहीत धरतो हा तिचा अपमान व मोठा पराजय आहे, हे समाजाने थांबवालेच पाहिजे. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांचा सामाजिक दर्जा दुय्यम व पुर्षांचा उच्च समजला जातो. कायद्याने स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित केली असली तरी रुढी-परंपरानिष्ठ भारतीय समाजात स्त्रियांना आजही दुय्यम लेखले जाते त्यासाठी आत्मबल, शरीरीकबल, साक्षरता आणि स्त्रीकायाद्यातील हक्कांची जाणीव तिला होणे महत्वाचे आहे. फूलनदेवीला तिच्यावरील अमानुष बलात्कार व अत्याचाराचा बदला घेण्यासाठी परिस्थिती सबला बनविते. अर्थात कायदा हातात घेणे म्हणजे सबला होणे नाही.
श्रीरामांची पत्नी सीता काय अबला होती? नक्कीच नाही. परंतू तिच्या एका चुकीमुळे तिला अबले सारखे जीणे जगावे लागले. रावणाच्या राज्यातील सगळ्या स्त्रिया अबलाच होत्या व पुरुष शंढ, भित्रे व लाचार होते कारण त्यांना कर्म स्वातंत्र नव्हते,
मरणाला व अत्याचारी रावणाला घाबरणारे होते. अपवाद बिभीषण कारण तो सदाचारी होता. त्याला जनतेवरील अत्याचार पसंत नव्हते. श्रीरामांवर दृढ विश्वास व श्रद्धा असणारा होता. म्हणजेच येथे एक गोष्ट स्पष्ट होते की कमजोर, घाबरट व लाचार व्यक्तीवर बलवान, अनाचारी व अश्रध्द व्यक्ती आपली हुकुमत गाजवते. पांडवांच्या लाचारीचे परिणाम द्रोपदीला अबला होऊन भोगावे लागले. पाच पती असून एकही तिची अब्रू वाचवू शकला नाही. दोन्ही उदाहरणात स्त्रीची काही चूक नसताना कपटनीतीला त्या बळी पडल्या होत्या.
पतीच्या अकाली निधना नंतर स्त्री संसाराचा गाडा खंबीरपणे व आत्मविश्वासाने रेटते. गणितात सांगायचे झाले तर कुटुंब वजा स्त्री बरोबर शून्य. कारण ती संसाराचा कणा, आधारस्तंभ व एक अविभाज्य घटक आहे. स्त्रीला पशुवत वागणूक न देता समाज तिला सन्मानाने वागवेल व मनापासून आदर करण्यास शिकेल तो दिवस भाग्याचा व “स्त्री-अबला का सबला” हे विधान कायमचे पुसून टाकण्याचा असेल.
जगदीश पटवर्धन,
वझिरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply